पंछी बनुं............................................
रामनाथ अतिशय हुशार मुलगा होता. परंतु अभ्यासाबरोबर त्याच्या डोक्यात सतत वेगळेवेगळ्या शंका येत असत. त्याचे बाबा आदिनाथ बँकेत कॕशीअर होते. आई सुधा शाळेत शिक्षिका होती. " पक्षी कसे ऊडतात? आपल्याला का ऊडता येत नाही? " हा प्रश्न त्याला सतत पडत असे. आई बाबांना त्याने हा प्रश्न असंख्य वेळा विचारला होता. त्यांनी आपापल्या ज्ञानानुसार त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्याचे समाधान झाले नव्हते.
त्याने शाळेतल्या विज्ञानाच्या सरांना विचारले. त्यांनी पक्षांच्या शरीराची रचना, कमी वजन, पोकळ हाडे, पंख, असे सगळे समजावून सांगितले . तेव्हढ्यावर समाधान झाले तर तो रामनाथ कसला? " पण आपल्याला ऊडता का येत नाही?" "अरे, पक्षांसारखे आपल्याकडे काहीच नाही तर आपण कसे ऊडू शकणार?" असे त्यांनी त्याला सांगितले . "तू खूप अभ्यास कर, मोठ्ठा इंजिनियर हो. मग तुला कळेल. " असे सांगून सरांनी विषय संपवला. सर सगळ्या प्रश्नांना खूप अभ्यास , खूप मोठ्ठा हो असेच ऊत्तर देतात, असे लहानपणापासून त्याचे मत झाले .
रामनाथचे गाव छोटे होते. मोठ्यात मोठे घर रमेश सावंत या सावकारांचे होते. रमेश अभ्यासात यथातथाच होता. रामनाथसारख्या पहिल्या , दुसऱ्या नंबरात येणाऱ्या मुलांना तो घरी बोलवायचा. त्याची अम्मा मुलांचे खूप लाड करायची. रमेशला अभ्यास करायला शिकवा म्हणायची.
मुले थोडा अभ्यास करुन गच्चीत पळत. तेथून दिसणारे दृश्य रामनाथला फार आवडे. आपण पक्षांसारखे उडू शकलो तर याच्याहुन उंच जाऊ शकू असलेच विचार त्याची पाठ सोडत नसत.
अभ्यासाची , अन्य वाचनाची त्याला प्रचंड आवड होती. संस्कृतचे जोशी सर संस्कृत भाषेची महती सांगताना " सगळे विज्ञान आपल्या वेदांत आहे. त्याचा अभ्यास करायला हवा. रसायन, युद्धशास्त्र, अस्त्रे, विमानविद्या सगळे आहे त्यात . "म्हणत. हे ऐकून रामनाथ चकीत झाला. तास संपल्यावर तो जोशी सरांना मुद्दाम टिचर रुम मध्ये जाऊन भेटला. "सर विमान विद्येत पक्षांसारखे माणसाला ऊडण्याचे काही लिहीले का? ते कोणत्या वेदात आहे? " मला सांगा.
आजपर्यंत सरांनी ब-याच वेळा हे मुलांना सांगितले होते. पण ते कुठे आहे ते दाखवा असे विचारणारा नववीतला रामनाथ हा पहिलाच विद्यार्थी भेटला होता.
"हे बघ, मला आत्ता जरा काम आहे. मी दोन , तीन दिवसात तुला विमानविद्या कोणत्या वेदात आहे ते निश्चित सांगेन." असे सांगून टाकले. ते निश्चित उत्तर देण्याचा प्रसंग आलाच नाही. कारण मे महिन्यात त्याच्या बाबांची जवळच्या जिल्ह्याच्या गावी बदली झाली.
दहावी , बारावी पर्येंत मार्क, आणि स्कोअर यांच्याशिवाय दुसरे शब्दच घरात ऐकू येईनासे झाले. आईबाबांच्या प्रोत्साहनाचा रामनाथने फायदा करुन दाखवला व उत्तम मार्काने तो पास झाला.
