चॕलेंज............................................

 "फ्रेंडस बी रेडी फाॕर अ ग्रेट अनाउंन्समेंट" एम. बी.ए. च्या पदवीदान समारंभात रेड्डी सर बोलत होते. " आता पदव्या , पदविका देऊन झाल्या. तुम्ही आता पदव्या घेऊन मोठ्या जगात जाणार. आता आपल्या संस्थेचे चेअरमन काबराशेठ यांनी मला एक अत्यंत नवीन आकर्षक योजना सांगितली तुमच्यासाठी. तीचे श्रेय मी घेऊ इच्छित नाही. योजना सुंदर तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार करण्यासारखी आहे. येव्हढेच बोलून मी काबराशेठना विनंती करतो की त्यांनीच योजना सांगावी. "

टाळ्यांच्या गजरात काबराशेठ उभे राहिले. " मित्रांनो मी तुमची उत्सुकता ताणणार नाही. तुम्ही एम.बी.ए. झालात. तुमचे
अभिनंदन
. धंदा कसा करतात. योजना कशा करतात ते तुम्ही शिकला असाल. आता मी तुम्हाला एक चॕलेंज देणार आहे. आजपासुन एक वर्षात म्हणजे पुढच्या वर्षीच्या पदवीदानापर्येंत तुमच्यापैकी एकजण दोघे जास्तीतजास्त तिघांनी तुम्हाला पाहिजे त्या नव्या छोट्या उद्योगाची योजना बनवायची. मला पेपरवर्क दाखवायचे. मी ते पाहिल्यानंतर तीन लाखांपर्येंत भांडवल देणार. तुम्ही ते वापरायचे. तो बिझीनेस स्वतः करायचा. वाटेल तर दोन तीन नोकर ठेवायचे. आणि एक वर्षात त्या बिझीनेसमधुन पैसे मिळवून माझे तीन लाख परत करायचे. कितीही फायदा होवो तो तुमचा. बिझेनेस नीट चालवला दिसले तर काॕलेज तुम्हाला काॕलेज योग्य बक्षीस देईलच. माझ्याकडून एक "यंग अंत्राप्रीनर " ट्राॕफी देईन. बोला आहे कोणी तयार. चॕलेंज स्वीकारायला वेळ पाच मिनीटे."
मुली ,मुली बुचकळ्यात पडल्या.योजना दिसतेय आकर्षक. पण जमेल का?आदिती आणि स्नेहल अभ्यासात चांगल्या होत्याच शिवाय सतत नवीन काहीतरी करुन दाखवायची जिद्द त्यांच्यात पुरेपूर भरली होती. येव्हढेसे भांडवल. फक्त एक वर्षाचा वेळ. येव्हढ्यात फुड इंडस्ट्री शिवाय काहीही उभे राहू शकणार नाही. फायदाही मिळणार नाही. तशी फारसी रीस्क नव्हती. दोघींनी एकमेकींशी बोलणे केले आणि आदिती झटकन उभी राहिली.
"सर मी आहे तयार. म्हणजे मी आणि माझी मैत्रीण स्नेहल घेतो हे चॕलेंज. " पुन्हा बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट झाला. रेड्डी सरांनी त्यांना स्टेजवर बोलावले. ते म्हणाले, " मला अभिमान आहे तुमचा, तुमच्या निर्णयशक्तीचा. पण नीट विचार करा. आणि उरलेली येव्हढी मुले , मुली आहेत. बाकी कोणीच नाही तयार. नुसता विचार. पाच मिनीटे संपली. असो. तुम्ही शेठजींना भेटा पुढच्या आठवड्यात अॕपाॕईँटमेंट घेऊन. काही मदत लागलीच तर आम्ही आहोतच."
कार्यक्रम संपला. पदवी मिळाल्याचा आनंद होताच. शिवाय नवीन कार्यक्रमाचे ओझे.
दोघींच्या घरच्यांनी प्रथम थोडा विरोध केला नंतर सहकार्य करायचे ठरवले. आदितीचे बाबा म्हणाले "तू काळजी करु नको. मी तुला म्हणशील तेंव्हा शेठजींचे पैसे परत करायला लागतील तेंव्हा देईन. "
स्नेहल आणि आई दोघीच रहात होत्या. तीची आई ऊत्तम पदार्थ करत असे. परंतु तीला पारंपारिक मराठी पदार्थच छान जमत असत. घरी बसण्यापेक्षा तुमच्याबरोबर येते म्हणून ती तयार झाली.
