कालनाश...............................

 ट्रेकिंगला जाणे हा दिनेश आणी किशोर यांचा आवाडता छंद. दोघेही काॕलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. काॕमर्सला असल्यामुळे तसे अभ्यासाचे टेंशन नसायचेच. बी.काॕम. झाल्यावर दिनेशने घरचा भांड्यांच्या विक्रीचा धंदा पहायचा हे ठरलेलेच होते. त्यालाही ते पसंत होतेच. किशोरला मात्र नोकरीसाठी प्रयत्न करावे लागणार होते.

शनिवार रविवारला जोडून एखादी सुट्टी आली की दोनजण पन्नास किलोमीटर पर्येंत ठिकाण असेल तर सायकली काढत व लांब असेल तर मोटारसायकल.
तसे त्यांचे बरेच गड किल्ले फिरुन झाले होते. सेमीस्टर संपली होती. आता रिझल्ट लागेपर्येंत काळजी नव्हती. आता कोकणात जावे असे त्यांचे बेत चालले होते.
मोटारसायकलने जाऊन प्रथम मार्लेश्वर नंतर रत्नागिरी , चिपळूण करुन पोलादपूर वरुन महाबळेश्वर , सातारा आणी परत असा चार दिवसांचा प्लॕन ठरला.
सकाळी लवकर गाडी काढली. कोल्हापूरला चहा, पन्हाळ्याला नाष्टा करुन बाराच्या सुमारास दोघे मार्लेश्वराच्या पायथ्याशी पोचलेसुद्धा. आता चांगले उन लागायला सुरुवात झाली होती. एका हाॕटेलात दोघांसाठी भाकरी पिठल्याची आॕर्डर देऊन दोघे डोंगर चढू लागले.
प्रवास, उन्ह यांमुळे चढणे अगदी जिवावरच आले होते. पण खाली आल्यावर जेवण झाल्यावरच विश्रांती घ्यायची असेच त्यांनी ठरवले होते.
अर्ध्या तासात ते मंदिरात पोचले. गर्दी नसल्यामुळे दर्शन चांगले झाले. खडकाच्या कपारीत असणाऱ्या नाग सापांना पाहून ते चकित झाले. लोकांना ते नाग साप काहीच करत नाहीत ऐकून त्यांना बरेच वाटले.
धबधब्याच्या छोटयाशा धारेतील थंडगार पाण्याने सगळा शीण निघुन गेला. पुन्हा ताजेतवाने होऊन ते खाली उतरले. भाकरी पिठल्याच्या साध्या पण चवीष्ठ जेवणानंतर त्यांचे डोळे मिटू लागले.
दिड दोन तास तास झोपेत कसे गेले कळाले सुद्धा नाही. चहा पिता पिता दिनेशने चहावाल्यास विचारले," कालनाश कोठे आहे?" तो म्हणाला, " हे काय आहे? कालनाश मी तरी ऐकले नाही."
त्याने जवळच्या एक दोघांना विचारले. पण कोणालाच "कालनाश " माहितीही नव्हता. त्यांची बोलणी चालू असता चहाच्या टपरीच्या मागे झोपलेला एक म्हातारा एकदम पुढे आला"कोणाला हवाय रे कालनाश, काय करायचे आहे त्याच्याशी? "
दिनेश आणि किशोरने त्या आजोबांना ते ट्रेकिंग कसे करतात, त्यांच्याकडे दोन तीन तास आहेत जाता जाता कालनाश पहायचा आहे हे ओरडून सांगितले .
आजोबांनी सांगितले की कालनाश आहे समोरच्या डोंगरात कोठेतरी वर. ते एकदा तरुणपणी जाणार होते तिकडे पण सगळ्यांनी त्यांना अजिबात जायचे नाही असे सांगितले . तरीही एकदा ते तेथपर्येंत गेले होते पण घाबरुन परत आले. ते कशाला घाबरले तेच त्यांना आठवत नव्हते. वाटही आठवत नव्हती.
किशोर दिनेशला म्हणाला," तुला कोणी सांगितले कालनाश का कसला नाश. चल सरळ रत्नागिरी गाठू आणी हाॕटेलात झोपू." दिनेश म्हणाला," मी ऐकलेय कालनाश.आपण येव्हढे पट्टीचे ट्रेकर, आत्ता चार वाजत आलेत. सहापर्येंत परतसुद्धा येऊ चल."
किशोर अनिच्छेनेच दिनेशबरोबर जायला तयार झाला. दोघांनी सॕक चहाच्या टपरीवाल्याकडे ठेवले आणि निघाले. आजोबांनी दिशा तेव्हढी दाखवली होती.
पावसाळा संपलेला. ऊन्हे हळुहळू कमी व्हायला लागली होती. सगळीकडे हिरवेगार गवत पसरले होते. लहानमोठी झाडे, त्यावर पक्षी असे छान वातावरण होते.
डोंगरावर जाणाऱ्या दोन तीन पायवाटा होत्या. त्यांनी अंदाजाने जवळची एक वाट पकडली. कोठे सोपी वाट ,कोठे चढ करत करत दोघे वर जाऊ लागले. आता पायथा खोल दिसू लागला होता.
पुढे पुढे वाट संपली. झाडांची गर्दी झाली. किशोर सतत दिनेशला "चल परत जाऊ " सांगत होता. दिनेश ऐकायला तयार नव्हता. " अरे आता दिसेल कालनाश. मग जाऊ परत," सांगत होता.
आणि अचानक शुन्यातून उगवावे तसे एक जुने पुराणे दगडी देऊळ दिसू लागले. दिनेश म्हणाला," बघ आला की नाही कालनाश. उगीच घाबरतय."