इंजीनिअर व्हायचेच होते. एरोनाॕटिकल इंजिनिअरींगने त्याला भुरळ घातली होती. मनातले हवेत उडण्याचे सुप्त खुळ स्वस्थ बसवत नव्हतेच.
उत्तम काॕलेज, भरपूर अभ्यास, परदेशी मासिके, पुस्तके सगळ्यातुन विमानांच्या इतिहासापासुन प्रत्येक छोटे, मोठे भाग, त्यांचे कार्य अगदी अपघातानंतर चूक शोधण्यासाठी चौकशी कशी केली जाते हे सुद्धा त्याला समजले.
एकदा त्याच्या वाचनात लोकमान्य टिळकांसमोर मुंबईच्या चौपाटीवर तळपदे बंधुंनी पा-याचा उपयोग करुन स्वदेशी विमान उडवून दाखवले होते असे आले. "अरे हे काही नवीनच आहे. जोशी सरांची विमानविद्या ही असेल का?" असे त्याच्या मनात विचार आले.
थोडे दिवस केसरी आॕफीसला संपर्क करुन त्याने पाठपुरावा केला. तेंव्हा त्यांच्याकडून इतके जुने अंक ठेवलेले नाहीत परंतू त्या प्रयोगाला एक काटेशास्त्री हजर होते . ते बेळगावचे होते असे कळवले गेले.
झाले एका सुट्टीत रामनाथ बेळगावला जाऊनही आला. काटेशास्त्र्यांच्या वाड्याच्या जागी "पॕरेडाईज एनक्लेवज्" असा टाॕवर उभा होता. काटेशास्त्र्यांची मुलगी मुंबईला असते येव्हढेच समजले आणि तो शोध संपला.
तळपदेंच्या घरातील कोणी सापडते का ते पाहिले. परंतु ते सगळे आपापल्या व्यवसायात पार बुडालेले होते. प्रयोगाचे कागदपत्र मिळालेच नाहीत.
त्याने वेदांच्या भाषांतरांना हात घातला. त्यात विमानांची वर्णने होती. पण विमान करायचे कसे हे नव्हते किंवा उपलब्ध नव्हते.
बघता बघता दर वर्षी चांगले पाॕईंट घेऊन रामनाथ चमकत होता. चौथे वर्ष आले. आता एक विषय मुद्दाम इंजीनिअरींगशी अजिबात संबंध नसलेला निवडायचा होता. प्राचीन विद्या हा विषय त्याने मुद्दाम निवडला. त्यात पतंजलींच्या योगसुत्रांचा उल्लेख आला. त्याचा अभ्यास करता एके ठिकाणी मुनींनी संयम म्हणजे काय ? ते सांगितले होते. वेगळेवेगळ्या ठिकाणांवर संयम केल्यास वेगळेवेगळ्या सिद्धी कशा प्राप्त होतात. अवकाशावर संयम करता हवेत उडायला येते असे म्हटले होते. त्याने सरांना विचारले. तेंव्हा त्यांनी हे सगळे थिअरी म्हणून ठीक असते. तसे प्रॕक्टीकली होत नाही. हा विषय क्रेडिटपुरता आहे , तू त्यात बुडू नको सांगितले .
रामनाथ तो रामनाथच होता. इकडे क्लासेस, टेस्ट संपून कँपससुद्धा सुरु झाले. त्याचे क्रेडीटस, हुशारी , समज पाहून त्याला पहिल्याच फ्रेंच विमान कंपनीने उत्तम पॕकेजची नोकरी देऊ केली. स्वीकृतीचा ई मेल ही करायला सांगितले .
जेमतेम दहा दिवसांची सुटी मिळाली होती.आई , बाबा, सगळे नातेवाईक एकदम खुशीत होते. बाळ चार दिवसांनी परदेशी जाणार , तीला काय करु आणि काय नको असे झाले होते. हळूहळू खरेद्या चालल्या होत्या. नवीन बॕगा, कपडे, खाण्याचे पदार्थ चाळीस किलोत बसवायचे होते. थोडेच कपडे घेऊन नंतर तिकडेच घेईन असे रामनाथने सांगितले . एके दिवशी मित्रांना एके दिवशी नातेवाईक, शेजारी सगळ्यांना बोलावून जेवणे देऊन झाली. लगेच जवळचे लोक "रामनाथला मुली बघायला लागा काकू ." म्हणू लागले. "अहो आत्ता तर तो रुजु व्हायला चाललाय . बघु थोड्या दिवसांनी." असे म्हणून सुधाकाकूंनी विषय टाळला.
