पान संमेलन......................................

 अर्थातच या लेखास श्रीपाद कृष्णांच्या चोरांच्या संमेलनाची आणि पु.लं च्या पानवाल्याची प्रेरणा आहे. हे आधीच सांगितलेले बरे असते ना? म्हणजे नंतर "काय रे , ह्या लेखनासारखे पुर्वी काही वाचल्यासारखे वाटते." असे म्हणायला नको.

मी एकदा आमच्या रोजच्या पानवाल्यांकडे गेलो. रोजचे किंवा नेहमीचे असले म्हणजे आॕर्डर सांगावी लागत नाही. ते पान बनवत असताना इकडची तिकडची माहीती देत घेत असतात. पानवाले, कटिंगवाले यांस तसे गप्प बसलेले चालतच नाही. त्यांना कोणतेही विषय वर्ज नसतात.
बरे राजकीय विषय असला तरी ते स्वतःचे मत सांगत नाहीत. त्यामुळे चर्चा सुरु करुन देऊन चांगल्या मुलाखातकारासारखे ते गप्प बसुन ऐकतात.
"साहेब संध्याकाळचे पान बांधून देऊ का?" " का बरे कुठे जाणार आहात का?" मी म्हटले. "नाही हो, संध्याकाळी आमच्या युनियनची मिटींग, म्हणजे तुमच्या भाषेत संमेलन आहे. " " अरे वाः. आता तुमचीही संमेलने सुरु झाली का,? आहे कुठे ते?"
मग मामांनी एक पँप्लेटच माझ्या हातात ठेवले. ते पाहून मी चकीत झालो. कारण त्याच्या रंगापासुन छपाईपर्येंत पानाची आठवण व्हावी असेच सगळे होते.
आपल्या नगरीत प्रथमच पान संमेलन भरत आहे. यावर्षीची नवीन थीम म्हणून सर्व पान शौकीन व नागरिकांना यांत सामील करुन घेण्याचे योजले आहे. संमेलन पाचला सुरु होईल. औपचारिक संमेलन पाच ते सात या वेळेत असेल. नागरिक व शौकीन सात नंतर सामील होऊ शकतील. प्रवेश शुल्क नाममात्र तीनशे रुपये असेल. त्यात पसंतीनुसार शाखाहारी, मासांहारी भोजन, व मनसोक्त पान खिलवण्यात येईल.
पँप्लेटच्या मध्यावर पानाचे चित्र काढले होते. संमेलनाचे ठिकाण, वेळ,लिहीली होती. नकाशासुद्धा मागे काढला होता. संमेलनस्थळ शहराच्या मध्यभागचे एक मोठ्ठे पटांगण होते. शहर शौकीनांचे असल्यामुळे पूर्ण क्षमतेचे पास संपलेही होते.
हल्ली कायकाय चालेल सांगता येत नाही. मी मामांना म्हटले, " मी येऊ का?"व मला हे सगळेच बघण्याची ऐकण्याची फार ऊत्सुकता वाटत आहे. " " काय राव. काय विचारता? मी तुम्हाला विचारणारच होतो. पण म्हटले तुम्हाला आवडेल का नाही? अहो मी कार्याध्यक्षच आहे. बर. गाडी पाठवू का?" मी नको म्हटले.
मामांचा कारभार मोठा होता. दोन चार बिल्डिंग त्यांनी फक्त पानधंद्यावर उभ्या केल्या होत्या. मोठ्या दुकानाच्या शहरातच चार पाच शाखा होत्या. त्यांची एक मुलगीसुद्धा हौसेने एक शाखा स्वतः सांभाळत होती. वीस बावीस प्रकारांची पाने ती करत असे. एक्स्पोर्टही करत असे.
तीचे नाव प्रगती होते. तीच्याकडील चार पाच स्टाफसुद्धा लेडिजचाच होता. अर्थात अल्पावधीत तीच्याकडची विक्री सर्वाधीक होऊ लागली. तीला "पान क्वीन" असा किताब लोकांनी न मागता दिला होता.
संध्याकळी सव्वापाच साडेपाचला मी संमेलनस्थळी पोचलो. मंडप छान सजवला होता. सगळीकडे पांढरेशुभ्र पडदे. लाल बिछायती. हिरव्या , खुर्च्या . म्हणजे परत पानांचे रंग घेतले होते.
जागोजागी पानांच्या वेगळेवेगळ्या प्रकारांची माहिती , गुण, चित्रे लावली होती. पुराणकालीन साध्या विड्यापासुन दशगुणी, त्रयोदषगुणी, गोविंद विडा,मसाले पान, पानपट्टी , करत करत चाॕकलेट पान, फायर पान येथपर्येंत सगळ्यांचे कौतुक होते. मी पोस्टर पहात होतो. मामांनी मला पाहिले.
मी त्यांना ओळखलेच नाही. मामा अगदी पांढरेस्वच्छ धोतर, नेहरु शर्ट, जाकीट, फरकॕप अशा पोशाखात होते. त्यांची ठेंगणी गुटगुटीत मूर्ती, नेहमीचे हास्य, पिळदार मिशी शोभून दिसत होती.
त्यांनी मग प्रगती आणि तीच्या स्टाफशी ओळख करुन दिली. त्या तर सगळ्या ब्लेझर वगैरे घालून काॕर्पोरेटमीट असल्यासारख्या दिसत होत्या. मामांनी फार मोठा घाट घातला होता. "काय मामा प्रगतीचा जोडीदारसुद्धा आजच शोधणार का?" मी म्हटले. "नाही हो. ती काय आमच्यासारखी साधी राहिली नाही. तीला मिलेनियर का काय पाहिजे." काय हो पप्पा , " म्हणून प्रगती पळाली.