दोघांनी देवळात जाऊन दर्शन घेतले. प्रदक्षिणा घातली. बाहेर येऊन जरा मागे जाऊन पाहू म्हणत ते मागे गेले. मागुन सुद्धा एक वाट दिसत होती.दिनेश म्हणाला," किशा,लवकर खाली जायचेय ना? चल या वाटेने जाऊ." नको रे ही वाट कुठे आपल्याला माहिती आहे. ? आल्या वाटेनेच जाऊ. " ऐकेल तर तो दिनेश कसला. त्याने किशोरचा हात धरला आणि त्याला ओढतच नेऊ लागला. किशोरने हात सोडवला. "बर चल इकडून जाऊ म्हणाला."
हळूहळू ते ऊतरु लागले. इकडे झाडी जरा जास्तच दाट वाटत नाही. झाडापानांचा उग्र दर्प, मधूनच फुलांचा वास. फुले पडलेली दिसत नव्हती. झरे वाहताहेत असे उगीचच वाटत होते.
जवळजवळ अर्धा पाऊण तास ते ऊतरतच होते पण वाट संपत नव्हती. किशोरने घड्याळ पाहिले . " दिनेश बघ घड्याळात पाच वाजले आहेत. " " म्हणजे काय पाच वाजणारच की. " ते नव्हे आपण चारला डोंगर चढू लागलो. तासभर लागला असेल वर यायला. मग अर्धा पाऊण तास ऊतरतोय. मग साडेपाच पावणेसहा वाजायला नकोत?"
दिनेशच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याने त्याचे घड्याळ पाहिले. त्यात तर पाचला पाच मिनीटे कमीच होती. आत्ता त्याला किशोरचे म्हणणे पटायला लागले होते.
पुढे पाहु म्हणत ते परत ऊतरु लागले. आता झाडांना फळे, फुले दिसू लागली होती. पक्षांचे आवाज जास्तच गोड व जवळून येताहेत असे वाटू लागले. एकदम कोणी येऊन पुढे ऊभे राहिल असेही वाटू लागले. नाही म्हटले तरी किशोर जाम घाबरून गेला. दिनेशच्या पोटात कधी नव्हे ती एक भितीची लहर ऊठू लागली. परंतु भिती कशाची हेच कळत नसल्यामुळे काय करावे हेच कळत नव्हते.
"येताना तासात वर आलो. आता अर्धातरी डोंगर ऊतरुन व्हायला हवा होता. " किशोरने म्हटले."हो रे घड्याळ बघ. " दिनेशने सुचवले. किशोरने घड्याळ पाहिले आणि आणि तो मटकन खालीच बसला. " नाही. हे शक्य नाही. " "काय झाले रे.?" काय झाले. हे बघ . दोघांच्या घड्याळात साडे चार वाजले होते.दिनेशही त्या प्रकाराने चकित झाला. दोघांची घड्याळे एकदम खराब होण्याचे काहीच कारण नव्हते. घड्याळ मागची वेळ दाखवते याचा अर्थ डोंगराच्या ह्या बाजूला जितके खाली जाऊ तितकी वेळ मागे जाणार.
किती खाली आलोत हे कळायलाही काहीच मार्ग नव्हता. किशोर म्हणाला," आपण असेच मागे जात राहिलो तर कदाचित काळाच्या मागे जात राहू.
दिनेशला मग एका अर्थाने बरे वाटायला लागले. ," कदाचित आपल्याला भारताचा भूतकाळ पहायला मिळेल.रामायण, महाभारत दिसेल. आपलाही भूतकाळ दिसेल. " किशोर म्हणाला," अरे आपला भूतकाळ इथे कसे असेल? तो आपल्या गावात. इथे असलाच तर इथला भुतकाळ असेल," आणखी थोडे खाली ऊतरण्यावर दोघांचे एकमत झाले.
वाट काढत काढत ते खाली ऊतरु लागले. एक मोठा कडा दिसू लागला आणी ते थांबले. कड्याखाली पाहतात तर खालचे काहिच दिसत नव्हते. वर जशी आकाशाची पोकळी दिसते तीचा निळसर रंगतरी दिसतो. इथल्या अथांग पोकळीला रंगच नव्हता. खाली जायला रस्ताही नव्हता. आता पुढे गेलो तर आपला भुतकाळ काय अंतकाळच येईल असे वाटताच दोघे वरच्या दिशेने पळतच सुटले.
किती वेळ , कोणत्या रस्त्याने पळतोय हेच समजत नव्हते. खूप वेळानंतर देवळाचा कळस दिसला आणि त्यांच्या जिवात जिव आला. दहा मिनीटात ते देवाळामागच्या वाटेवर आले.
मागे वळून पाहतात तर सगळे साधेच दिसत होते. पुन्हा देवळात जाऊन प्रथम न पाहिलेली मुर्ती पाहतात तो काय मूर्तीचे तोंड ऊघडे , आतमध्ये कड्याखालच्या सारखी रंगहीन पोकळी.
दोघांच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले.," अरे हा काळाला खातोय म्हणून कालनाश. थोडक्यात वाचलो ,नाहीतर आपलाही नाश झाला असता."
ते कसे खाली आले समजलेही नाही. म्हातारा त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखा पहात राहिला. प्लॕन अर्धाच सोडून दिनेश आणि किशोर परत आले. दोघांनीही ट्रेकिंगचा नाद सोडून दिला. एकमेकांना भेटल्यावर एकाने "कालनाश" म्हणताच दुसरा "नको रे बाबा " म्हणून पळ काढतो.

Comments