साक्षीदार.....................................

 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , गडकरी , आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे बाबा कदम, या व अन्य थोर साहित्यिकांनी साक्षीदार या विषयावर लिखाण केले आहे.

त्यांचा लिखाणाचा पैलू निराळा, दृष्टिकोन निराळा. आज साक्षीदार या विषयावर थोड्या वेगळ्या अंगाने लिहीणार आहे.
कोर्टात पाय ठेवल्यावर म्हणजे कोर्टाचे प्रत्यक्ष काम पाहिलेल्यास वकिल , फिर्यादी, आरोपी , वादी, प्रतीवादी यांच्याबरोबरचे स्थान साक्षीदार यांचे असते हे सहज समजून येते.
कोणतही गोष्ट कशी सिद्ध करावी असे काही अपवाद वगळता, पुराव्याचा कायदा सांगत नाही. बरे एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी अमुक इतके साक्षीदार असेही नाही. तरीही साक्षीदार असले की बरे असते. गोष्ट सिद्ध करण्यासाठी बरे म्हणून साक्षीदार या असामीस खूप महत्व असते.
दिवाणी कामात घटनाक्रम, कागदपत्र वगैरे असल्यामुळे वादी प्रतीवादींखेरीज अन्य साक्षीदारांचे साक्षीस तेव्हढे महत्व असत नाही.
एका न्यायालयात बांधावरच्या झाडांबाबत वाद होता. वादींनी एक साक्षीदार आणले. आॕफीसात त्यांची चांगली तयारी करुन घेतली. "झाडे कुठे आहेत?" वादींच्या हद्दीत बांधावर असे सांगायचे.
झाले. सरतपासात साक्षीदारांनी बरोब्बर "झाडे वादींच्या हद्दीत आहेत," असे सांगितले . वकिलसाहेब खूष होऊन खाली बसले. ऊलटतपास सुरु झाला. त्या वकिलांनी "झाडे कुठे आहेत, प्रतीवादींच्या हद्दीत आहेत की नाहीत?" तर साक्षीदार ऊत्तरले, "होय, प्रतीवादीच्या हद्दीत आहेत. "
साक्ष संपल्यावर वादीच्या वकिलांनी त्याला विचारले, "कारे, पहिला म्हणालास, झाडे वादींच्या हद्दीत , आणी ऊलटतपासात प्रतीवादीच्या हद्दीत . काय समजते का नाही.?" तर साक्षीदार शांतपणे ऊदगारले,"साहेब वादी प्रतीवादी तुम्हाला. आम्हाला दोघे सारखेच. त्यांच्या बरोबर रहायचे. त्यांचे वैर कशाला घ्या? " "शहाणा आहेस, जा." म्हणून वकिलांनी त्याला वाटेला लावले. असे साक्षीदार वकिलांची गोची करु शकतात.
फौजदारी प्रकरणात मात्र पंचनामे, डाॕक्टर अन्य तज्ञ असले तरी घटनेच्या साक्षीदारांना खूपच महत्व असते. सरकारी पक्षाचे काही साक्षीदार सरकार पक्षाचे बाजूचे असले तरी सरतपासातच काही माहीती नाही. काही पाहिले नाही असे सांगतात. मग सरकारी वकिल त्यांना फितुर घोषीत करण्याची परवानगी घेऊन त्यांचा ऊलटतपास घेतात. पण त्यात काही दम नसतो. साक्षीदार विश्वासार्ह रहात नाही.
