बृहस्पती..........

 रत्नावर अशी वेळ कधी येईल असे कोणालाही वाटले नव्हते. जयेश चांगल्या वरीष्ठ पदावर प्राॕडक्शन मॕनेजर होता. कंपनीचा फ्लॕट होता. शोफर ड्रीव्हन कार होती. एकुलता एक मुलगा सुव्रत. तोही छान हुशार अत्यंत शांत , सुस्वभावी होता.

पण नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता थोडेच येते. जयेश कामानिमीत्त बाहेरगावी गेला असता, त्याच्या कारला ट्रकने मागुन धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले.
आता काय करु? जयेशचा शोक करु? का सुव्रतला व स्वतःला संभाळू? असे रत्नाला झाले. जयेशचे आई वडील ब-याच वर्षांपूर्वी गेले होते. तीलाही माहेरचे खास कोणीच नव्हते. नाही म्हणायला जयेशचे गावी मोठ्ठे घर होते. सुट्टीत कधीतरी ते गावी जात असत.
कंपनीने नुकसानभरपाई वगैरे सर्व देऊ केले. जयेश तर फक्त सातवीत होता. तीलाही नोकरीचे विचारले गेले पण अनुकंपा म्हणून नोकरी करणे तीला पसंतच नव्हते.
अचानक एका सकाळी फोन वाजला, "रत्ना, मी गुरुबाबा बोलतोय." तीला गुरुबाबांचा शांत प्रेमळ स्वर ऐकूनच हायसे वाटले.
गुरुबाबा पंचाहत्तर वर्षांचे निष्णात वैद्य होते. त्यांचे घर जयेशच्या घराला लागुनच होते. काकू ब-याच वर्षांपूर्वी गेल्या होत्या. मुलगी प्रीया अमेरिकेत होती. गुरुबाबा प्रेमळ तरी शिस्तीचे होते. दिवसभर ते आजा-यांना औषधे देत.
कोणीतरी त्यांना दिवसाचा डबा देई. रात्री ते जेवतच नसत. सुव्रत हे नावसुद्धा त्यांनींच दिले होते. जयेश त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेला होता. जयेश गेल्याचे समजताच त्यांना अतीव दुखः झाले होते. पण आता रत्ना आणि सुव्रतला सांभाळायचे त्यांनी ठरवलेच होते.
" हे बघ रत्ना, आता खूप दुखः करत बसण्यास आपल्याकडे वेळ नाही. तू व्यवहाराचे आवरुन गावी ये. घर उघड आणि रहा. मी आहेच. मला काय ते कळव. एक किल्ली माझ्याकडे आहेच. मी घर स्वच्छ करुन ठेवतो. सुव्रतला सांभाळ."
रत्नाला एकदम आभाळ मोकळे झाल्यासारखे वाटले. सुव्रतला मोठ्या गावातून लहान गावात जाणे क्षणभर वेगळे वाटले तरी परीस्थीती त्यालाही कळत होती.
रत्नाने चार दिवसांनी कंपनीला फ्लॕट सोडत असल्याचे कळवले. बरेच हिशेब केले गेले. सामान कंपनीच्या ट्रकने पाठवले जाणार होते. त्यांना सोडायला गाडी येणार होती. तीने गुरुबाबांना कळवले.
गुरुवारी संध्याकाळी सामान व गाडी एकदमच पोचली. गुरुबाबांकडे निरोप गेला. ते आवरुन आले. पंचाहत्तरीचे असलेतरी ताठ, पांढ-याशुभ्र दाढीचे गुरुबाबा पुराणातल्या ऋषींसारखेच दिसायचे. वागणे बोलणे साधे असले तरी त्यांना सगळीकडची खडानखडा माहिती असायची.
रत्ना, सुव्रत आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केले. ते म्हणाले, " आता मंडळी येथेच राहू देत. मी जेवणाचे सांगून ठेवले आहे. " "बाबा तुम्ही कशाला, मी केले असते." " ते नंतर पाहू, " म्हणून ते गेलेसुद्धा.