इंटरनेटमुळे , परदेशी मित्रांमुळे , रामानाथला तसे काहिच जड गेले नाही. काम आवडीचे डिझाईनचे होते. त्यात नवीन कल्पनांना वाव होता. वातावरण खेळीमेळीचे होते.
आॕगस्टीन मॕनेजर तसा पस्तीशीचाच होता. लालसर गोरापान आणि गुटगुटीत . सतत हसत असायचा. रामनाथला थोडे दिवस कंपनीच्या रेस्ट हाऊसवर रहायला मिळाले. नंतर त्याने जवळच्याच जराशा खेडेगावातला बंगला भाड्याने घेतला. त्या बंगल्याला मागे पुढे मोठ्ठी रिकामी जागा, बाग, एक तळेसुद्धा होते.
कंपनीत त्याला एके दिवशी अतिशय पातळ परंतु मजबूत अशा धातुचा पत्रा सापडला. चौकशी केल्यावर तो पुर्वीच्या एका विमानाच्या प्रोजेक्टसाठी तयार केला होता असे समजले. अॕल्युमिनीयम आणि काही धातुंच्या मिश्रणापासुन तो बनवला होता. येव्हढ्या मोठ्या त्या पत्र्याचे वजन फक्त काही ग्रॕम होते. एका हाताच्या चिमटीत तो उचलता येत होता. त्याच्या डोक्यात लगेच पक्षी नाचू लागलाच. कंपनीकडून रितसर परवानगी घेऊन त्याने तो पत्रा घरी आणला.
मग सुरु झाली प्रयोगांची मालिका. बंगल्यातच त्याने मोठे पंख पसरलेल्या गरुडाचे चित्र भिंतीवर टांगले होते. गरुडाची डौलदार मान, चोच, पाय, सगळे मोजमाप त्याला पाठच झाले होते.
रावण असे विचित्र नाव असलेला एक मित्रही त्याला भेटला. तो सुद्धा तंत्रज्ञानात हुशार होता. रामनाथच्या डोक्यात काय चालते त्याला बरोबर समजायचे.
डिझाईनचे कौशल्य तर होतेच. दोघांनी महत्प्रयासाने गरुडापेक्षा मोठे पंख तयार केले. ते उघडता, मिटवता येत असत. शिवाय ते मोटरच्या सहाय्याने कितीही जोरात हलवता येत असत. त्यांचे वजन कमी असल्याने मोटरला इंधनही फार लागत नसे. हेल्मेट गरुडाच्या मानेसारखे केले होते. पाय आडवे करुन ठेवता येत असत. अशा डिझाईनमुळे ते हाताने पंख हालवुनही चालेल असे रामनाथला वाटत होते.
त्याची चाचणी घेणार कोण आणि कशी हाच प्रश्न होता. रावण एका पायावर तयार होता पण आपल्या प्रयोगात काही बरे वाईट झाले तर? हा प्रश्न होता.
शनिवारी सकाळ होताच रामनाथ आणि रावण बंगल्याजवळच्या छोट्या टेकडीवर गेले. तेथे भरपूर वारा असे. रामनाथने वारा येताच गरुडाचे हेल्मेट घातले. पंख पसरले आणि क्षणार्धात एखाद्या पक्षासारखी हालचाल करत रामनाथ पुढे झेपावला. वा-याचा वेग होताच. हात हलवताना कष्ट पडत नव्हते. पक्षासारखी मान हलवत रामनाथने सगळा परिसर मनसोक्त पाहुन घेतला. बालपणीचे स्वप्न साकार झाले. त्याला सावंताचे घर, जोशी सर विमानविद्या सगळेच आठवले.
