"त्यात काय?" तात्या.....................................
ते अत्यंत लोकप्रिय होते. वेगवेगळ्या कारणांसाठी. अगदी गल्लीतल्या मुलांपासुन मोठमोठया अधिका-यांपर्येंत सगळेजण त्यांना ओळखायचे उत्तम प्रशासक, साध्या राहणीचे मार्गदर्शक तर काहीजण प्रवास सहाय्यक म्हणून . ज्या शाळेत ते शिक्षक, मुख्याध्यापकही होते तेथेही ते जास्त प्रशासकच होते.
म.वि. साठ्ये हे त्यांचे नाव. पण ओळख घरच्या तात्या नावानेच असायची. राधा गोविंद धाम आसे लिहीलेल्या वाड्यात ते व त्यांचे भाऊ रहायचे. आसेतु हिमाचल ग्रंथाचे कर्ते साठ्ये यांचे निवासस्थान असेही त्यावर लिहीले होते.
लहानपणी सगळे मोठे जरा भितीदायक वाटतात तेव्हढेच. एरव्ही ते सगळ्यांशी मित्रासारखेच वागायचे, बोलायचे. शिक्षकी पेशात असल्यामुळे सगळे शाळेतली मुले आहेत असे वागायची सवय.
पावणे सहा फुट उंची . साधे पँट, शर्ट असे कपडे.कधी लांब हाताचा स्वेटर कानटोपी घालायचे. जरा लांब जायचे असले तर दुचाकी, एरव्ही सर्वत्र चालतच फिरत असायचे. बोलताना सतत ऊजव्या हाताचा अंगठा आणी पहिले बोट जोडून ज्ञानमुद्रेसारखे धरायचे आणी "त्यात काय लेका , येव्हढं कळल तर बघ?" असे म्हणायची सवय.
वैद्य म.द. करमरकर ऊर्फ आप्पा अंबाबाई तालमीचे बराच काळ चिटणीस होते. नंतर बराच काळ तात्या चिटणीस होते. तालमीच्या कार्यक्रमांच्या नियोजनात ते असत. पुर्वी कधी त्यांनी व्यायाम केला असेल. एरव्ही ते व्यायामशाळेपेक्षा आॕफीसमध्येच शोभून दिसत.
ते ज्या विद्यामंदिरात शिकवायचे तेथे विद्यार्थीप्रिय होते ते शिक्षण फारसे गंभीरतेने घेण्याचे कारण नाही या विचारानेच असावेत. त्यांचा विषय शास्त्र होता. परंतु त्यांना अन्य विषयात म्हणजे ट्रीप, दौरे यांत जास्त रस असे.
"विज्ञान म्हणजे काय, ते जरा पुस्तक वाचुन बघ, म्हणजे कळतय. " असा विचार. "ऊष्णता म्हणजे चुलीपुढे बसल्यावर कळेल." असे सांगायचे. पुस्तक बाजूला ठेवायला सांगणारे शिक्षक अर्थातच विद्यार्थीप्रिय होणारच.
मग कोणीतरी सहलीचा विषय काढे आणी तात्यांचा माहितीचा धबधबा कोसळू लागे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्येंत आणी आसामपासुन गुजरात पर्येंत भारत त्यांनी अनेकवेळा पालथा घातला. काही फिल्म बनवल्या. त्यांचे कार्यक्रम केले.
ती सगळी माहिती तोंडपाठ असे.कोणत्या गाड्या कोठपर्येंत जातात, कोणता रुट सोपा पडेल, स्वस्त पडेल हे सगळे त्यांना माहिती असे. ती माहिती हवी असणा-यांना देण्याची आवडही असे. त्यामुळे माणसे रेल्वे टाईम टेबल वगैरेपेक्षा तात्यांना विचार असे म्हणायची. जरा सवड मिळाली की तात्या प्रवासातच असत.
तेंव्हा जेवणखाण्याची व्यवस्था , चार कपडे घेतले की झाली तयारी. मग ते इच्छुक लोकांची टीम करायचे आणी सरळ बाहेर पडायचे . ट्रीप म्हणजे सगळा उत्तर भारत वीस दिवस. दक्षिण भारत पंचवीस दिवस अशा असत. गरजा आणी अपेक्षा न्यूनतम असल्यामुळे तात्यांसारखा गाईड बरोबर मग काय विचारता सगळे खूश होऊन जात.