मंडळींचे आवरले. चहापाणी झाल्यावर त्यांनी सामानही लावून दिले. जयेशसर त्यांच्या फारच जिवाभावाचे होते. मॕडम आणि सुव्रत एकटे कसे राहणार याचे त्यांनाच वाईट वाटत होते.
दुसरे दिवशी मंडळी निघाली. गूरुबाबा आले. त्यांनी सुव्रतची चौकशी केली. आता परिक्षा आल्याच होत्या. एका शाळेत त्याची अॕडमीशन झाली.
हळूहळू रत्नाचे बस्तान बसत होते. सुव्रतला मित्र जोडायला बराच वेळ मिळणार होता.
सुव्रत तसा हुशार असल्यामुळे व पुस्तकेही बरीचशी तीच असल्यामुळे फारशी अडचण गेलीच नाही. तो अधूनमधून गुरुबाबांच्या घरी जात असे. त्यांना प्रश्न विचारत असे. त्याचा चौकसपणा त्यांनाही आवडू लागला होता. घरात बरेच वर्षे कोणी नसल्यामुळे त्यांना सुव्रतची लुडबुड बरी वाटत असे. रत्नाने त्यांना घरचे ताजे जेवण पाठवायला सुरुवात केली होती.
गुरुबाबा सतत काढे , चुर्णे, तयार करत. आजा-यांना पथ्ये सांगत. आजार झटकन बरे होत असल्यामुळे आणि पुन्हा उदभवत नसल्यामुळे लांबुन लांबुन लोक येत असत. सुव्रतने त्यांना औषधे लॕपटाॕपवर लिहुन ठेवूया असे सांगितले. त्यांना ते कधी नव्हे ते पटले. संध्याकाळी सुव्रत त्याचा लॕपटाॕप घेऊन जात असे. तास दीडतास काम करत असे.
"बाबा हा सुव्रत इतका बारिक कसा? त्याला काहीतरी औषध द्या." असे रत्नाने सुचवल्यावर ते म्हणाले, " अग तो सशक्त आहे. त्याची चणच बारिक आहे . त्याला दुध प्यायला लाव. सुर्यनमस्कार घालायला लाव. मी त्याच्याबद्दल वेगळाच विचार करतोय. " " म्हणजे काय?" रत्नाने विचारले." काही नाही म्हणून ते गेले. तो विषय तिथेच संपला.
सुव्रतची परीक्षा संपली. रीझल्ट लागला. तो सर्व तुकड्यांत पहिला आला होता. त्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. गुरुबाबांनी त्याला बोलावले. त्याला काय बक्षीस हवे विचारले. त्याने काही नको म्हटले. तरी त्याला त्यांनी छान सायकल घेऊन दिली.
आता गुरुबाबा सगळे काम संपल्यावर पुन्हा कसल्यातरी नवीन औषधाच्या तयारीला लागायचे. आता काय करता परत,असे विचारले तर काहीच बोलायचे नाहीत.
काही दिवसांनी त्यांनी सुव्रतला बोलावले , एक चाटण चाटायला दिले. उद्या, परवा नवीन वर्षाचे गणिताचे पुस्तक घेऊन यायला सांगितले.
गुरुबाबा कोणाला शिकवण्याच्या फंदात पडत नसत, आज गणिताचे पुस्तक घेऊन का बोलावले बघण्यासाठी रत्नाही गेली. त्यांनी सुव्रतला गणिताच्या पुस्तकातले शेवटचे प्रकरण काढायला सांगितले. ते काहीतरी वर्गराशींचे होते.
त्याबद्दल वाचायला सांगितले. आणि लगेच त्याखालची गणिते सोडवायला सांगितली. एकदोनदा अडखळल्यानंतर आश्चर्य म्हणजे सुव्रतला सर्व गणिते झटकन सोडवता आली. ते कसे आले? या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. रत्नालासुद्धा त्याची गणिते सोडवण्याची रीत वेगळीच वाटली. बाबा हसले. "झाले माझे काम. पळा आता. " म्हणाले.
