टेक्नीकल लोक........................................
"टेक्नीकलला मरण नाही बघ." असे माझ्या ओळखीतले कोणी मुलाला समजावून सांगत होते. म्हणजे मुलगा जरा अभ्यासात असातसा असावा. म्हणून उपदेश असेल. पण बोलत होते ते खोटे नव्हते व असणारही नाही .
असतात कोण हे टेक्नीकल लोक. त्यांना आपण आता सोयीसाठी टे.लो. म्हणू. ते आपल्या सभोवती असतात. अर्थात नियम असल्यासारखे वेळ पडली की ताबडतोब कोणीच भेटत नाही. पण येतात. अर्धा पाऊण तास इकडेतिकडे म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही. बर आले लगेच फाॕल्ट काढून निघुन गेले असे कधीच होत नाही. प्रथम नुसते बघतात. मग सायकल किंवा गाडीवरुन जाऊन हत्यारे घेवून येतात. मग आपल्यालाच चिठ्ठी करायला सांगून तुम्हीच सामान आणून द्या म्हणतात.
बरे आपण जाऊन सामान आणतो. दुकानदार बजावतो, त्या मिस्त्रीला पार्ट बाहेरुन बघायला सांगा. हाच असला तर ठीक. पॕकेट ऊघडले नाही तर बदलून देइन पॕकेट फोडले तर नाही वगैरे.
तो पार्ट दिला, बसला तर छान. नाहीतर पुन्हा बदलायचा. मग ते पार्ट बसवतात. आणि आपले काम संपते.
बरेच टे.लो. माझ्या खूप ओळखीचे, जवळचे आहेत. अर्थात नेहमीप्रमाणे सगळे टे.लो. असेच असतील असे नाही. नियम म्हणजे अपवाद आलेच. तरीही त्यांच्या वागण्याचा , बोलण्याचा म. सा. वी. काढायचे म्हटले तर तो असा निघेल. धंद्याचे गुण म्हणायचे.
टे.लो. अगदीच अकुशलच्या खूपच वर व इंजीनिअर लोकांच्या खाली असतात. ते तसे स्वतःला मानत नाहीत हा भाग वेगळा.
ते नळ दुरुस्त करणारे, इलेक्ट्रीशीयन , गाड्या दुरुस्त करणारे, मशीन दुरुस्त करणारे, रेडिओ, मोबाईल दुरुस्त करणारे, बांधकामावरील मुकादम, वगैरे काहीही असू शकतात.
कलाकार जन्मावा लागतो तसे हे टे.लो. म्हणूनच जन्माला येतात. शाळेत शक्यतो मागच्या बाकांवर सापडतात. नंतर कामापुरते काही गणिती हिशोब करत असले तरी गणित, इंग्रजी हे त्यांचे शत्रुच असतात. आता नापासच करत नाहीत म्हणून नववीपर्येंत जातात. दहावीला मागे राहिले की शाळा सोडतात. चुकून अकरावीला गेले तर बारावीला शाळा सोडतात.
कोणी आय.टी.आय. सारखे कोर्स करतात तर कोणी अनुभवानेच शिकतात. शाळेत अन्य कलांकडे म्हणजे चित्रे काढणे, डेकोरेशन करणे, प्रोजेक्ट करणे म्हणजे कागदावर काही चिकटवून आकार करणे यांत त्यांना भयंकर रस असतो. इतरांना हे येत नसल्यामुळे तेथे त्यांना फारच मान मिळतो.
एका वेळेस बरीच कौशल्ये त्यांना सहज जमतात. बाकीच्या मुलांची काॕलेजे वगैरे संपायच्या आत टे.लो. मिळवायलाही लागतात. परत त्यांची काॕलर ताठ होते.
वाटेल त्या गाड्या टे.लो. चालवू शकतात. लायसेन्स मिळवतात. निळा, जांभळा, लाल वाट्टेल त्या रंगाचे कपडे घालतात. ते त्यांना शोभूनही दिसतात. चकचकीत गाॕगल घालतात. इकडेतिकडे फिरावे लागते म्हणून कॕप घालतातच घालतात. गोल्डन बेल्टचे घड्याळ त्यांच्या विशेष आवडीचे असते.
सतत घाईघाईने कामे करतात. जरा एखाद्याचे काम सुरु केले, दुसरे गिऱ्हाईक आले की ते धरतात. मग एक एक करत कामे पूर्ण करतात.
कामावर आता युनीफाॕर्म असल्यासारखा नीळा ड्रेस घालतात. तसे कोणतेही कपडे त्यांना शोभतातच.
कोणत्या कामाचे किती पैसे वगैरे आधी सांगत नाहीत. उघडल्यावर बघू म्हणतात. नंतर हळूच सामाना येव्हढीच मजूरी सांगतात. "अवघड होते काम साहेब. तरी मी तुमचे दोन तीनशे वाचवलेच." असे आवर्जून सांगतात. तेंव्हा त्याचा आनंद वगैरे अजिबात वाटत नाही.
काम करत असताना त्यांना मागे हिंदी सिनेसंगीत विशेषतः रेडिओ सिटीच ऐकावेसे वाटते. काम झाले की पैसे शर्टच्या डाव्या खिशात ठेवतात. लिखाणाची वगैरे होस त्यांना नसते. जास्तीतजास्त अॕडव्हान्स लिहून ठेवतात.
जिवनाचा अत्यंत सुंदर विचार त्यांनी केलेला असतो म्हणजे " डोन्ट टेक लाईफ सिरीअसली " येव्हढाच. पण त्यामुळे त्यांच्या घरचेच जास्त काळजीत असतात.
चमचमीत आणि झणझणीत या दोनच चवी त्यांच्या अत्यंत आवडीच्या असतात. भजी, मिसळ, रस्सा असे पदार्थ जिव की प्राण असतात.
घड्याळाकडे फारसे पहात नाहीत. टे.लो. कितीही जागायला कितीही कमी झोप घ्यायला तयार असतात. मित्रांसाठी काहीही करायला तयार असतात.
कामे कशीही करुन घ्यायची सवय असल्यामुळे जरा शाॕर्टकट त्यांना चालतात. शिवाय "तुम्ही काय मार्केटात आलाय का कधी? तुम्हाला काय माहीती कामे कशी करुन घ्यायची ते असे म्हणतात. पण कामे करुन घेतात.
कोणाला मदत लागली, कोठे अपघात झाला तर पहिल्यांदा मदतीला धावतात. भांडणे निभावण्याची ताकद असते.
कामे करुन करुन थकतात. मग कोणी मुलगा, मुलगी शिकले, पुढे गेले की त्यांना आनंद होतो. वय झाले तरी काहीतरी करत बसतात व टेक्नीकल लोकांना कामाला मरण नाही हे सिद्ध करतात.
Comments
Post a Comment