गोखले बंधु .........................................

 परवाच डाॕ. अवीनाश गोखले यांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. अत्यंत वाईट वाटले. आपल्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा असणारा, हसत , खेळत जगणारा डाॕक्टर असल्यामुळे असेलच पण गोखले असल्यामुळे अत्यंत सरळ व मध्यममार्गी मित्राचे एक्झीट चटका लावून जाते.

त्या निमीत्ताने गोखल्यांच्या चार आठवणी सांगायचे योजले आहे. तसे सगळे चारचौघांसारखे असले तर सांगायचे काय? पण या गोखल्यांकडे चारचौघांसारखे नसलेले खूप आहे म्हणून सांगण्याचा मोह होतो.
भाऊ, भाऊ सारखे आहेत , एकमताने वागणारे आहेत असे आपण कधीकधी ऐकतो. परंतु सर्व भाऊ, वडील , आई सगळेच्या सगळे एकमताने वागणारे , बोलणारे असतील तर त्याला चमत्काराशीवाय दुसरे नाव शोभणार नाही.
असो. ही झाली पार्श्वभूमी . ह्या गोखल्यांचा एक मोठ्ठाच्या मोठ्ठा वाडा होता. आता अपार्टमेंट झाली आहेत. गोखल्यांचे कोणी पूर्वज सरदार होते म्हणे. वाड्याची भिंत भक्कम दगडी. वीस फूट तरी ऊंच व चारी बाजू पाहता दोनएकशे फूट लांब असावी. भक्कम दरवाजा, त्याला मोठ्ठा गोलाकार लाकडी अडणा अशी व्यवस्था होती. तटावर जाण्यासाठी भिंतीतच दगडी जीना.
मध्ये मोठ्ठी रिकामी जागा एखाद्या क्रीडांगणासारखी. आजूबाजूला झाडे. एक पेरुचे झाड. त्याला भरपूर पेरु लागत. ते खूप गोड असायचे. कोणाचेही मित्र आले की त्यांना ते देत असत. काही फुलांची झाडे होती.
सध्याच्या भाषेत दहा गुंठ्यांचा वाडा असेल. बांधकामच पाच सहा गुंठ्यांचे असेल.
गोखले मालक एकदम डावीकडच्या जुन्या दुमजली घरात रहात. तेथेही बाहेरच्या खोल्यात एक भाडेकरु होते. शिवाय वाड्याच्या उजवीकडील भागात पाच सहा भाडेकरु होते. भाडेकरुंकडेच सध्याच्या घरांपेक्षा जास्त मोठी जागा होती. सगळे मजेत रहात असत.
सर्व गोखले म्हणजे जयंता, केशव, सुरेश, अवी, रवी ,.. गोरेपान, उंच , तालमीत जात असल्यामुळे धष्टपुष्ट दिसत नसले तरी काटक व ताकदवान असत. कोणीही न सांगता वृत्ती काटकसरी , स्वतःची सर्व कामे स्वतः करत. स्वच्छ पांढरे लेंगे घरात तर बाहेर शर्ट पँट वापरत.
प्रत्येकाची प्रथम सायकल होती. तीची सर्व कामे म्हणजे हवा भरणे, पंक्चर काढणे, ओव्हर हाॕलींग करणेसुद्धा स्वतः करत. एक सायकल दुकानदार होते. " काय पाहिजे. सुलेचन पाहिजे का? ते घेऊन जा बघ." म्हणायचे. त्यांच्याकडून सुलेचन म्हणजे सायल पंक्चर काढण्याचे सोल्युशन आणायचे. खूप नंतर जयंताने ल्युना घेतली. कंपनीने तीचे ऊत्पादन थांबवले तरी जयंताची ल्युना ऊत्तम देखभाल असल्यामुळे छान चालत होती. अजूनही असेल कदाचित .
