ती.......................
बरेच दिवस घराच्या बाहेरच्या कोपऱ्यात कशीतरीच उभी करुन ठेवली होती तीला. झाले ,म्हटले आज ना उद्या अडगळ स्वरुपात तीची रवानगी कच-यात होणार. अगदी वाईट वाटले.
उचलली तीला आणि आणली घरात. चांगली धुतली , पुसली आणि माझ्या अभ्यासाच्या, पुस्तकांच्या खोलीत आदराने तीची स्थापना केली.
कोण ती? एक साधी बांबुची साडेतीन फुट ऊंचीची हात धरण्यासाठी वळवून गोल केलेली काठी. लौकिकार्थी ,वापरणारे गेले, वापर संपला तीची किंमत बाजाराच्या दृष्टीने शून्य झालेली.
पण मला ते बरे वाटेना. वस्तू जरी निर्जीव असली तरी तीला आपण वस्तू म्हणून पाहू शकत नाही. ती वस्तू वापरणारा/री आपल्या नजरेसमोर भावनेने ऊभी राहते.
त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. पण ही माझ्या काकांची, आजोबांची काठी म्हटल्यावर तेच नजरेसमोर ऊभे राहतात. कोणी याला भाबडेपणाही म्हणू शकेल पण मला ही भावना भावते ,हे मात्र नाकारता येणार नाही.
काय वाटत असेल तीला? काकांची असेल तर चाळीस पन्नास , आजोबांची असेल तर साठ सत्तर, वर्षांपूर्वी ती आमच्या वाड्यात आली असेल.
बाजारात किंवा फिरायला जाणा-या आजोबांना तीने ताठपणाने आधार दिला असेल. त्यांना म्हातारपणी जरा कमी दिसत असे. त्यांची गादी पलंगपोस यांना एकही सुरकुती पडलेली त्यांना खपत असे.
कोणी ते हलवलेले दिसल्यास याच बाईने आम्हा मुलांना थोडाफार चोपही दिला असेल. पण एकूण आजोबांच्या सारखा शांत, प्रेमळ स्वभाव तीचा असला पाहीजे असे वाटून जाते.
तीला हातात धरली , तीच्यावरुन हात फिरवला तर आजोबा, काका यांचा हातच धरला आहे असे वाटते. ती जर काकांची असेल तर तीने वर्षानुवर्षे काकांना शाळेत, सभा समारंभात ,फिरण्यासाठी साथ केली असेल.
चांगले शिकवण्यासाठी व दंगेखोरांस थोडीशी जरब बसवण्यास तीचा निश्चितच उपयोग झाला असेल.
इतके काही पाहून झाले. आता आपला उपयोग संपला म्हणून आपल्याला कोप-यात टाकले असेही तीला वाटले असेल.
आता निदान तीला घरात तीच्या जागेवर म्हणजे माणसांच्या, पुस्तकांच्या सांनिध्यात आणल्यावर कदाचीत तीला बरे वाटण्याची शक्यता आहे.
पुर्वीच्या कणखर , ताठ बाण्याच्या, स्वच्छ , शुद्ध , तत्वनिष्ठ माणसांच्या तुलनेने आताचे आम्ही लोक तीला अगदीच साधे, मिळमिळीत वाटण्याचीही शक्यता आहे.
यापेक्षा नाश झाला असता तर बरे झाले असते येव्हढे वाटले नाही तरी बरे.
Comments
Post a Comment