ह.भ.प.............................................

 हरी भक्त परायण. हे शब्द साधे सोपे दिसले तरी ते खरेखुरेपणाने धारण करणे इतके सोपे नाही. परवाच कुमार गोखलेने हरेरामपंत बोडस म्हणजे आमच्या सरांच्या निरुपणाची एक फीत पाठवली आणि ती ऐकताच सरांच्या आठवणी जाग्या झाल्या.

एखादे जुने दगडी देवालय आहे. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजत आहेत. देवाकडे तोंड करुन चांगले व्यासपीठ स्थापन केले आहे. व्यासपीठावर ह.भ.प. हरेरामपंत बोडस म्हणजे सर बसलेले आहेत. पांढरे शुभ्र धोतर, तसाच शर्ट, कपाळावर गंध, बुक्का, कधी पांढरी टोपी, कधी पांढरा फेटा, लख्ख गोरेपान रंग, भरपूर ऊंची, सतत साधा पेहराव , चेह-यावर, डोळ्यांत विद्वत्तेचे तेज, तरीही मी इतरांपेक्षा वेगळा अशी भावना नसलेले , सुहास्यवदन, विनोदाने चुकारांना हळूच कधीतरी चिमटा घेणारे सर व्यासपीठाला नम्रपणे अभिवादन करुन विराजमान होत. नंतर चालू होई तो अखंड वाहणारा वाणीचा प्रेमळ , सौम्य पण नेमका धबधबा.
एखाद्या अभंग, श्लोकाचे निरुपण असो किंवा एखाद्या आध्यात्मिक विषयाचे प्रवचन असो सर त्या त्या विषयाबद्दल सखोल माहिती जाताजाता करुन देत आसत. एक तास बोलायला चार तासांची तयारी करावी लागते म्हणतात. तर त्यांची तयारी किती असेल याची कल्पना करवत नाही.
संतांची चरीत्रे असोत की धर्मग्रंथ असोत सरांना सगळे मुखोद्गत असे. कधीही इकडचा शब्द तिकडे व्हायचा नाही. निरुपण हे निरुपणच असायचे ,वाटायचे , त्यातल्या फरकांसह . त्यामुळे त्यांच्या श्रोत्यांत लहान मोठे सगळे बहुसंख्येने उपस्थित असत. अर्थात सरांना त्याचे अप्रुप कधीच नसायचे. "आज प्रवचनाला , निरुपणाला केव्हढी गर्दी. आत शिरायला सुद्धा जागा नव्हती" हे आपले बाकीच्या लोकांचे विचार असत.
सर एकदा विषयात शिरले की श्रोत्यांची धारकशक्ती पाहुन रममाण होत आणि श्रोते गुंग होत. अवघड काही सांगु लागले की श्रोत्यांत शांतता पसरलेली असे. ते गंभीर झालेले सरांना फार आवडत नसे. ते लगेच काहीतरी हलके फुलके बोलून सगळ्यांना जमीनीवर आणत. ज्ञानेश्वरी तर सर कोळुन प्याले होते म्हणावे इतकी पारायणे त्यांनी केली असावीत.
निरुपण, प्रवचन संपल्यानंतर परंपरेने लोक त्यांच्या पाया पडायला आतूर होते. ते आवरले की सर थांबलेत , कोणाशी बोलत बसलेत असे कधीच व्हायचे नाही. संपले की लगेच बाहेर पडून घरी निघुन जायचे. असली कोणाची गाडी तर त्यातुन नाहीतर सरळ भराभर चालत निघायचे.
देवळांच्या बाहेर सरांचे निरुपण, प्रवचन , किर्तन आहे असे कोठेतरी फळ्यावर खडूने लिहीलेले असे. ती बातमी कर्णोपकर्णी गावभर पोचत असे.
लहानपणापासून मोठेपणापपर्येंत सरांची किर्तने , प्रववने , निरुपणे अगदी समोर त्यांच्या पायाशी बसून किती ऐकली तेही संख्येने आठवणे अवघड आहे.
