मैत्री ........................................

 आज काय लिहावे विचार करता हा सदाबहार विषय घ्यावा असे वाटले. मैत्री हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रेमाचा विषय असतो.

मैत्री कोणाशी कशी व्हावी याचे गणित नसते. रुप, रंग, लींग,धर्म, वय,व्यवसाय, पक्ष, हे काहीही मैत्रीच्या आड येत नाहीत. येऊ नयेत. परंतु राजकीय मते, धार्मिक मते याबाबतीत आपण संवेदनाशील असतो. ते कधीकधी मैत्रीच्या आड येऊ शकतात.
आता फेसबुक, व्हाॕटअॕपमुळे आभासी मैत्री हा नवा आयाम खुला झाला आहे. त्याचाही सर्वजण भरपूर ऊपयोग करुन घेत आहोत. तसे म्हटले तर हा मार्ग सर्वात सुरक्षीत व सुंदर आहे. देणे नाही, घेणे नाही, हवी तेंव्हा हवी तितकी ही मैत्री असते. तरीही काही ऊपदव्यापी तीचा कधीकधी गैरफायदा घेतात.
खरी मैत्री मात्र प्रत्यक्ष भेटीगाठी बोलण्यातुन सुखदुखाःत सहभागी होण्यातुनच तयार होते, फुलते व वाढते.
चारचौघात स्तुती परंतु एकांतात चुकांचा स्पष्ट उल्लेख करुन चार चांगल्या हिताच्या गोष्टी सांगतो तो खरा मित्र असतो. हक्काने कामे सांगण्यास रात्री अपरात्रीसुद्धा उठवू शकतो तो मित्र असतो.
घरच्यांनासुद्धा एखादी गोष्ट , समस्या माणूस सांगणार नाही पण मित्रांना सहज सांगण्यास काहीच वाटत नाही कारण तेथे हसे होणार नाही, उलट झाली तर मदतच होईल याची खात्री असते.
शाळा, काॕलेज, क्लास, कामाच्या जागा, प्रवास ह्या सगळ्या जागी सगळ्यांना वेगवेगळे मित्र, स्नेही, सहकारी असतात. परंतु खरे मित्र थोडेच असतात. संत , महंतांच्या भक्तांचे नेहमीचे, कधीतरीचे, बाहेरच्या वर्तुळातले, आतल्या वर्तुळातले असे प्रकार असतात म्हणे. तसेच काहीसे मित्रांचे असते. दिसायला खूप मित्र असले तरी खरे मित्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच असतात व असावेत असे मला वाटते.
वेगवेगळी कामे करणारे , कला , वैद्यकीय , तंत्रज्ञान , संगीत, शिक्षण, कायदा, शासकीय क्षेत्रातले असे. म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारायला ,ज्ञानाचे, कामाचे, अनुभवाचे, नवीननवीन पैलू जाणून घ्यायला मस्त मजा येते.
हसणे खिदळणे, चेष्टा मस्करी करणे, हिंडणे , फिरणे, हे मैत्रीचे विशेष असतात. अगदी पहिली दुसरीत एकत्र असणारे मित्रसुद्धा कित्येक वर्षानंतर भेटले तरी काही फरक नाही. मैत्रीचा झरा अखंड वाहणारा असतो.
शाळेतुन निघताना प्रचंड पाऊस पडत आहे, भिजत भिजत मित्रांना त्यांच्या घरी सोडायला जात आहोत हे दृश्य मला मित्र आठवले नाहीत तरी सतत आठवत असते.
पहिलीपासून, काॕलेजपर्येंत एकत्र असणारा माझा मित्र शिरीष उर्फ सुमंत माझ्यासारखाच दिसायचा व दिसतो. दोघेही साधारण तेव्हढ्याच उंचीचे , दोघेही चष्मा घालणारे त्यामुळे काॕलेजात ब-याच प्राध्यापकांना आमच्यातील फरकच कळत नसे.काही कारणाने एकाला काही सांगायचे, ओरडायचे असले की हमखास दुसऱ्याला पकडले जाई. एकाला मजा वाटे, दुसरा ऊगाच बोलणे खाई.
बदल्यांच्या नोक-या तर मित्र मिळण्यास खूप उपयोगी ठरतात. न्यायदानाच्या क्षेत्रात असुनही वेगवेगळे छंद जोपासणारे अनेक जण आहेत.
माझे एक मित्र मुळे बरेच दिवस सेल्सच्या क्षेत्रात होते. माणसांना हाताळण्याची , भरपूर वस्तू , भाजीपाला ,खरेदी करण्याची, फिरण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. त्यांच्याकडून एकेक किस्से ऐकताना तासंतास कसे जातात पत्तासुद्धा लागत नाही.
दबडगावकर आहेत त्यांना काॕमर्स क्षेत्राची विशेष आवड व माहिती आहे. वस्तूंच्या उपयोगीतेचा सिद्धांत , पैसे व्यवस्थीत साठवण्याचे, वाढवण्याचे त्यांचे तंत्र खास आहे.काॕमर्सचे सिद्धांत ते जगून दाखवतात.
कालीदास नांदेडकर हे उत्तम गायक आहेत. संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. सुनील वेदपाठक हे उत्तम चित्रकार व लेखक आहेत. अशांच्या संगतीत दिवस, महीनेच काय वर्षेही गेलेली समजत नाही.
हातरोटे, लोथे पाटील, ढाले , बगे हे सगळे घरचेच असल्यासारखे नाहीत तर घरचेच आहेत.
मुंबईला आमचा एक कवितांचा ग्रुप होता. दहा पंधरा जण दर महिन्याच्या शेवटच्या शनीवारी जमायचे. प्रत्येकाने नविन लिहीलेली एकच कविता सादर करायची. दादा देशपांडेच्या घरी जमायचे.
टि.व्ही. वरच्या नाचगाण्यावर मी कविता लिहीली
"लज्जा"
लाजायचे कुणासाठी,
सा-यानीच जर लाज सोडली.
आम्हीच काय पाप केले
थोडी कुठे भिड मोडली.
वगैरे. तेंव्हा एक जेष्ठ कवीयत्री मोत्रीण म्हणाली, " अहो , तुम्हाला दिसते तसे नसते. ते सगळे खोटे असते. " तेंव्हा माझी ट्युब पेटली.
एक न्यायाधीश कवीसुद्धा होते. त्यांना त्यांचे मित्र म्हणायचे ," ही इझ अ पोएट अमंग जज्जेस अँड ए जज्ज अमंग पोएटस." म्हणजे दोन्हीकडे बोंब. अशा मजा मित्रच करु जाणतात.
तालमीच्या , नाटकाच्या, साहित्याच्या, कवितेच्या,संगीत ऐकणाच्या छंदांमुळे माला सर्व वयाचे खूप मित्र आहेत. म्हणून आयुष्य जगण्याची शान आहे.
शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे सर्व भुतांशी म्हणजे जिवांशी मैत्री झाली तर आपण सर्वच आहोत ही भावना निर्माण होईल , त्यातुन अहंकार जाईल. त्याची वाट पहायची.

Comments