नटी...........................................

 शाम देवळे आणी कुमार नाईक अगदी जिगरी दोस्त. सतत लोकांच्या खोड्या काढणे, मजा करण्याचा स्वभाव. काॕमर्स काॕलेजचे विद्यार्थी . चुकूनही काॕलेजात जायचे नाहीत. म्हणजे दोन वह्या घेऊन घरातून बाहेर पडायचे. पास काढलेले असायचे. काॕलेजपर्येंत जायचे. कधी कँटीन कधी बाहेरच्या कट्यावर बसून गप्पा ठोकायचे. हे दरवर्षी पास कसे होतात याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत असे. घरच्यांना बोलण्याचे कारण नव्हते .

श्याम आणि कुमारला सिनेमा, नाटके पाहण्याचा चांगलाच शौक होता . सिनेमाला त्या काळी जास्तीत जास्त पाच रुपये तिकीट पडत असे. तर नाटकाला दहा पंधरा रुपये . सिनेमाच्या तिकीटाचे कसेबसे पैसे गोळा करता येत परंतु नाटकासाठी काहीतरी जुगाड करावा लागे. मग डोअरकिपरची ओळख काढ, मॕनेजरला भेटुन गप्पा मार ,चौकश्या कर असे उद्योग करत असत. काही करुन सगळे नाटक, कमीतकमी अर्धे नाटक तरी पाहिल्याशिवाय सोडत नसत.
एकदा एका मोठ्या नाट्यसंस्थेचा "लग्नाची बेडी" नाटकाचा प्रयोग लागला . सगळीकडे जोरात जाहिरात चालू झाली . थेटरबाहेर पोस्टर लागले . "रश्मीच "काम "सुरेखा" ही अभीनेत्री करणार होती . तीला पाहण्यासाठी तरी नाटक चुकवण शक्यच नव्हत. दोन चार दिवसात अर्धे अधीक बुकींग होऊन गेले .
इकडातिकड फिरतांना , कट्यावर बसल्यावर श्याम आणि कुमारच्या नाटकाचे कसे जमवायचे या चर्चा चालत . मॕनेजर कोण आहे , बुकींगला कोण आहे सगळे पाहून झाले पण गर्दीमुळे कुठेही डाळ शिजत नव्हती .
बघता बघता नाटकाचा दिवस उजाडला . कुमारने श्यामच्या घराबाहेर जाऊन ओळखीची शिट्टी वाजवली . श्यामने लगेच "क्लासला जातो , "असे आईला सांगून एक वही घेऊन घराबाहेर पळ काढला . "अरे,सर गावाला गेले आहेत ना?क्लास कुठे आहे?" असे कुमार म्हणाला . "ते असूदे. चल थेटरवर जाऊन येवु"श्याम म्हणाला . मग दोघे थेटरवर गेले.
नाटक कंपनीची गाडी थेटरच्या आवारात लागली होती . सेट गाडीवरच ठेवलेला होता . सगळीकडे सामसुम होती . थेटरच्या पुढच्या आणि मागच्या दरवाज्यांना कुलपेच होती . समोरच्या छोटया बागेतील बाकावर एक मध्यमवयीन व एक जरा मोठी अशा दोन स्त्रीया बसल्या होत्या . त्यांचे कपडे आणि दिसणे चांगलेच फॕशनेबल होते .
श्यामने व कुमारने पाहताच त्यातील एका स्त्रीने , "ओ दादा, जरा इकडे या."अशी हाक मारली. श्याम व कुमार लगेच "काय झाले ?काय पाहिजे ?" म्हणत धावलेच. "हे थेटर उघडणारे गेले कुठ?"ती म्हणाली. "किती वेळ आंम्ही वाट बघतोय . "तो शिपाई चहा प्यायला नाहीतर बिड्या आणायला गेला असेल." श्याम बोलला .
तीच्याकडे पाहिल्यावर तीचा चेहरा पोस्टरवर पाहल्याचे आठवले आणी ती "सुरेखा" असल्याचे जाणवले. आश्चर्य वाटले. पोस्टरवर केवढ्या मोठ्या दिसतात या नट्या. प्रत्यक्षात ती काॕलेजात जाणा-या मुलीसारखीच वाटत होती. तीने पंजाबी ड्रेस घातला होता. अर्थात दुसरी स्त्री "कामीनी" असणार हेही समजलेच.