मामांनी स्थानिक कार्यकारीणीच्या लोकांच्या ओळखी करुन दिल्या. संमेलनाध्यक्ष दिल्लीचे कोणी मकबूल पानवाले होते. त्यांच्या पिढ्यानपिढ्या या धंद्यात होत्या.
कोणी कनौजचे, कोणी बनारसचे , औरंगाबादचे तारा पानवाले होते. संगीतातल्या घराण्यांसारखे सगळे घराणेदार मुद्दाम आले होते. काही येत होते. त्यांच्या राहण्याची, खाण्याची वगैरे व्यवस्था उत्तम हाॕटेलातुन केली होती.
"मामा या सगळ्याचा उद्देश काय? सामान्य लोकांना अगदी पानवाल्यांचासुद्धा यातून फायदा काय?" मी विचारले."मला वाटलेच होते, तुम्ही हा प्रश्न विचाराल असे. पण त्याचे उत्तर इथे गडबडीत देण्यापेक्षा मी सवीस्तरपणे स्टेजवरुनच देईन." अशी त्यांच्या तोंडुन प्रस्थापित वक्त्यासारखी भाषा ऐकू आली.
हळूहळू मंडप भरु लागला. लोकांच्या चर्चा चालल्या होत्या. बहुधा धंद्याबाबतच असाव्यात. येव्हढ्यात दिल्लीवाले "मकबूलभाई" बरोबर सात आठ चेल्यांसह आले. ते छान गुबगुबीत गृहस्थ होते. तो पैजामा , चकचकीत शर्ट, अंगठे सोडून सर्व बोटांत अंगठ्या , गाॕगलसारखा चष्मा , असे त्यांचे रुप होते. त्यांचा उजवा हात सतत हालत असे. त्याबद्दल विचारता आयुष्यभर पान लावण्याची सेवा केल्याने त्यांचा हात असा आपोआप हालतो असे समजले. " चलो, भाई. प्रोग्रॕम चालू करो. ये पाॕलीटिक्सका प्राॕग्रॕम थोडेही है. धंदेका टाईम है." म्हणत ते स्टेजवर पोचलेसुद्धा.
बाकीचे मान्यवर आले. रितीप्रमाणे सरस्वतीपुजन झाले. आता येथे तीने काय आशीर्वाद देणे त्यांना अपेक्षीत होते, त्यांनाच माहिती .
प्रगती आणि तीच्या सख्या येव्हढ्याच स्त्री प्रतीनिधी असल्यामुळे त्यांना स्वागत गीत म्हटले.पाहुण्यांचे हार गुच्छ देऊन सत्कार केले गेले. कोणीतरी प्रास्तावीकपर काही सांगितले. मग मामा उभे राहिले. त्यांनी मात्र निष्णात वक्त्यासारखे संमेलन घेण्याची आवश्यकता , एकूणच पान, सुपारी खाण्याकडे नव्या पिढीने फिरवलेली पाठ, स्वच्छतेचे नियम, नव्याने धंद्यात पडणा-यांच्या अडचणी, असे सगळे पाढे वाचले. तरीही आॕनलाईन पेमेंट, झोमॕटो वगैरेंचा वापर केल्यास एखादी स्त्रीसुद्धा कशी धंद्यात यशस्वी होऊ शकते हे प्रगतीचे उदाहरण देऊन स्पष्ट करुन सांगितले.
नंतर आमसभेने पानखानास प्रतीष्ठा मिळाली पाहिजे, बँकांनी नवउद्योजकांसारखा कर्जपुरवठा नवतरुणांस धंद्यासाठी केला पाहिजे, धंद्यास वेळेची मर्यादा लोक फिरतात तोवर, म्हणजे एक वाजेपर्येंत वा महानगरांत दोन तीन वाजेपर्येंत दिली पाहिजे असे बरेच ठराव एकमताने पास केले. ते जिल्हाधीकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविले जातील असे सांगितले गेले.
शेवटी प्रमुख पाहुणे मकबूलभाई उभे राहिले. त्यांनी प्रथम, " देखो भाईलोग, मुझे ऐसा भाषण देनेकी आदत नहीं है. मै दुनीया घुमा हुँ. लेकीन पान खानेका शौक भारत छोडके कहीं नही है. हमारे दादा परदादाभी पान बनाते थे. वो राजा महाराजा फर्माते थे . पान बनाते बनाते मेरा दाहिना हात निंदमेंभी हिलता है. (टाळ्या) . मामाने बहुत अच्छा काम किया है. किसीको किसीभी चीजकी जरुरत हो तो मुझे बताओ . मामाके पाससे मेरा नंबर लो. (टाळ्या).
भाषण संपले. जनगण झाले. तोवर दुसऱ्या मंडपात शौकीन यायला सुरुवात झाली होती. मामा आणि मंडळींबरोबर मी तिकडे वळालो. थोड्या काही पदार्थांची चव पाहुन एक पान खाऊन मी निघणार येव्हढ्यात मामा म्हणाले, " कसे झाले संमेलन." मी म्हटले, " छानच झाले. हल्लीच्या कोणत्याही संमेलनांसारखेच झाले. उलट तुम्ही लोकांना जास्त आणि खरे खूष केले. " संमेलन आठवत पान चघळत आम्ही सगळे घरी निघालो.

Comments