सुव्रतची सुट्टी संपत आली. एरव्ही ते सुट्टी कोठेतरी ट्रीप काढायचे. गावी यायचे. पप्पा नसतानाची ती पहिलीच सुट्टी होती. एकदा गुरुबाबा त्यांना जवळच्या जंगलात घेऊन गेले. त्यांना जरा बरे वाटले. गुरुबाबांनी त्यांना हव्या त्या झाडांची मुळे, काही वनस्पती गोळा केल्या.
संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी सुव्रतला एक छोटी बाटली दिली व त्यातील चाटण सकाळी दुधाबरोबर रोज थोडेसे घेण्यास सांगितले. "बाबा हे काय आहे? ते लॕपटाॕपवर घायचे नाही का?" सुव्रतने विचारले. " हो, हो, घेऊया हं एकदा." असे ते म्हणाले.
रत्ना आणि सुव्रत घरी आले. फिरुन फिरुन दमल्यामुळे सुव्रत पटकन झोपी गेला. रत्नाही आवरुन झोपली.
सकाळी ऊठून पाहते , तो गुरुबाबांची जाग नव्हती. एरव्ही गुरुबाबा फिरुन आंघोळ करुन पुजा करत असत. ती बाबांच्या घराबाहेर गेली. दार बंद होते. तीने बाबांना हाका मारल्या. तरी जाग नाही, उत्तर नाही. तीला वेगळीच शंका आली. तीने आणखी शेजा-यांना बोलावले. कोणीतरी घराच्या मागुन, बागेतुन पाहिले. तरी जाग नव्हती.
मागच्या दाराची कडी जरा हलकीच होती. जरा ढकलताच ते दार उघडले. तो मुलगा आत गेला. गुरुबाबा त्यांच्या गादीवर नेहमीसारखे झोपले होते.
त्याने पुढच्या दाराची कडी आतू उघडली. सगळेजण आत आले. पाहतात तो काय गुरुबाबा शांत झोपल्यासारखे पडले होते. कोणीतरी जवळच्या कामत डाॕक्टरांना बोलावले. ते पळतच आले. त्यांनी गुरुबाबांना तपासले आणि त्यांचे रात्रीच कधीतरी प्राणोत्क्रमण झाल्याचे जाहीर केले.
रत्नाचा बांध कोसळला. " बाबा , तुम्हीच मला बोलावले ना? आता तुम्हीच कोठे गेलात?" ती अखंड रडत होती. शेजारी स्त्रीयांनी तीला सावरले. प्रीयाला फोन झाला. तीने येणे शक्यच नव्हते.
रत्नालाच विचारुन बाबांचे संस्कार करण्याचे ठरले. सगळा गाव लोटला. गुरुबाबा सगळ्यांचे असले तरी त्यांचे जवळचे नात्याचे कोणी नव्हते. सुव्रतला बाबा नसल्यामुळे तो कोणाचेही अंत्यविधी करु शकतो असा शास्त्राधार सांगितला गेला. शेवटी नाईलाजाने सुव्रतलाच ते काम करावे लागले. प्रथम बाबा गेलेले. आता गुरुबाबा. त्याला काय करावे कळेनासे झाले.
गुरुबाबांची आठवण करुन तो घरी गेला. त्याने बाटलीतले चाटण चाटले. दुध पिले. आणि डोक्यातले सर्व भितीचे, दुखाःचे, विचार एकदम थांबले.
मोठ्या माणसारखा तोच रत्नाला धीर देत म्हणाला, " आई, बाबा जायला नको होते. पण आज ना उद्या प्रत्येकावर अशी वेळ येणारच आहे. त्यांच्या स्मृती अशा जाणार नाहीत. मी त्या जपून ठेवीन. "
सगळ्यांनाच या बोलण्याचे कौतुक वाटले. त्याने धीराने सर्व पार पाडले. गुरुबाबांचे घर तो रोज साफ करुन घेऊ लागला. काही दिवसांनी प्रीया आली. तीला गुरुबाबांच्या छोट्याश्या मिळकतीत रस नव्हता. गुरुबाबांनी मृत्यूपत्र केले होते. त्यात घर सोडून उरलेले सगळे म्हणजे छोटेसे शेत, सोने नाणे, दागदागीने प्रीयाला दिले होते. सुव्रत डाॕक्टर झाला तर त्याने घराच्या जागी मोठ्ठे हाॕस्पीटल काढावे व अल्प पैशात रुग्णसेवेसाठी ते वापरावे असे स्पष्ट लिहीले होते. तो डाॕक्टर झाला नाही तरमात्र प्रीयाने तीला हव्या त्या प्रकारे घराची व्यवस्था करावी असे म्हटले होते.