साक्षीदाराचा सरतपास घेणे ही एक कला आहे. सरतपासात साक्षीदारास सूचक म्हणजे ऊत्तर प्रश्नातच असलेले म्हणजे. "त्याने तुला काठीने मारले का? " असे विचारुन चालत नाही. खूबीने साक्षीदाराला एक एक प्रश्न विचारुन सगळे काढून घ्यावे लागते. "मग पुढे काय झाले?" असे प्रश्न सुरु झाले की काहीतरी गडबड झाली आहे. पुढे प्रश्न सुचत नाहीत, विचारता येत नाहीत हे समजते. मग काहीतरी वेगळे सांगावे लागते.शपथेवर तरी लोक खरेच सांगतील म्हणून शपथेची योजना असावी. "म्हणा, देवाशपथ खरे सांगेन." म्हटले की एकजण तसेच "म्हणा, देवाशपथ खरे सांगेन. " म्हणाले. "तसे नव्हे, तुम्ही नुसते, देवाशपथ खरे सांगेन म्हणा." मग बरोबर म्हणाले. कोणी म्हणे, "आईची शपथ घेऊ.?" घे कोणाचीही घे. पण शपथ घे. शपथ कोणाचीही घेतली तरी चालते. न घेऊन मात्र चालत नाही.
बाबा कदम एक किस्सा सांगायचे. एकदा न्यायाधीशांनी साक्षीदाराला शपथ दिली. साक्षीदारांनी कसलीतरी वेगळीच टोपी घातली होती. न्यायाधीशांनी सहज त्यांना विचारले," बाबा कसली टोपी ही? कोठे घेतली?" त्यांनी काहीतरी ऊत्तर दिले. नंतर म्हणाले. "साहेब तुम्ही मला शपथ दिली आहे. साक्ष सुरु झाली. आता तुम्ही टोपीचे विचारले. मी सांगितले . ते रेकाॕर्डवर लिहून घ्या. " झाले. साक्षीदार फारच तयारीचे निघाले. साहेबांना कशीतरी त्यांची समजुत घालावी लागली. मग साक्ष पुढे चालू झाली.
साक्षीदारांचे अनेक प्रकार असतात. जवळचे साक्षीदार, नातेवाईक साक्षीदार, लहान मुले, मुके बहिरे, वेगळ्या भाषेत बोलणारे, वेगवेगळ्या विषयांतील तज्ञ , योगायोगाने घटनास्थळी हजर असणारे, फितुर साक्षीदार वगैरे वगैरे. सर्वांच्या साक्षींना तेव्हढेच महत्व असले तरी नातेवाईक, लहान मुले यांच्या साक्षी जास्त बारकाईने तपासाव्या लागतात.
साक्षीदार होण्यास कसलेही बंधन नसते. कोणीही कोणाहीसाठी साक्ष देऊ शकतो. अगदी लहान लहान मुले सुद्धा ऊत्तम साक्ष देतात. फक्त त्यांना पढवले नाही ना हे पहावे लागते.
खूनांसारख्या किंवा विशेषतः हुंड्यामुळे बळी गेलेल्या मुलींचे आई वडील मुलीचे प्रेत प्रथम पाहिले, या मुद्द्यापर्येंत आले की बहुतेक वेळा बेशुद्ध पडतात. त्यांना सांभाळून कधीकधी त्यांची साक्ष पुढे ढकलावी लागते.
स्त्रीया बहुधा साक्ष देताना घाबरलेल्या असतात. पिंजऱ्यात ऊभ्या राहतात. मोठ्ठी पर्स घट्ट धरुन ठेवतात. " अहो बाई पर्सला काही होणार नाही. पर्स ठेवा तिकडे. " सांगितले की नीट बोलू लागतात.
लहान मुलांची एकदा भिती काढून टाकली की मस्त गप्पा मारतात. त्यांना शक्यतो शपथ द्यायची नसते. ईकडचे , तिकडचे, घरचे प्रश्न विचारले की त्यांना बरे वाटते.
दिवाणी कामातील साक्षीदारांपेक्षा फौजदारी कामातील साक्षीदार ब-याच वेळा तयार वाटतात. एखाद्द्या साक्षीवर सुद्धा खटल्याचा निकाल बदलू शकतो.
साक्षीदारांस संरक्षणाची कशी जरुरी आहे हे एखाद्या प्रकरणात दिसून येते. मग आपण चार दिवस ते बोलतो आणी विसरून जातो.
असे असते साक्षीदारांचे विश्व. वरवर किरकोळ वाटणारे परंतु प्रकरणानूरुप अत्यंत महत्वाचे ठरणारे. याच्या साक्षीसाठी कोणी आपलीच साक्ष काढली नाही म्हणजे बरे.

Comments