डि.आय.वाय. ........................................
डि.आय. वाय. हा सध्या लोकप्रिय शब्द झाला आहे. मुलांना नविन वस्तू जोडण्यासाठी यु. ट्युबवरील या प्रकाराचा फार उपयोग होतो.
म्हणजे आपल्या भाषेत स्वावलंबन. दुसरे काही नाही. मला तर अशाप्रकारे नविन काही वस्तू किंवा असलेले काही बदलायचे असेल तर स्वतः करायला फार आवडते.
मुलांनाही लुडबुड करायला म्हणून ते फार आवडायचे. मेघनाला मात्र ते अजिबात आवडत नाही. " तुम्ही कामे सुरु करुन निघुन जाता, उरलेले मला आवरत बसावे लागते. तुम्हाला येत नाही.त्यापेक्षा पैसे देऊन माणूस बोलवा" असे तीचे म्हणणे असते.
अर्थात दरवेळा काही तसे होत नाही. कधीकधी काहीतरी चुकते व माणूस बोलवावा लागतो.चार पैसे जातात येव्हढेच. एरव्ही बरीच कामे आम्ही छानच करत असतो.
एकदा मेहुणी संगीता कडे गेलेलो. "गॕस नीट पेटत नाही. कंपनीला फोन केलाय. माणूस येईलच ." असे काहीसे ती म्हणत होती. मी म्हणालो, " येव्हढ्याश्या कामाला माणूस कशाला लागतोय. स्टोची पीन दे. आत्ता साफ करतो. "
आता स्टोच कुठे आहेत. त्याची पीन कुठून मिळावी. पण नाही. एकदा ठरवले म्हणजे ठरवले. इकडेतिकडे फिरुन स्टोच्या पीना मिळणारे एक दुकान हुडकुन काढले . चार आण्याला मिळत होते ते पीनांचे पाकीट चांगले पाच का सहा रुपयांना झाले होते. आत पीना तेव्हढ्याच ,तीन.
घरी आलो. गॕस शेगडी खाली घेतली. बर्नर साफ केले. त्यांना गॕस देणा-या नळ्या साफ केल्या . तोवर सगळे छान चालले होते. मग एका बर्नरच्या अगदी बारीक नळीत पीन घालून हळूहळू फिरवताना काय झाले माहीती नाही. पीन नळीत अडकुनच बसली. अगदी बारीक चिमटा, प्लकर हुडकला. ती थोडी आतच गेली. चिमटीत धरुन ओढायचा प्रयत्न केला. पण व्यर्थ.
इकडेतिकडे पाहिले.संगीताला एजंन्सीचा पत्ता विचारला. "पण आज रविवार. ती बंद असेल." असे तीचे उत्तर. पाहू तर खरे म्हणून हुडकत गेलो. नशीबाने एक मॕनेजरसे कोणी व एक मेकॕनीक होते. अर्जंट आहे म्हटल्यावर अर्ध्या एक तासाने ते आले. चटकन आणखी बारीक काहीतरी घेऊन त्यांनी पीन काढून हातात ठेवली. फक्त दिडशे रुपये घेतले. तेंव्हापासुन गॕस पाईप सफाईसाठी स्टो पीन चालत नाही हे समजले. शक्यतो हे काम माझ्याकडे सोपवायचे नाही हे सगळ्यांनी परस्परच ठरवले.
आता टि.व्ही. चा होल्डर का पीन फुटली. मग येव्हढ्याला माणूस कशाला? आणली पीन. तर तीसरी वायर जोडायला तीच्या आत काहीच नव्हते. ती उघडली तर आत दोन वायर जोडल्याचे दिसत होते. चला म्हटले, तीस-या वायरची जरुरीच नाही. दोन वायर जोडल्या.
"खरच जोडुया ना?" मुलांनी विचारले." जोड बीनधास्त" म्हटले. टि.व्ही. लागला नाहीच. उलट सगळ्या घरातले दिवेच गेले. आता काय करावे. संध्याकाळ होत आलेली. इकडेतिकडे विचारुन एक इलेक्ट्रिशिअन आणले.