तीला बाबांबद्दल फारच वाटत होते. तीने रत्नाला सुव्रतला चांगले शिकवून डाॕक्टर करण्यास सांगितले. त्यासाठी वाट्टेलती मदत करण्याचे आश्वासन दिले.
घराची साफसफाई, व्यवस्था करण्यासाठी घराची एक किल्ली रत्नाकडे देऊन प्रीया जड अंतःकरणाने परत गेली.
सुव्रतने रोज सकाळी थोडेथोडे चाटण चाटायचे, दुध प्यायचे, सुर्यनमस्कार घालण्याचे व्रत सुरु केले. शाळेला जाताना तो गुरुबाबांच्या घरी जाऊन त्यांच्या फोटाला नमस्कार करुन निघत असे.
तसा तो हुशार होताच. पण आता त्याच्या बुद्धीला एक वेगळीच धार चढू लागली होती. शाळेत कोणत्याही सरांनी काहीही विचारले तरी क्षणात तो उत्तर देत असे. अगदी अवघड प्रश्नांनाही त्याचे उत्तर सर्वांआधी उत्तर देत असे. मुख्याध्यापकांनीही त्याची ब-याच वेळेस परीक्षा घेतली. तेही त्याची बुद्धी पाहून चकीत झाले. त्याला आता नववी, दहावीचेही प्रश्न सोडवता येऊ लागले.
एकदा जवळच राहणारा प्रकाशदादा काॕलेजचे काही काम करत होता. त्याला एक प्रश्न अडला होता. सुव्रतने ते पाहिले आणि वेगळ्याच प्रकारे तो प्रश्न सोडवायला सांगितले, आणि झटकन त्याचे उत्तर आले.
बातमी हां हां म्हणता त्या छोट्याशा गावात पसरली. मुले, मुली, शिक्षकही त्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याची परीक्षा घेण्यासाठी येऊ लागले. रत्नाने त्यांना संध्याकाळी थोडा वेळच येण्याची अट घातली. हा सर्व गुरुबाबांच्या चाटणाचाच परीणाम आहे हे समजण्यास त्यांना वेळ लागला नाही.
सुव्रतने तो डाॕक्टर होणार असल्याचे जाहीर केले. लॕपटाॕपमध्ये गुरुबाबा देत असलेल्या औषधांबद्दल लिहून ठेवले होतेच. चाटणाबद्दल तेव्हढे लिहीण्याचे राहून गेले होते. तरीही त्यात साधारण काय असेल ते त्याने ओळखून त्याने नोंद करुन ठेवले होते. प्रक्रीयामात्र ठरायची होती.
गुरुबाबांची औषधे सांगण्याचे काम त्याने सुरु केलेच होते. लोक बरेही होऊ लागले होते. रत्नाच्या सगळ्या प्रश्नांना तो ठाम उत्तरे देत असे. प्रीयाताईला रोज फोन करुन सांगत असे. तीलातर सुव्रत म्हणजे गुरुबाबांचेच रुप वाटू लागला होता.
चाटण बाटलीत होते तेव्हढेच. एकदा ते संपले आणि सुव्रतचे उत्तरोपनिषदसुद्धा. त्यामुळे प्रश्नकर्तेसुद्धा कमी होत गेले. त्याचेमात्र रत्ना आणि प्रीयाला बरे वाटले.
बृहस्पती होणे अकाली नसावे असेच त्यांचे मत होते. सुव्रत एकएक परीक्षा पास होत मोठ्ठा डाॕक्टर झाला. प्रीया मुद्दाम गावी आली. तीने गुरुबाबांच्या घराच्या जागी मोठ्ठे हाॕस्पीटल बांधुन दिले. आणि "बृहस्पती हाॕपीटल" झोकात सुरु झाले..

Comments