यांचे आपल्याकडे काय काम असणार. श्याम आणि कुमार काॕलेजची मुले दिसतच होती. "ए तुमची घरे जवळ आहेत का?" श्याम म्हणाला आहे. ती म्हणाली ,"थेअर ऊघडले नाही. आम्हाला जरा फ्रेश व्हायचेय. " श्यामला निश्चित समजले नाही परंतु तर्काने त्यांना घरी का जायचेय ते कळले. "चला" श्याम म्हणाला.
लगेच दोघी ऊठल्या. पर्स घेतल्या. श्याम कुमारला म्हणाला. "संध्याकाळी भेटू." श्याम आणि दोघी चालू लागल्या. श्यामला बरेच जण ओळखत होते. हा बाबा या दोघींना घेऊन कुठे चाललाय काही समजत नव्हते.
घर जवळ आले. एकदम श्यामला वाटले, आई घरी आहे. या दोघींना कोणत्याही कारणाने घरी नेले तर आपले काही खरे नाही. मग आठवले ,दादा काळ्यांचा बंगला आहे की. दादा आत्ता घरी असतातच. काकू गेल्यात भाजी आणायला.
श्यामची दादांच्या घरात रोज ऊठबस असे. त्यांच्या घरच्यासारखाच तो झाला होता. चटकन आत जाऊन दादांना "नट्या आल्यात. फ्रेश व्हायला. " दादा समजले. "अरे श्याम्या त्यांना बाहेर का थांबवले आहेस? आत घेऊन ये" म्हणाले. श्यामचा जिव भांड्यात पडला. आता काकू आल्या तरी भिती नाही.
त्या आत गेल्या. काकू आल्या. श्यामला पाहताच म्हणाल्या. "श्याम बाहेर लोक का जमा झालेत बघ. " श्यामने बाहेर डोकाऊन पाहिले . पन्नासएक मुले, मुली, पुरुष , स्त्रीया आत डोकावायचा प्रयत्न करताहेत. "ए काय चाललेय. का आलाय?." नटी, नटी आलीय ना. " असे ते म्हणत होते. आणखी लोक जमा होणार असे दिसत होते. "त्या काही बाहेर येत नाहीत. तुम्ही जावा. " असे श्यामने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐकायला कोणी तयारच नव्हते.
काकूंनी सगळे कळल्यावर सुरेखा व कामिनीबाई यांचे चांगले स्वागत केले. शीरा, चिवडा, चहा सगळे त्या नको म्हणत असता घ्यायलाच लावले. आवरुन त्या निघाल्या.
दादांनी ओळखले . यांना लोक सरळ जाऊन देणार नाहीत. त्यांनी श्यामला ड्रायव्हरला बोलवायला सांगितले . बंगल्याच्या मागील दाराने जाण्यास सांगितले .
ड्रायव्हर आले. दादा व काकूंचे आभार मानून त्या निघाल्या . जाता जाता श्यामला नाटकाला येण्याचे निमंत्रण देऊन दिले. दादा व काकूंना बोलावले. ते शक्यतो कोठे जात नसत. ते नुसते बरं पाहू म्हणाले.
श्याम दोघींना थेअरवर सोडून आला. येताना जणूकाही हवेतच चालत होता. नाटकाला कसे जायचे हा प्रश्न आपोआप सुटला होता. परंतु लोकांना या दादांकडे आल्याचे कसे कळले याचा विचार करता ते कुमारचेच काम असल्याची खात्री पटली.
संध्याकाळी कुमार आलाच. त्याने सहज म्हणता ब-याच लोकांना श्यामने नट्यांना दादांच्या घरी नेल्याचे सांगितले होते. "श्याम नाटकाला जाणार असशीलच, आम्हाला नेणार ना?" असे भेटेल तो विचारु लागला. त्यांना समजावता समजावता श्याम वैतागला.
संध्याकाळी पहिल्या रांगेतून श्यामने जन्मात पहिल्यांदाच नाटक पाहिले. बरोबर कुमार होताच. नटीशी झालेली ओळख आता त्याचे जन्मभरचे भांडवल झाले होते.

Comments