एस. ए. टू आय. एन................................

 "साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ." असे तुकोबा म्हणाले. तो योग आपल्याला येणे अवघड. कारण एकतर साधुसंतच कमी झालेत . आहेत ते थोर समाजसेवी आपल्याकडे कशाला फिरकतात. माझ्यासाठी आमच्या क्षेत्रातले ऊच्चपदस्थ , विद्वान असुनही सरळ, साधे असणारे अनेक न्यायमूर्ती हेच साधुसंत.

प्रस्तावना फार झाली. भेटीगाठी या सदरात आता एकच भर घालून हा अध्याय संपवू. चिपळूणचे तालुका न्यायालय. आमच्याकडे जिल्हा न्यायाधीश, काही निमीत्ताने, न्यायमूर्ती येत असतात.
एकदा बारचे अध्यक्ष वकिल मंडळी भेटायला आली. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर म्हणाले, "पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती येणार आहेत. ते आपल्या न्यायालयाला भेट देऊ इच्छीतात . ते येऊदेत का? " मी उडालोच. एकदम परदेशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती . आमच्या इटकुश्या न्यायालयात. मी कोण आणी कसा नाही म्हणणार. कोणीही कोणत्याही न्यायालयात येऊ शकतो. बसू शकतो. ऐकू शकतो.
पण हे कसे काय शक्य होणार. तर म्हणाले, " न्यायमूर्तींचे मुळ गाव चिपळूणजवळ आहे. पिढ्यानपिढ्या ते दक्षिण आफ्रिकेतच राहतात. आता ते काही सुटीवर गावाकडे येणार आहेत. एक दिवस चिपळूणमध्ये असतील. " मग व्यवस्थांची चर्चा. तर ते साहेब एके ठिकाणी येणार होते. तेथे सकाळी जाऊन त्यांचे स्वागत करायचे. नंतर ते म्हणतील तसे.
न्यायालये रोज सकाळी स्वच्छ केली जातातच. तरीही संध्याकाळपर्येंत खूप कचरा होतो. कोकणातील लोक तर स्वच्छतेच्या बाबतीत अती तत्पर. त्यांना तसे करावेच लागते. नाहीतर कधी साप विंचू येऊन बसेल सांगता येत नाही. छोटी छोटी घरे सुद्धा चकचकीत स्वच्छ असतात. छान वाटते. तसे कोर्टसुद्धा स्वच्छ करुन ठेवले.
सर्वजण साहेबांना भेटायला गेलो. हाॕलमध्ये लोकांची खूप गर्दी . साहेब मध्यभागी कोचावर बसलेले. ऊंच, तगडे, सुटाबुटात होते. आपल्या कल्पनेतील आफ्रिकनसारखे नाहीत तर आपल्यासारखेच दिसत होते. चेहरा करारी पण शांत. आम्ही गेल्यावर गर्दी पांगली. साहेबांनी कोर्टाबद्दल, कामांबद्दल आस्थेने चौकशी केली.
"मला इथल्या कोर्टातील पुरावा नोंदवण्याचे काम कसे चालते ते पहायचे आहे. " आता आली का पंचाईत. आमच्याकडे कामे कसली. रेकाॕर्डिंग कसले. त्यांना काय वाटेल. पण म्हटले. जरुर . करतो व्यवस्था. आमच्याकडे जिल्हा न्यायाधीश तपासणीसाठी आल्यानंतर आमच्याबरोबर न्यायासनावरच दुसरी खूर्ची टाकून बसतात. तर म्हणाले "तसे नाही. मी समोर कोर्ट हाॕलमध्ये बसेन. " एक मोठी भिती संपली तर दुसरी ऊभी. आपण वर बसणार आणि साहेब हाॕलमध्ये वकिलांबरोबर खुर्चीवर . त्यांना काही वेगळे वाटत नव्हते पण मला फारच वेगळे वाटत होते. करणार काय. "ठिक आहे. तसे तर तसे. " म्हणालो. वेळा ठरल्या. दुपारच्या सुटीनंतर एखाद्या फौजदारी प्रकरणातील साक्षीदार घ्यायचे ठरले. सरकारी वकिल होतेच. रोजचेच काम, प्रकार वेगळा. नंतर वकिलांच्या बारमध्ये चहापाणी. क्वाॕर्टर कोर्टाच्या मागेच. "दोन मिनीटे घरी पण या, " म्हणालो. "हो." म्हणाले. आम्ही निघालो.
दहा साडेदहा वाजलेच होते. घरी आलो. आवरले. कोर्टात सकाळची कामे घेतली. सरकारी वकिलांना साक्षीदाराला वेळेवर हजर ठेवायला, सरतपास मुद्देसुद घ्यायला सांगितले .
दुपार झाली. सुटी संपवुन डायसवर जाऊन बसलो. पहिली कामे संपली. साहेब येऊन बसल्याचे समजले. साक्षीदाराची साक्ष चालु केली. चोरीचे वगैरे प्रकरण असावे.
साहेब येऊन बसले. कोर्ट हाॕल तुडुंब भरलेला. मी मान झुकवुन साहेबांना प्रणाम केला. एकदा डायसवर बसल्यावर कितीही ऊच्च पदस्थ आले तरी ऊठायचे नसते. मान झुकवुन आदर दाखवायचा असा नियम.
सरकारी वकिलांनी त्यांच्या पद्धतीने इकडचे तिकडचे प्रश्न विचारुन मुद्देमाल त्याच्याकडून ओळखून घेऊन सरतपास संपवला. आरोपीचे वकिल तयारच होते."मुद्देमाल तुमचाच दाखविण्यासाठी पुरावा नाही. चोरी करताना आरोपीला पाहिले नाही. वगैरे. " पुरावा मराठी व इंग्रजीत नोंदवला. यथावकाश साक्ष पूर्ण झाली. बाकी फार काम नव्हते. मी चेंबरमध्ये गेलो. साहेब आले. "ठिक आहे." म्हणाले. त्यांच्याकडील पुरावा नोंदवण्याबद्दल सांगितले . तिकडे साक्षीदार बोलतो ते टेपरेकाॕर्डवर रेकाॕर्ड केले जाते. नंतर त्यावरुन स्टेनो स्क्रीप्ट म्हणजे पुरावा तयार करतात म्हणाले.
वकिलांबरोबर चहापाणी झाले. "ठरल्याप्रमाणे घरी चला ." म्हणालो. आले. मुले लहान होती. त्यांना साहेबांनी खाऊ आणला होता. घर दाखवले. काहीतरी खायला दिले. "ठिक आहे. निघतो. आफ्रिकेला आलात की या . तुमची सगळी व्यवस्था होईल म्हणाले. " मी जोरात सतत परदेशात फिरत असल्यासारखे "हो. निश्चित येतो. " म्हणालो.
संध्याकाळी स्थानिकांनी साहेबांसाठी सभा ठेवली होती. साहेबांचा जन्म आफ्रिकेतलाच. ते नेल्सन मंडेलांचे वकिल होते. तेथील सर्वोच्च न्यायालयात प्रॕक्टीस करत होते. अशी माहिती समजली. कार्यक्रम संपवून घरी आलो.
एक मोठ्ठे दिव्य पार पडले. आता आफ्रिकेच्या सफरीची वाट पाहतोय. गेलो की भेटुन येऊ साहेबांना. या वाटले तर बरोबर.

Comments