ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ - लेखांक --५

 विषय प्रवेश --ठरल्याप्रमाणे आपण आता या कायद्याच्या संकल्पनातुन माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु करु.

सर्वात महत्त्वाचा अर्थात ग्राहक. ग्राहक कोणाला म्हणावे हे महत्वाचे आहे. कारण आपण जर ग्राहक असलो तरच आपल्याला तक्रार करता येणार .
ग्राहक या शब्दाची व्याख्या दोन प्रकारात केली आहे.
१)जो व्यक्ती एखादी वस्तू मोल देऊन विकत घेतो तो.
२)किंवा जो व्यक्ती पहिल्याच्या म्हणजे मुळ वस्तू विकत घेणा-याच्या संमतीने वापर करतो तो.
हे वस्तू घेणे पैसे देऊन, किंवा उधारीने, किंवा काही रोख व काही ऊधारी असे असू शकते.
याला दोन अपवादही केले आहेत. एक वस्तू पुन्हा विक्रीसाठी नसली पाहिजे किंवा ती व्यापारी म्हणजे पैसे मिळवण्याच्या हेतूने घेतलेली नसली पाहिजे .
म्हणजे थोडक्यात नावाप्रमाणे ह्या व्याख्यांचा उद्देश सामान्य ग्राहकांच्या हितासाठी आहे. व्यावसायीकांच्यासाठी नाही. ते त्यांच्या तक्रारी दिवाणी न्यायालयापुढे नेऊ शकतात.
व्यावसायिक वापरातसुद्धा सुद्धा एक सुट आहे. ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने वस्तू स्वतःच्या ऊपजिवीकेसाठी किंवा स्वतःच्या चरितार्थासाठी घेतली असेल तर तो वापर व्यावसायिक समजला जाणार नाही.
म्हणजे एखाद्याने स्वतः व कुटुंबीय चालवत असलेल्या हाॕटेलसाठी किंवा स्वतःच्या छोट्याशा वर्कशाॕपसाठी वस्तू घेतली व ती खराब झाली तर त्याला ग्राहक म्हणता येईल. एखाद्या भाजी विक्रेत्याने स्वतःच्या व्यवसायासाठी गाडी घेतली , ती खराब झाली तरी तो ग्राहक होईल.
वस्तू एकाने विकत घेऊन दुसऱ्यास भेट दिली, वापरायला दिली व तीच्यात काही बिघाड झाला तर तो दुसरा वापरणारा सुद्धा ग्राहक म्हणवला जाईल. तो स्वतः त्या हक्काने तक्रार करु शकेल.
असाच प्रकार व्यक्ती जेंव्हा मोल देऊन , किंवा देण्याचे वचन देऊन म्हणजे थोडक्यात ऊधारीने किंवा थोडी रोख थोडी ऊधारीने काही सेवा घेईल व त्यात त्रुटी निघेल तर तो व्यक्ती ग्राहक ठरतो.
यात सुद्धा सेवेचा वापर करणारा अन्य व्यक्ती , ग्राहक होऊ शकतो. व्यावसायिक वापरास येथे परवानगी नसणे हे सुद्धा वरीलप्रमाणेच असते.
हे वस्तू किंवा सेवा घेणे प्रत्यक्ष बाजारातून किंवा आॕनलाईन , ईलेक्ट्राॕनिक माध्यमातून झाले असले तरी चालते.
लगेच आम्हाला प्रश्न पडतो की अशा खरेदीची पावती वगैरे घेणे अत्यावश्यकच आहे का ?
मोठ्या व्यवहारात अर्थातच आपल्याकडे पावती, इनव्हाईस, डिलेव्हरी चलन, काहीतरी असतेच.
अगदी छोट्या पाच, दहा , पन्नास , शंभर किंवा काही वेळा काही हजारांच्या व्यवहारातही प्रत्यक्ष पावती नसते. परंतु आपण वस्तू किंवा सेवा विकत किंवा ऊधार घेतली हे दाखवायला तर हवे. त्यासाठी त्याला पाठवलेल्या नोटिसीचे, पत्राचे ऊत्तर, ई. मेल. फोटो, असे काही असेल तर तेही व्यवहार सिद्ध करु शकेल. पावती असणे हे सर्वोत्तम .
वस्तू म्हणजे काय याबाबत स्पष्टीकरणाची जरुरी नसावी. वस्तू म्हणजे कोणतीही "चल" बाब. त्यात अन्न सुरक्षा व नियामक कायद्यात लिहीलेले अन्नसुद्धा वस्तू समजले जाते.
आता सेवा म्हणजे काय हे पाहणेही आवश्यक ठरेल. सेवा म्हणजे बँकींग, आर्थिक , विमा, दळणवळण, प्रक्रीया ऊद्योग, विद्युत किंवा इतर उर्जा व त्यांचे वहन, दूरसंचार, राहणे, जेवणे,बांधकाम, करमणूक ,बातम्या किंवा माहिती मिळवणे असे.
ही व्याख्या येव्हढ्यापुरती मर्यादित नाही असेही म्हटले आहे. म्हणजे अशा अनेक सेवा असू शकतील.
यालासुद्धा दोन अपवाद आहेत. एक जी सेवा फुकट दिली जाते, जीचे मोल घेतले जात नाही ती व जी सेवा करारानुसार व्यक्तीला दिली जाते ती.
आज येव्हढे पुरे. पुढील वेळी वस्तूत खराबी म्हणजे काय ? सेवेत त्रुटी म्हणजे काय? अनुचित व्यापार प्रथा म्हणजे काय ? ते पाहू.

Comments