रस्त्यावरील अपघात...............................

 अपघात हा थोडासा भितीदायक शब्द असला तरी आपल्या प्रत्येकाच्या जवळचा शब्द आहे. प्रत्येकाला अपघाताने का होईना अपघाताला तोंड द्यावे लागलेले असते. कधी आपण पिडीत म्हणजे अपघाताचे बळी असतो, क्वचित आपणाकडुन अपघात झालेला असतो कमीतकमी साक्षीदार किंवा बघे तरी झालेले असतो.

अपघात होऊन गेलेला असतो. एखादी गाडी किंवा ट्रक पडलेला असतो. जवळून जाणाऱ्या बसमधील लोकांच्या प्रतीक्रिया ऐकण्यासारख्या असतात. सर्वप्रथम हळहळ" अरेरे किती वाईट झाले". स्त्रीयांच्या तोंडून "चःचः "असे ऊदगार आपसुक येतात. पुरुष लोक ऊगीचच ऊठून, शक्य झाले तर ऊतरुन अपघात बघून येतात. अपघात कसा झाला असेल, चूक कोणाची असेल यावर चर्चा करतात. एकदोन मिनीटात निकालही देऊन टाकतात. एकांनी म्हटले की "जो निकाल लोक मिनीटात देतात ते ठरवायला कोर्टाला कितीतरी वर्षे लागतात".
अपघात झाल्यावर आपण त्यात असू तर चूक समोरच्याचीच कशी झाली हे सांगू लागतो. तेथेही आपला स्वभाव जोराने भांडण्याचा वगैरे असेल तर बघायलाच नको. फार नुकसान वगैरे नसेल पोलिस येण्याची शक्यता नसेल तर मांडवली केली जाते. कधीकधी पोलिसही "बघून घ्या काहीतरी "असे म्हणतात व प्रकरण मिटवले जाते. एकमेकांचे नुकसान दिले जाते. आपण जर त्रयस्थ असलो तर मात्र पोलिसांना कळवलेच पाहिजे , एफ. आय. आर. केलाच पाहिजे म्हणतो.
जर पोलिस केस झाली तर पंचनामा साक्षी नोंदवणे हे सोपस्कार होतात. अजूनही पंचनाम्यात रस्ता कसा आहे वगैरे असतेच परंतु कोणती गाडी कशी जात होती, अपघात निश्चित कोणत्या ठिकाणी झाला वगैरे पुनःपुन्हा वाचुन ठरवावे लागते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार खुपच कमी वेळा ऊपलब्ध असतात. "मी आवाज ऐकून तेथे गेलो."मी मागच्या सिटवर होतो" असेच म्हणणारे खूप असतात.
जखमी असतील तर त्यांना दवाखान्यात नेले जाते. एका न्यायमूर्तींनी असे सुंदर निरीक्षण केले की अपघात झाल्यावर मदतीला येतात ती रस्त्यावर काम करणारी किंवा जवळपास काम करणारी "ब्ल्यू काॕलर्ड " माणसेच असतात. पुढे आपल्याला साक्षीला बोलावले जाईल,तेंव्हा आपल्याला त्रास होईल, आपला वेळ जाईल असले विचार ती कधीच करत नाहीत. पांढरपेशे, अपवाद वगळता मदत करतानाही पुढचा आपलाच विचार करतात.
साक्षीदारांच्या जोरावरच न्यायदान होते. त्यांच्या साक्षीतुन जर आरोपी बेदरकारपणाने किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवत होता हे दिसले नाही तर गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. घटना झालेलीच असते परंतु ती सिद्ध होणे ही वेगळीच गोष्ट असते. "सामान्य व्यक्तीच्या नजरेतुन त्याला अशा परिस्थितीत काय वाटेल?" असा साध्या दृष्टिकोनातून पुराव्याचा कायदा विचार करतो. आपण मात्र काहीही झाले तरी आरोपीला अपघाताच्या गुन्ह्यात शिक्षा होत नाही असे म्हणतो.