त्यांनी सगळे चेक केले. "काही फाॕल्ट दिसत नाही. बहुतेक घरापर्येंतची सगळी वायरींग जळाली असेल. ते आता संध्याकाळी होणार नाही. सकाळी बघू " म्हणून ते गेलेसुद्धा.
भाड्याचे घर. मालक काय म्हणतील ही चिंता. पण येव्हढ्याशा पीनने येव्हढे नुकसान होणे शक्य नाही ही खात्री होती.
आणखी काही उपाय शोधू म्हणून इकडेतिकडे फिरुन घरी येतो काय सगळे लाईट चालू. हा चमत्कार कसा झाला ते विचारल्यावर मुलांनी सांगितले . त्यांचा एक मित्र आला होता. त्याला इलेक्ट्रिकचे ज्ञान होते. त्याने मिटर शोधला.सगळे पास पडत होते. एक पास पडत नव्हता. म्हणजे एक दिवा लागत नव्हता. त्याने फ्युज गेल्याचे निदान केले. घरातील आम्ही जोडलेली पीन काढली. फ्युज बदलला आणि लाईट आले. दुसरे दिवशी साधी पीन आणून टि.व्ही. सुरु केला.
एकदा गॕस शेगडी जुनी झाली. नवीन शेगडी होतीच. होज बदलायचे साधे काम. अपघात होऊ नयेत सुरक्षा म्हणून "सुरक्षा" नावाचीच ट्युब देतात. ती अधूनमधून बदला म्हणतात .
बदल्यांमुळे हे उद्योग नवे नव्हतेच. ती जाड होज , घट्ट घट्ट म्हणजे राक्षसी ताकद असलेल्यालाच उघडेल इतकी घट्ट बसवतात. तेथे तेल, पाणी लावून काही उपयोग होत नाही. ती आणखी घट्ट होत जाते. आतील बारीक तारांमुळे ती कापताही येत नाही. हाताला थोडीशी दुखापत मात्र होऊ शकते.
आज चहा नवीन शेगडीवरच करणार असे ठरवून टाकले. ओढून ओढून जुन्या शेगडीचे होज काढले. नवीन शेगडीची ट्युब खूपच लांब होती. येव्हढी कशाला म्हणून पॕकींगमधून नवीन होज काढली.
येव्हढी गच्च असून त्यावर सुरक्षा म्हणून आणखी एक क्ल्ँप लावतात. ते कशाला त्यांनाच माहीत. यु.ट्युब वर व्हिडीओ पाहिला. तर त्यांनी गॕस लाॕक म्हणून आणखी एक मेटल ट्युब लाॕक आणले आहे.
ते घातले की ट्युब लगेच काढता बसवता येते. म्हणजे त्यासाठी आणखी नवीन काहीतरी घ्या. मग त्यापेक्षा मुळ ट्युबच चटकन् काढता बसवता येईल असे बघा ना. त्यांचा माणूस मात्र ती ओढून त्या मानाने लवकर बसवू शकतो.
ओढून उपयोग झाला नाही. परत चिमटा, कापड वगैरे घेऊन पाहिले. पण बाई हालायला तयार नाही. शेवटी महत्प्रयासाने एक तास घालवल्यावर स्क्रु ड्रायव्हरने टोकरुन टोकरुन काम पूर्ण झाले. होज भिंतीतील भोकातून बाहेर काढतात तेथे घातलेली प्लॕस्टीक ट्युब जूनी झाल्यामुळे तुटली येव्हढेच.
नवीन शेगडी जोडल्याचा आनंद ठरल्याप्रमाणे चहा करुन साजरा केलाच. आता पुन्हा नवीन काही निघेल, बदलाबदली दुरुस्तीचे काम येईल तेंव्हांचे तेंव्हा बघू.
Comments
Post a Comment