गारवा............................................
खरा उन्हाळा सुरु झाला की गारव्याची आठवण येते. शब्द वाचला की त्याचा अर्थ आणि त्यासंबंधी इतर वस्तूही आपोआप मागेमागे येतात. ह्यालाच मनाचे खेळ म्हणतात ना?
खरा नैसर्गिक गारवा वेगळाच आणि बराच मोठा भाग व्यापणारा असतो. उन्हाळ्यात झाडांना आपण पाणी घालतो तरी पावसाची एक सर पडताच झाडे आणि पाने जास्तच टवटवीत होतात. अगदी आनंदी वाटू लागतात .
उन्हाळा यायला लागला की उसाचा रस आणि आईसक्रीमची आठवण येते. आता आपण वर्षभर त-हत-हेची आईसक्रीम खातो , कारण ती वर्षभर मिळतात.
लहानपणी आईसक्रीम हा फक्त ऊन्हाळ्यात खायचा पदार्थ असे. ती दोन चार दुकाने. बरीच ठरवाठरवी करुन एखाद्या दुपारी तेथे जायचे. काचेचे ते लहानसर दांडे असलेले विशिष्ठ ग्लास. चमचे. आईसक्रीमचे ते एक दोन गोळे, त्यावरील फळांचे तुकडे, चेरी बघत राहण्यासारखे असत. पण ते फारवेळ बघून चालायचे नाही. हळूहळू एक एक तुकडा जिभेवर ठेवायचा आणि बराच वेळ त्याची चव अनुभवायची. ते कधीतरीच असल्यामुळे त्याची चव वर्षभरच काय अजुनही कोठेतरी रेंगाळत असते.
तीच बाब उसाच्या रसाची .चैत्रागौरीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी रसाच्या घाण्यातुन कासंडीभर आणलेला रस, डाळ, संध्याकाळ थंडगार व चमचमीत करुन जात असे.
आईसक्रीम जसे दुकानात मिळे त्याहून जास्त पाॕटमधुन तयार केलेले जास्त आवडीचे ठरत असे.
प्रथम पाॕट आडिवरेकर यांच्याकडे भाड्याने मीळे, त्यांच्याकडे पाॕट रिकामे आहे का? याची चौकशी करावी लागे. त्यानंतर आईसक्रीम करण्यासाठी बर्फ आणणे हे काम मुलांकडेच असे.
हा बर्फ पौंडाच्या भाषेतच का विकला जातो हे कोडेच असे.तसा काही पौंड बर्फ आणून तो पोत्यात गुंडाळून ठेवावा लागत असे. नाहीतर आईसक्रीमच्या आधी , त्याचेच पाणी होऊन जायचे.
ह्या मुख्य पुर्वतया-या झाल्यानंतर प्रथम घरातील दुध उकळून थंड केलेले घेतले जाई. चुकून आंब्याच्या फोडी, रस असला तर दुधात घातला जाई. पाॕटचा मधला भाग धुऊन त्यात दूध घातले जाई. बाजुने फोडलेल्या बर्फाचे तुकडे व खडेमीठ घातले जाई. आता पाॕट जड आल्याशिवाय उघडायचे नाही असे ठरवुन पाॕट बंद केले जाई.
पाॕटमध्ये तसे बाकी तांत्रीक फारसे नसे. नेटाने कमीतकमी अर्धा तास फिरवायचे असे. बराच वेळ सरळ , नंतर उलटे सोपे पडते असे म्हणत उलटे फिरवले जाई.
आता खूप वेळ झाला. थोडे हातही भरुन येत. "बहुतेक झाले असेल." म्हणत पाॕट उघडले जाई. पाॕटच्या बाहेरच्या कडेला थोडे थोडे घट्ट आईसक्रीम जमायला सुरुवात झालेली असे. "आता होत आले आहे." म्हणत नव्या दमाचे कोणी फिरवण्यास पुढे येत. पुन्हा बराच वेळ फिरवून झाल्यावर पाॕट उघडले जाई.
आता आईसक्रीम ब-यापैकी जमत आलेले असे. घरात आईसक्रीमचे कप कुठले असायला? एक दोन असले तर. नाहीतर वाट्या, प्लेटस, मिळतील तसले चमचे घेऊन घरातील सर्वांना ते वाटण्यात येई. थोडीशी तृप्ती झाल्यानंतर आपापल्या वाट्या , प्लेट लक्षात ठेऊन दुसऱ्या घाण्याची म्हणजे पाॕटची तयारी सुरु होई.
घरातले दुध संपले तर डेअरीतुन पुन्हा दूध आणाले जाई. ते फ्रीझरचे असल्यामुळे बरेच थंड असे. आता ते पुन्हा उकळून थंड करण्याची जरुरीही वाटत नसे. ते तसेच पाॕटमध्ये घातले जाई.
काही मित्र पहिल्यापासून हजर असत. काही हळूहळू नंतर येत. तेही पाॕट फिरवायला लागत. आता बर्फ बराच वितळून थंड पाणी पाॕटमधून बाहेर यायला लागले असे.
दुसरा घाणा त्यामानाने लवकर तयार होत असे. तो संपवून तिस-यांदा फिरवायला कोणाचीच शक्ती उरलेली नसे. मग ते अर्धवट पातळसर आईसक्रीम पियुष असेच असते म्हणत फस्त होई.
आता दुपार संपून चांगली संध्याकाळ व्हायला येई. "आता बास ." असे मोठ्यांनी म्हणण्याची वाटच बघत असत. सगळा पसारा आवरुन, पाॕट , स्वच्छ धुवून परत केले जाई.
त्या थंडगार थोडे घट्ट, थोडे पातळ आईसक्रीमच्या आठवणी आणि गप्पा परत पुढचा मे महीना येईपर्यंत पुरत असत.
आता कोणत्याही त-हेचे, रंगाचे, तिखट , फ्लेक्स, स्मुथ, रुम टेंपरेचरचे, पेरु, जांभूळ, मिरची, कोकोनट आईसक्रीम खाल्ले तरी कधीतरीच मिळणाऱ्या पाॕट आईसक्रीमची स्वतः करण्याची, खाण्याची मजा औरच म्हणावी लागेल..
Comments
Post a Comment