बी.एस सी. झाल्यानंतर असाच कोठेतरी जात होतो . शाळेचे कोणीतरी भेटले. " तू बी.एस सी . झालास ना? आता काय करतोस.?"" काही नाही." असे म्हटल्यावर ये उद्यापासून शाळेत.आणी लागली शाळेत नोकरी. असे तात्या त्यांना नोकरी कसे लागली ते सांगत.
संध्याकाळी देवांना जायचे, तालमीकडे चक्कर मारायचे असा त्यांचा दिनक्रम असे. चार जण याला लागले, बसायला बोलायला लागले की आपोआप कामाचे काहीतरी नीघतेच असा साधा विचार असे. आणी तसेच व्हायचे. मोठमोठया कार्यक्रमांचे नियोजन सहज होत असे.
कार्यक्रमाला पाहुणे कोणाला बोलावु या म्हटल्यावर "मी अगदी कलेक्टरलाही आणतो, त्याच्याशी चार शब्द बोलायला आहे का कोणाची तयारी?" असे म्हणायचे.
पाहूणे आले. कार्यक्रम आता सुरु करायचा. तात्या आले नाहीत. आता कसे करायचे म्हणेपर्येंत तात्या यायचे आणी कार्यक्रमाचा ताबा घ्यायचा. सगळा इतीहास, जुनी नवी माणसे सगळे माहिती असल्यामुळे इतरांना चिंता उरत नसे.
कोणत्याही विषयावर लिहायला बोलायला सांगितले तरी तात्या तयार असत. एकदा बी.पी एड .च्या प्राध्यापकांसमोर शिकवावे कसे याचा तात्यांनी तास दिडतास क्लास घेतल्याचे मित्र सांगत होते.
ब्रीज खेळणा-यांचा एक ग्रुप होता. तेथेही तात्या संध्याकाळी जात असत. दिवाळीनंतर तीन चार दिवस तात्याच्या घरात माडीवर पट चालत असे.
नवीन लोकांना खेळ कळायलाच दोन तीन दिवस जात. मग ते दान टाकणे, सोंगट्या फिरवणे वगैरे प्रकार चालत. तासंतास डाव चालत असे. मध्येच चहा , भडंग असे काहीना काही होत असे . त्या डावांच्या आठवणी त्यांना वर्षभर पुरत असाव्यात.
के.सी. आपटे .म्हणजे काका हे तात्यांचे दोस्त. दर एक दोन दिवसाआड तात्या काकांकडे जात असत. सतत तालमीचे काम लिखाण असे काहीना काही चालत असे.
लोकांशी सतत संपर्क, रोजचे काम सोडून समाजासाठी काहीना काही प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत होते म्हणून इतर करमणूक लागतच नसे. घरचे खाऊन बाहेरची कामे करायची तंदुरुस्त रहायचे. मारुतीरायावर श्रद्धा बस्स बाकी काही लागत नसे. आजार नव्हते असे नाही. पण त्यांचे स्तोम माजवणे पसंत नव्हते.
"दुपारी ये गप्पा मारायला " असे सांगितल्यावर एकदा गेलो. चांगले दोन तीन तास वेगवेगळ्या विषयांवर नुसत्या गप्पा. मस्त मजा आली आणी मोठ्यांबरोबरच्या गप्पातली गंमत समजली.
"शाळेचे वीस बावीस दावे मी खेळलोय आणी जिंकलोय." असे अभिमानाने सांगायचे. त्यांचे वकिल , चार्टर्ड अकौंटंट ठरलेले असायचे. त्यांच्याकडे तात्या येत जात असत. त्यांना माहिती देत असत. म्हणजे आत्ताचे ब्रिफींग करायचे. माहिती ह्यांनाच जास्त असायची.
बरोबरचे एक एक सहकारी कारणा कारणाने गेले तसे किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तात्यासुद्धा गेले. आत्ता कुठे चार पावसाळे पाहिल्यावर तात्या सगळ्यांना " त्यात काय लेका?" म्हणायचे ते कळंतय.
Comments
Post a Comment