गुन्ह्याबद्दल खरी माहिती , गुन्हेगाराला , देवाला आणि दानवलाच असते असे म्हणतात. त्यापैकी आरोपी त्याच्याविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार होऊ शकत नाही . ऊरलेले दोघे म्हणजे देव आणी दानव. त्यांना आणता येत नाही. ऊरतात ते साक्षीदार.
अपघात होण्यास खूप कारणे असतात. काही व्यवस्थेवर ढकलता येतात. खराब रस्ते, त्यांच्या न होणाऱ्या दुरुस्त्या , कमी प्रकाश वगैरे वगैरे. काही वेळेस वाहनांच्या न केलेल्या देखभालीमुळे, योग्य दाबाची हवा नसल्यामुळे , ब्रेक न लागत असल्यामुळे , ईंजीन अचानक बिघडल्यामुळेही अपघात होऊ शकतात. सर्वात महत्वाचा घटक चालक म्हणजे आपण असतो. वाहन चालवताना दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही कान व दोन्ही डोळे सजग असावे लागतात. तुम्ही कितीही काळजीपूर्वक वाहन चालवले तरी समोरचा कसा वागेल सांगता येणार नाही. "बाॕडी लँग्वेज "महत्वाची असते तशी "गाडी लँग्वेज" ही पहावी लागते. स्त्रीया व वयस्क हे अत्यंत बेभरवशाचे चालक समजले जातात. ते कधी कसे वागतील, म्हणजे मध्येच थांबतील, अचानक वळतील सांगता येणार नाही. एक वाहन शिक्षक सांगायचे की दुसऱ्यास पुढे जायचे तर अवश्य जाऊ द्यावे. मिनीटाने फरक पडेल इतकी महत्त्वाची कामे नसतात, आणी असलीच तरी बाकीचे रामायण होऊन उशीरा किंवा न पोचण्यापेक्षा मिनीटांचा उशीर परवडेल.
बेदरकारपणा म्हणजे काय. निष्काळजीपणा म्हणजे काय ते परिस्थितीवर ठरते. केवळ जास्त वेग म्हणजे बेदरकारपणा किंवा निष्काळजीपणा नसतो. रस्त्याची परिस्थिती , वाहतूक आणी वाहन चालविण्याची पद्धत यावरुन ते चालवणे बेदरकारपणाचे का निष्काळजीपणाचे हे ठरवले जाते. रिकाम्या रस्त्यावर , महामार्गांवर वेगाची मर्यादा लिहीली असेल तर ती पाळून चालवणे पुरेसे ठरेल. बेदरकारपणाने म्हणजे थोडक्यात विचार न करता वाहन दामटणे. निष्काळजीपणाने म्हणजे योग्य काळजी न घेणे. जे होईल असे वाटत किंवा दिसत असताही कृत्य करणे. अनुमान चुकणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे असेही म्हटले जाते.
अपघातामुळे फौजदारी खटला, जखमी असल्यास ऊपचार, कधी जन्माचे अपंगत्व, मृत्यू , नुकसान भरपाई, वाहनाचे नुकसान , दुरुस्ती , वाहन ताब्यात मिळण्यासाठी खटपट असे सारे ऊदभवु शकते. यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांचा सर्व प्रकारचा विमा उतरवलेला बरा. अगदी दूचाकी असली तरी तीचा अपघात होऊ शकतो. तो न झाला तर ती चोरीला जाऊ शकते. नंतरच्या पस्ताव्यापेक्षा विमा बरा.
दिवसेंदिवस वाहने वाढत आहेत तर रस्ते अधीक खराब. रस्त्यांचा वापर करण्यास मुभा असली तरी वाहने रस्त्यांवर लावणे , वाहने लावुन गप्पा मारणे, गर्दीच्या ठिकाणी वाहनांचे थांबे करणे, येनकेन प्रकारे रस्ते चालण्यासाठी , वाहनांसाठी न ठेवता त्यांची रुंदी कमी होणे हे सर्व अपघातांना निमंत्रण ठरत आहे. आपण अपघातात सापडू नये कोणी सापडले तर त्यांस शक्यतर मदत करावी, न घाबरता साक्षीदार व्हावे येव्हढेच सांगणे.

Comments