आदितीच्या घराजवळची ज्योतीमावशी भजी, वडे, डोसे, ईडल्या करायची. तीला गिऱ्हाईक नव्हते. ऊरला प्रश्न जागेचा. गावातील चौकात बाबूराव सायकलवाले होते. सध्या भाड्याने कोणी सायकली नेत नसे. त्यांची छोटी जागा तशी पडूनच होती. आदितीने मॕनेजमेंट स्कील वापरुन बाबूरावना तयार केले.
त्यांची जागा त्यांनी आदितीला वर्षभर फक्त वारायला द्यायची, तीने हवे तर आवश्यक बदल करायचे, बाबूराव त्याच जागेत सेक्रेटरी म्हणून सर्व कामे करतील. कामाचे व भाडे मिळून त्यांना पैसे द्यायचे असा करार केला. नुसतेच बसण्यापेक्षा चार पैसे मिळणार, थोडेसे काम मिळणार म्हणून ते खूष झाले.
आदिती आणि स्नेहलने तोच प्लॕन व्यवस्थीत कागदावर तयार केला. कराराची प्रत, जागेचे फोटो, काय काय करणार ते लिहीले. खर्च तीन लाखच दाखवला. चार पाच दिवसात मुलींनी आपणहुन प्लॕन तयार केला हे पाहून ते खूष झाले व तीन लाखांपर्येंत एस्टीमेटस पाठवा मी त्यांना परस्पर पैसे देईन सांगितले .
खूप विचार करुन हाॕटेलचे नाव ठेवले "सुग्रास--स्त्रीयांनी चालविलेले परिपूर्ण किचन " गावात सगळ्यांना याची कुणकुण लागलीच होती. पत्रकार आपोआपच बातमी काढायला येऊ लागले. आदितीने थोडीशी माहिती देऊन उदघाटनादिवशीच या सांगितले .
जागा स्वच्छ करुन घेतली. भिंतींना रंग वगैरे न लावता जपानी पद्धतीने मार्बलची चकाकी दिसणारा जाड कागद लावला. शटरच्या आत, समोर हालचाल होताच आपोआप ऊघडणारे काचेचे दार बसवले. दहाच टेबले छान सजवून ठेवली. दाक्षिणात्य पदार्थ केळीच्या पानांवर , मराठी नाष्ट्यासाठी काचेच्या सुंदर प्लेटस, चहा , काॕफीसाठी मग, गिऱ्हाईकांसमोर दिसणारी आर. ओ. पाण्याची व्यवस्था, खाली लाल कार्पेट, मंद आवाजातील शास्त्रीय संगीत अशा व्यवस्था केल्या.
स्वतः आदिती, स्नेहल,आळीपाळीने हसतमुखाने आॕर्डर घेऊन पदार्थ देतील , कधी कौंटर सांभाळतील असे ठरले.
ऊदघाटनाची तारीख ठरली पंधरा आॕगस्ट. काबरा शेठना वेळच नव्हता. प्रीन्सीपाॕल, सर्व सर, मुले, मुली सवडीने येणार होते. उदघाटक कोण? आदले दिवशी आदितीने जाहीर केले " कोणी पाहुणा नको. पहिले गि-हाईकच उदघाटन करेल." तसाच बोर्डही लागलीच लावला गेला. वेळ ठरली सकाळी सातची.
दोघींच्या घरातले सगळे जमले. ठरलेले पदार्थ तयार केले. आतून शटर उघडले. पुजा, उदबत्ती आधीच झाले होते.वेळ गाठू म्हणत म्हणत बाकी गिऱ्हाईक यायचेच होते.
सफाई कर्मचारी मावशी सहज डोकावल्या " काय आहे ग पोरींनो. हाटेल का? मला जरा चहा द्या की."
लगेच सगळे पुढे झाले. मावशींचा हार घालून सत्कार केला. फोटो काढले. आदिती , स्नेहल, त्यांच्या पाया पडल्या. त्यांना कळेचना काय चालले आहे ते. त्यांना सगळे सांगितले .
त्यांचे नाव विचारले. त्या म्हणाल्या"मी विमल काळे. चांगले केलेत. मी रोज येईन चहा प्यायला." मुहूर्त म्हणून त्यांनी एक रुपया दिला. तो आदितीने जपून ठेवला.