झरझर फिरुन दिशा बदलता येते का? वेग कमी जास्त करता येतो का सगळे पाहून तपासून झाले. वारा थोडा कमी होताच पंख जोराने हलवून तोच परिणाम साध्य होत होता. पाच सात मिनीटे उड्डाण झाल्यावर रामनाथ हळूच खाली उतरला. रावणाने त्याला घट्ट मिठी मारली. "बस्स यार हो गया काम. अब मेरी बारी." म्हणत रावण तशीच सवारी करुन आला.
फारशी सामुग्री न घेता आपल्याला पक्षी होता आले याचे अप्रुप होतेच. पुर्वीही असे प्रयोग झाले होते पण हाताने आणि मोटरने एकाच वेळी चालवणे कोणालाच जमले नव्हते.
रोमांचकारी खेळ, मस्त मजा, पेट्रोलला पर्याय, पर्यावरण रक्षण, संरक्षण खाते, असंख्य उपयोग दिसू लागले. आता वारा नसताना मोटरवर ते कसे चालते ते पहायचे होते.
ते खाली मैदानात आले. तेथे वारा नव्हता. सुंदर गवत मैलोन मैल पसरले होते. पुन्हा रामनाथ सरसावला. गरुड तयार केला. मोटर तपासली , सुरु केली, पंख पसरले आणि पुन्हा गरुड आकाशात झेपावला. आता पंख मोटरने हालत होते. अजिबातच कष्ट नव्हते. इतक्या ऊंचीवरुन खाली पाहताना भिती वाटू शकेल हे मात्र प्रयोगाच्या नादात त्यांच्या लक्षात नव्हते. त्याचे काही करु म्हणत दहा मिनीटांनी रामनाथ सहज खाली उतरला. रावणही फिरुन आला.
दिवसभर ते अत्यंत आनंदात होते. ते इतके काय करत असतात शेजा-यांनाही कळत नव्हते. हळूहळू रामनाथने गरुड आणखी मजबूत केला. पंखांवर वेगळेवेगळी डिझाईन्स काढली. त्याला नाव दिले " गरुडपंख"
त्याचे पेटंटही घेतले. ते सगळे कंपनीत समजले. त्यांनाही बरे वाटले. पण आपण सोडून दिलेल्या प्रोजेक्टमधुन हा आत्ता आलेला पोरगा हे अर्तक्य काढतो हे पटत नव्हते. त्याचे श्रेय त्याने कंपनीला द्यायला हवे असे त्यांचे मत होते. त्याला रामनाथ आणि रावण तयार नव्हते. आम्ही असा पत्राही आमच्याच देशात बनवू अशी प्रतीज्ञा करुन दोघांनी एकदम नोकरी सोडली.
डिझाईन डोक्यात होतेच. गरुडाचा पत्रासुद्धा कंपनीला देऊन ते परत आले. रामनाथच्या जुन्या गावी गेले. अनेक प्रयोग करुन तसाच पत्रा अखेर त्यांनी बनवलाच. पुन्हा "गरुडपंख " तयार झाले. चाचण्या झाल्या.
प्रयोग सावंतांच्या गच्चीवरच करावयाचे ठरले. मोठ्ठा मंडप घातला होता. रमेश सावंत आता मोठ्ठा बिल्डर झाला होता. शाळेतले मित्र जमले होते. जोशी सरांना मुद्दाम बोलावले होते.
गरुडपंखाची पुजा केली. रामनाथ ने त्यातुन सहज दहा मिनीटे उड्डाण केले. रावणनेही ते चालवून दाखवले. जोशी सर म्हणाले, " रामनाथ आमची विद्या नुसती तोंडाची. तू ते करुन दाखवलेस. " सगळ्या गावक-यांनी दोघांचे कौतुक केले. सत्कार केले.
बातमी हळूहळू पसरत दिल्लीला गेली. मिलेट्रीने रामनाथला विशेष डिझाईन त्यांच्यासाठी करण्यास सांगितले . ते त्याने एकही पैसा न घेता करुन दिले.
रामनाथ अँड रावण प्रा. ली. कंपनीने वेगळेवेगळ्या ऊपयोगासाठी हवे तसे गरुडपंख बनवायला सुरुवात केली. हळूहळू आकाश गरुडपंखांनी भरुन गेले.
Comments
Post a Comment