किर्तनात मात्र सरांचे रुप आणखीनच वेगळे असे. पांढ-या कपड्यातले टाळकरी मागे उभे असत. त्या मोठमोठ्या टाळा , त्यांचे गळ्यात घालायचे लांब पट्टे, मृदुंग, पेटी, आणि मध्यभागी सर उभे. ते रुप विसरणे कधीच शक्य नाही.
ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव, मुक्ताईंचा एखादा अभंग घेत.प्रथम त्याचा ऐकून समजणारा रुढार्थ सांगत. मग थोडे त्याच्या अंतरंगात शिरुन गुढार्थ सांगत. कळूदे न कळूदे आपण काहीतरी उत्तम , चांगल्या पद्धतीने ऐकत आहोत, जगात शिकण्यासारखे फार आहे येव्हढे तरी प्रत्येकाला समजत असे.
मतीतार्थ संसार , रोजची कामे नीट करा. सोबत काहीतरी भक्ती, हरीनाम घ्या हा असे . पुर्वरंग असा होई. नंतर सर उपरणे बांधत. त्यांना कोणी हार घाले. अधूनमधून विठ्ठल नामाचा गजर करत, करवून घेत. सोबत वेगळेवेगळ्या रागांत अभंग गात. सगळे उड्या मारत. टाळांचा लयीत गजर करत. नृत्य , नाट्य , संगीत काय नसते त्या किर्तनात? सगळे असतेच. त्याच्यापेक्षा जास्त असते ती तळमळ, कळकळ , संतांचे मन सोप्या वाणीने समजावण्याची. ते कधी संपूच नये असे वाटत असे.
किर्तन तसे आणखी सोपे असल्याने त्यात थोडे विनोदही असत. मुंबईच्या बायकांना घर झाडायला लागत नाही. इकडून तिकडे , गाऊन ,(म्हणजे गाणे नाही बरका) , घालून बाई फिरली की घर साफ. श्रोत्यात खसखस पिकत असे. राजकारणावर काही किर्तनकार बोलत. सर मात्र म्हणणे पटवण्यासाठी असले आधार घेत नसत.
आताच्या काळात सर असते तर मिडीयाने त्यांची किर्ती देशभर काय जगभर पोचवली असती. रोज एखादा तास एखादे चॕनल नव्हे तर पूर्ण चॕनल व्यापून टाकतील अशी त्यांच्याकडे शक्ती होती. पण मोठ्यांची किर्ती त्यांच्यानंतरच पसरते म्हणतात ते खरेच असावे.
सर नुसतेच उत्तम निरुपक , प्रवचनकार नव्हते तर संस्कृतचे गाढे विद्वान होते. मॕट्रीकला जगन्नाथ शंकरशेठ , एम. ए. ला झाला वेदांत पारितोषिक मिळवून नम्रतेने ते सर्व त्यांनी पचवले होते.
सांगली एज्युकेशन सोसायटीच्या मिरज हायस्कुलमध्ये ते अकरावीला संस्कृत शिकवत. ते त्यांना हवेतर प्राध्यापक , प्राचार्य काहीही होऊ शकले असते.
शिकवताना ते खरेखुरे शिक्षकच असतच. तेथे त्यांचे निरुपणकार, प्रवचनकार , किर्तनकार डोकावत नसत. त्यांच्याकडे शिकायला मिळणे भाग्याचे होते. तेथे ते पेपर कसा लिहावा, मार्क कसे मिळतात हेच सांगत असतील. ते भाग्य काही माझ्या वाट्याला आले परंतु त्यांच्या खास वर्गाचा लाभ खूप मिळाला.
"मी या वर्गात पुस्तकातील काहीच शिकवणार नाही. परंतु संस्कृत कसे शिकायचे ते शिकवेन. " असे सांगूनच ते वर्ग चालत. त्यामुळे मार्कार्थी लोक तिकडे फिरकतही नसत. अर्थात चांगली भाषा आल्यावर मार्क काय मिळतातच.
नाहीतरी शाळा काॕलेजात माहितीची, ज्ञानाची ,नाणी शिक्षक, प्राध्यापक आपल्याला देतात. ज्ञान असते खूप, सागरासारखे, जगभर पसरलेले. मग त्या नाण्यांचे काय करायचे ते आपण आपल्या बुद्धीने , ईच्छेने ठरवतो आणि तसे होतो असे मला वाटते.