"काॕलेजकन्यांची धंद्यात झेप" मथळ्याने या आगळ्या उदघाटनाचे वृत्त सर्व माध्यमांनी आवर्जून छापले. मग प्रसिद्धी लागलीच नाही. पहिल्या दिवशीच पुन्हा पून्हा , पदार्थ करुन स्नेहलची आई दमुन गेली. दुसऱ्या दिवशीपासुन मैत्रीणीलाच आणते म्हणाल्या. थोड्याशा भांडवलात येव्हढा गल्ला पाहून सगळे खूष झाले. दमल्यामुळे लगेच झोपा लागल्या सगळ्यांना.
दुसऱ्या दिवशीपासुन काहीजण मुली बघायला, काही हाॕटेल बघायला व बरेचसे पदार्थांच्या चवी बघायला जमायला लागले. खाणे झाल्यावर कोणी रेंगाळलाच तर बाबूराव सहज म्हणून आत येत.बाबूरावांनी पुर्वी तालीम केली होती. त्यांना सगळे मार्ग माहिती होते. त्यांना पाहून मग गिऱ्हाईक हळूच ऊठून जात असे.
आपल्या घरगुती चवींना इतके गिऱ्हाईक येईल असे कोणालाच वाटले नव्हते. हसतमुखाने सेवा हे त्यांचे फक्त लिहीण्याचे ध्येय नव्हते. कोणाला काका, कोणाला आजोबा, दादा म्हणून हवा तो पदार्थ त्या चटकन पूढे करत. मामा नाव लोकांना आवडत नसल्याने कोणाला मामा म्हणत नसत.
चार पाच महीने कसे गेले समजलेही नाही. बाबूरावांनी हळूहळू खरेद्या, बॕक कामे हातात घेतली. आपल्या जागेचा असा कायापालट होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.
संध्याकाळी चाट आयटेम, पिझ्झा, बर्गर,सुरु झाले. मुलांचे वाढदिवस , पार्टीज, सगळे साजरे करायला " सुग्रास" शिवाय ठिकाण नसल्यासारखे झाले.
नवव्या दहाव्या महिन्यातच खर्च जाऊन तीन लाखावर एक रुपया जमा झाला. लगेच आदितीने काबरा शेठच्या नावे ड्राफ्ट काढून ठेवला. त्यांना तसे कळविले. त्याच संध्याकाळी काबरा शेठ व त्यांच्या घरातले सगळे हजर झाले. त्यांनी सुग्रासच्या पदार्थांची चव पाहिली. बाबूरावना ते ओळखतच होते. "ह्यांनापण कामाला लावले का? छान. छान." म्हणाले.
अखेर पुढचे पदवीदान आले. संध्याकाळी हाॕटेलमध्ये प्रथमच आदितीचे आई , बाबा बसले. आदिती, स्नेहल, आई, बाबूराव सगळे जण मुद्दाम काॕलेजात गेले होते. पहिले कार्यक्रम संपले.
सर्वांना उत्सुकता होतीच . आदिती , स्नेहलचे काय झाले.
रेड्डीसरांनी मागच्या वर्षीच्या चॕलेंजची आठवण करुन दिली. प्रथम आदिती , स्नेहलला त्यांच्या यशस्वी उपक्रमाबद्दल सांगायला सांगितले . त्यांनी थोडक्यात काय, काय अडचणी आल्या, कसे मार्ग काढले ते सगळे सांगितले. काॕलेजने शेठजींनी जाहीर केलेली यंग आंत्रप्रेनर ट्राॕफी त्यांना दिली.
काबरा शेठ उभे राहिले. त्यांनी आदिती , स्नेहल यांची जिद्द, चिकाटी, सुग्रासचे सर्व लोक, पदार्थांच्या चवी सगळ्याचे अपार कौतुक केले. यावरुन बाकीच्यांनी कसा धडा घ्यायला हवा ते सांगितले . तीन लाख एक रुपयांचा ड्राफ्ट आदितीकडून घेतला व प्रत्येकीला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस दिले. सगळे जण येव्हढे मोठे बक्षीस ऐकून अचंबीत झाले. सुग्रासच्या स्टाफला तो त्यांचाच सन्मान वाटला.
शेवटी काबरा शेठनी व्यवस्थापनाचा धडा सगळ्यांना शिकवायचा होताच शिवाय त्याच्यांच रवी या मुलाला हा धडा द्यायचा होता असे सांगून रवीच्या नवीन फॕक्टरीचे कँटीन सुरु करुन देण्याची जबाबदारी आदिती व स्नेहलवर सोपवली.
चॕलेजर ट्राॕफी हातात घेऊन बाबूराव मजेत परत निघाले होते . सुग्रासमध्ये ट्राॕफी ठेवली आणि यंग आंत्रप्रेनार जन्माला आल्या.

Comments