ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ लेखांक --७
कोवीड २०१९ सारखा हा कायदासुद्धा २०१९ चा असल्यामुळे सर्वांच्या लक्षात राहिल असे वाटते. आतापर्यंत आपण ग्राहक तक्रार, सदोष वस्तू किंवा सेवा यांचेबाबत दाखल करता येते हे पाहिले.
आता आणखी कोणत्या बाबींच्या बाबतीत ग्राहक तक्रार होऊ शकते ते पाहू. त्या बाबी आहेत, अनुचित व्यापारी प्रथा, फसवणूक करणा-या जाहिराती आणि वस्तूंच्या वापरामुळे होणारे नुकसान.
हे तिन्ही प्रकार काय आहेत. त्यांच्याबद्दल कोणाला कोठे करता येते हे पाहिले पाहिजे.
अनुचित व्यापार प्रथा म्हणजे वस्तू किंवा सेवा देण्याच्या बाबतीत, तोंडी , लेखी किंवा दृश्य प्रकारचे किंवा इलेक्ट्रॉनीक पद्धतीने, वस्तू किंवा सेवांचा दर्जा, गुणवैशिष्ठे, प्रत, अंतर्भूत घटक, वगैरेंबाबत खोटी विधाने करणे. जुन्या किंवा नुतनीकरण केलेल्या वस्तू नव्या आहेत सांगणे.
वस्तू किंवा सेवांस नसलेले पाठबळ, संमती, कार्यक्षमता , गुण, सुटे भाग , फायदे आहेत असे खोटेच सांगणे वगैरे अनेक प्रकार. थोडक्यात वस्तू किंवा सेवांबाबत खोटी आश्वासने देणे.
फसवणूक करणा-या जाहिराती म्हणजे वस्तू वा सेवांबाबत खोटी माहिती , हमी, किंवा वस्तूच्या वा सेवांच्या प्रकार, गुण, आकडा याबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारे केलेल्या जाहिराती .
वस्तूमुळे होणारी नुकसानी म्हणजे वस्तूच्या वापरामुळे झालेली हानी. त्याबाबत वस्तूचा ऊत्पादक वा विक्रेता दोघांही विरुद्ध जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करता येते. नुकसान भरपाई मागता येते.
निर्बंधीत व्यापार प्रथा म्हणजे वस्तूंच्या किंमती व पुरवठा यांत फेरफार करण्यासाठी म्हणजे ग्राहकाला वस्तुसाठी जास्त पैसे द्यावे लागतील अशी व्यापार प्रथा. त्यामध्ये किरकोळ विक्रेत्यास वस्तू उशीरा पोहचवणे व वस्तूंच्या किंमती वाढवणे. एक वस्तू वा सेवा घेण्यासाठी अन्य वस्तू वा सेवा घेण्यास भाग पाडणे वगैरे असू शकतात.
त्याचप्रमाणे विक्रेता किंवा सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांच्यातील अनुचित करार म्हणजे ग्राहकाकडुन अवाजवी ठेव घेणे, करार मोडल्यास अवाच्या सवा भरपाई लावणे, आवश्यक किंमत देऊनही कर्जाची मुदतपुर्व फेड न स्वीकारणे. विनाकारण एकतर्फा करार मोडण्याची तरतुद. ग्राहकाचे नुकसान होईल अशा अटी, तरतुदी असणारे करार.
अशा प्रकारांबाबत ग्राहक संबंधित आयोगाकडे तक्रार करु शकतो.
आता पुढील भागात तक्रार कशी केले जाते. कशी चालते. आयोग कोणकोणते आदेश देऊ शकते हे पाहू. तोवर उजळणी करुया.
Comments
Post a Comment