दर रविवारी एक वही घेऊन आम्ही दहा बारा जण किल्ल्यातल्या सरांच्या घरी दुपारी तीनला जायचो. जुन्या जिन्याने वरच्या माडीवर जायचो. सर मच्छरदाणीत डोळे मिटून बसलेले असत. आम्ही आल्याचे त्यांना समजे. ते "या बसा. " म्हणत.
त्यांच्या मनात असेल तसे. कधी हयवदन नाटकातला चंद्रापिडाचा संवाद येई. तर कधी राम सीतेचे संभाषण कधी विनोद आणि कधी कुटप्रश्न.
कंबलवन्तम न बाधते शीतम! कांबळे घेतलेल्याला थंडी वाजत नाही. तेच कम् बलवन्तम न बाधते शीतम? केले की काय बलवंतला थंडी वाजत नाही? असे एकाच वाक्याचे दोन अर्थ. खूप सांगायचे. फक्त दोन अक्षरे घेऊन केलेला श्लोक.
तार तार तरै रेतै रुत्तरो , तरतो रुतै!
रतार्ता तित्तीरी रौती तीरे तीरे तरौ तरौ!
यात दुस-या ओळीतले रौती म्हणजे रडते. कोण तित्तीरी म्हणजे तित्तिर मादी. मोठया आवाजात या तीरावारुन त्या तीरावर तित्तिरी रडते ,ओरडते. अशी मजा.
ही भाषा किती समृद्ध आहे, का शिकली पाहिजे. कशी शिकली पाहिजे याचे ते समृद्ध शिक्षण होते. मला त्यातली मजा तर्क तेव्हढा समजला. अनेकांना भरपूर मार्क मिळाले. शैलजा ऊर्फ राणी सुमंतला शंकरशेठ मिळण्यायेव्हढे मार्क मिळाले . काही तांत्रिक कारणाने ती दिली गेली नाही. पण ती एम.एससी. होऊनही ऊत्तम संस्कृत अध्यापिका झालीच.
सरांकडे खूप ग्रंथसंपदा होती. ते सतत वाचन मनन करत असत. वर्ग संपला की "आता पळा" म्हणत. आम्ही तीच चर्चा करत घरी जात असू.
भाऊबीजेच्या दुस-या दिवशी सरांची पंढरपूरला कार्तिकी वारी निघत असे. वारीत रोज रात्री प्रवचने, किर्तने यांचा अपूर्व लाभ होत असे. पिढ्यानपिढ्या ती जात असते. नवीन नवीन लोक सामील होत जातात. प्रत्येकाला त्याला काहीना काही मिळत जाते.
एकदा एक अती शहाणे शाळा तपासनीस "सर वेगळेच संस्कृत शिकवतात?" असे बोलून गेले. लगेच माझ्या काकांनी त्यांची तिथेच हजेरी घेऊन सरांची योग्यता समजावून सांगितली. त्यांना सरांची माफी मागून शब्द मागे घ्यायला लावले होते.
सगळे उघड उघड होत असल्यामुळे आमच्या ते कानी पडत असे. तेंव्हा सुद्धा कमी प्रमाणात असेल, पण मुला मुलींची प्रकरणे , छोटी पैशाची प्रकरणे होत असत. पण या लोकांची चूका करणा-याला लक्षात राहील व पुन्हा तसे होणार नाही इतपत शिक्षा देण्याची पद्धत असे.
ऋषीकेश व विश्वेश या सरांच्या पुत्रांनी सरांचा वारसा छान जपून ठेवला आहे. ऋषीकेश प्रसिद्धी परांगमुख गायक आहे. दृष्ट लागेल असा ऊत्तम नट आहे. विश्वेश सरांसारखेच प्रवचन निरुपण करतो.
रुढार्थाने सर वैकुंठवासी झाले. पण ते नाहीत कसे? वारी अजूनही निघते. अजूनही किर्तन होते. वाटते सरच म्हणताहेत "बोला विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल."....

Comments