देव...................................

 बरेच दिवस वेगवेगळ्या नावांचा विचार केल्यावर हे नाव नक्की केले. तसे पाहता देव ही संकल्पना अतिशय वैयक्तिक आहे. आपण या बाबतीत अतिशय संवेदनाशील वगैरे असतो.

जे.कृष्णमुर्ती. म्हणायचे की आपल्याला आपले विचार ही आपली संपत्ती वाटते. त्यामुळे आपल्या विचाराविरुद्ध काही ऐकले की सैरभैर व्हायला होत असते.
देव ही संकल्पना कधी जन्माला आली सांगता येणार नाही. आदिम मानवाला निसर्गात घडणा-या घटनांचे आश्चर्य वाटत असेल. वारे, वादळ, पाऊस, ऋतू कसे येतात याचे शास्त्रीय कारण कळत नसेल. प्रत्येक घटनेला जसा कर्ता असतो तसा या घटनांनासुद्धा असेल असे वाटत असेल. ज्या अर्थी घटना प्रचंड व मोठ्या दिसतात त्या अर्थी त्यांचा कर्ता सुद्धा तेव्हढाच प्रचंड असला पाहिजे. या घटना बहुशः आकाशातुन येतात, म्हणून तो कर्ता वर असला पाहिजे असे वाटले असेल.
आपल्याला अखंड कोणत्या ना कोणत्या गोष्टीबाबत भिती, अनिश्चितता वाटत असते. अशा वेळेस आधाराला काही असले की बरे वाटते. प्रत्यक्ष मदत कोणी माणूसच करत असतो. "कसा देवासारखा धावलास बघ . " म्हणण्याचे तेच कारण असावे.
ईच्छाशक्तीच्या बळावर लोकांनी अशक्यगोष्टी शक्य करुन दाखवल्याचे आपण पाहतो, वाचतो, ऐकतो. तसेच देवावरच्या संतांवरच्या श्रद्धेने शक्य होते असेही वाचले, ऐकले आहे. त्यामुळे देव दिसला नाही तरी तो आहे ही श्रद्धा बळ देत असते.
लहानपणी देव "देवबाप्पा शिक्षा देईल." अशाच ड्युटीवर असे. त्याने दिलेले बक्षीस दिसत नसते. त्यामुळे शिक्षा न होणारास कसलीच भिती राहणार नाही. त्याची देवाबद्दल संकल्पना भुमितीतील गृहीत धरलेल्या त्रास न देणा-या प्रमेयासारखी होईल असे वाटले. परंतु चुका करणा-यास प्रायश्चित भोगताना वाईट वाटत असेल. मोठेपणी काही जणांना देव पाप विमोचक वाटतो.
मला तर रोजचे काम आणी आपल्या सभोवती पसरलेला निसर्ग हाच देव वाटतो. त्याचे दर्शन घ्यायला कोठेच जावे लागत नाही.
आपला एक श्वास किंवा एक पाऊलही त्याच्यावीना पडू शकत नाही. पर्वत, टेकड्या, पशू, पक्षी, माणसे, हवा, वारे,वादळ, झरे, नद्या, समुद्र सर्वत्र तो आहेच. एका आॕक्सीजन सिलेंडरच्या किंमतीवरुन पृथ्वीवरील सर्व जिवीतांस अखंड दिलेल्या आॕक्सीजनची किंमत तरी करता येईल का? अशा सर्व देणग्या मिळून किती हिशेब करावा? परत तो अखंड देतच आहे.
हा दाता स्वयंभू आहे. त्याचा तो चालत राहतो. आपल्याला हवे ते सर्व देतो.आपल्या आयुष्यात मात्र तो ढवळाढवळ करत नसावा. ते आपापलेच निस्तरावे लागते. त्यामुळे त्याबद्दल त्याला जबाबदारही धरता येणार नाही.
देव जरी दिसला नाही तरी ,आपण सुदैवी असलो तर जिवंत न पेक्षा पुस्तकातुनही संत छान भेटतात. ते देवाचेच अवतार. काही अपवाद वगळता, संतांचे जिवन स्वच्छ ,निर्मळ झालेले असते. त्यांना स्वतःचे काही मिळवायचेच नसते. केवळ ऊपकारासाठी असे त्यांचे जगणे असते.
गोंदवलेकरांची प्रवचने मला एखाद्या चांगल्या वकिलाच्या आर्ग्युमेंटसारखीच वाचनीय वाटतात. मुद्दा कसा पटवावा , छोटी छोटी उदाहरणे कशी द्यावीत हे त्यांच्याकडून शिकावे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद असे सगळेच वाचनीय आहेत.
संतांवरुन देवाचा विचार करावा. निसर्ग हा कनवाळू, बीग ब्रदर सोबत आहेच. त्याचा हात धरावा. मार्ग आपणच शोधावा आणी चालावा .जमल्यास चार चौघाना मदत करावी, नाही का?

Comments