जयंताबरोबर लेग बॕलन्स , जॕपनीज बॕरल, अॕक्रोबॕटस, काॕमीक आयटम करता करता त्यांच्या वाड्यात जाऊ लागलो,वर्षानुवर्षे गेलो. अशी वाड्यात जाणारी पंचवीस तरी मुले होती. सगळे सगळ्यांचे मित्र. खेळ, गप्पा, चिडवाचिडवी वगैरे सगळे असायचे.
जयंताच माझ्याहुन सहा, सात वर्षे मोठा तर रवी लहान. वयांचे बंधन वगैरे नसेच. छंद म्हणजे वेगवेगळे खेळ . मॕचेसची काॕमेंट्री, सहा वाजताचे स्पोर्टस राऊंड आऊट हे दहा मिनीटांचे बातमीपत्र व्हाॕल्व्हच्या रेडिओवर ऐकणे, तालीम करणे ,पोहणे असे सशक्त होते.
त्या ग्राऊंडवर घरीच सायकलच्या ट्युबच्या रबरांनी केलेल्या चेंडू व घरीच केलेली लाकडी बॕट यांनी क्रिकेट, गोट्या, बॕडमींटन , असे खेळ रंगत. कधी जयंता मुलांचे गणिताचे क्लास घेई.
रवींद्र म्हणजे रवी चव्हाणचा भाऊ ऊत्तम चित्रकार होता. त्याची चित्रे पहायची. त्यांच्याकडे एक मुलगा पाहुणा आलेला. तो " थुलड्या बोतले, बोदला, था इंच तोपी उडीवतो." म्हणजे" सुरशा गोखले बोदला(जाड) . सहा ईंच टोपी ऊडवतो." असे सांगितले जाई.
कुमार गोखले, राजा गोखले, सुबोध गोरे, सुरेंद्र गोरे हे सगळे भाऊ, निळकंठ शिवाय प्रत्येक भावाचे वेगळे मित्र यायचे. त्यांना बहीण नसल्यामुळे मुलींचा वावर नगण्य असे.
श्रावणात मात्र हळदी कुंकवाचे वेळेस, दिवाळीत मुलांनाच बोलावले जाई. तेंव्हा आऊताई दाण्यांची ऊसळ करत. ती कुठेच खाल्ली नसल्याने भारीच वाटत असे. येव्हढ्या बलवानांना सकाळ संध्याकाळ जेवायला खायला घालायचे ह्यातच त्यांचे दिवस जात.
ऊन्हाळ्यात गोखल्यांच्या शेतातील विहीरीत कीती जण पोहायला यायचे , कितीजण शिकले याची गणना करणे सुद्धा शक्य नाही. जयंताचे वडील राजाभाऊ सरकारी नोकरीत होते. ते संध्याकाळी यायचे.
सर्व गोखले बंधू काहीना काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करायचे.जयंता लेग बॕलन्स , केशव रोल बॕलन्स, जगलींग, सुरेश फ्राॕग अॕक्ट, ग्लास बॕलन्स असे. त्यातसुद्धा ते येत थोडे वार्म अप करुन आपापले प्रॕक्टीस करुन निघुन जात. तालमीच्या अन्य राजकारणात ते चुकूनही पडत नसत.
संध्याकाळी तालमीनंतर फिरायला जायचा आमचा एक कार्यक्रम असे. जयंता सायकल घेऊन येई. मग रोज लांब फिरणे कधी सोडा लेमन, मिक्स पिणे अगदीच कधीतरी मिसळ असे साधे सोपे आयुष्य होते.
प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात पुढे गेला. जयंताने , केशवाने रवीने ईंजिनिअरींग क्षेत्र पकडले. अवी डाॕक्टर झाला. तो गुहागरला असता त्याला भेटण्याच्या , त्याचे छानसे साम्राज्य पहाण्याचा योग आला होता. तेथेही त्याचे वागणे तसेच छान, सोज्वळ , शिस्तीचे होते.
आता त्या प्रत्येकाचे कुटुंब झाले. कामानिमीत्त कोणी इकडेतिकडे पांगले. आता अवी गेला म्हणता इतके सगळे जागे झाले. जाणे येणे चालले आहे. आज तो उद्या आणखी कोणी . गोखले बंधु व गोखले मात्र मनात जसाच्या तसाच राहणार आहे.

Comments