बा आदब...............................
कोणी ?कोणावर ?किती ?आणि का ? विश्वास ठेवावा हा पूर्णतः वैयक्तिक प्रश्न आहे. पण अधूनमधून महाराज या विषयावर काय काय ऐकू येते , कधीकधी पहायला मिळते, ते ऐकून , पाहून करमणूक मात्र होते.
या विषयावर आत्तापर्येंत ब-याच लेखकांनी, समाजसुधारकांनी येव्हढेच काय ज्ञानेश्वर, तुकाराम , रामदास वगैरेंनी संतांनीही लिहून ठेवले आहे.
अलिकडे प्रत्येक गावांत एखादे इतकेच काय महानगरांतुन कित्येक महाराज दिसून येतात. काहीजणांवर अगदी पोलिसांचीसुद्धा नजर असते.
"तसे महाराजांचे दर्शन दुर्लभ असते बरे का, कोठूनतरी ओळख काढली आहे. बरोब्बर साडेसातला तयार रहा. मुले , मिसेस हे सुद्धा आलेले चालेल." असा एका जवळच्या मित्रांचा निरोप आला.
तसा मी, मुले, मिसेस सगळेच अशा महाराजांच्या दर्शनाला फारसे उत्सुक नसतोच. त्यापेक्षा एखाद्या सिनेमा , नाटकाला बोलावले तर आम्ही एका पायावर तयार असतो.
पण मित्रांचे मन मोडवत नाही. या मित्रांना अशा दर्शनांची हौस असे. येव्हढे बोलावताहेत. बरे महाराजही साधेसुधे नाहीत , तर चांगले किर्तीवान. चला तर चला म्हटले.
मुलांनी येताना हाॕटेल, किंवा कमीतकमी काहीतरी घेऊन देण्याच्या अटीवरच आमच्या बरोबर यायचे कबूल केले. खरे म्हणजे दोन्ही मुलांची डोकी नेवाशाच्या ज्ञानेशांच्या पैसाला आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायावर ठेऊन आणली होती. त्यापेक्षा पाॕवरफुल कोणी असेल असे वाटत नव्हते.
चांगले कपडे घालून सगळे तयार झालो. जायचे ठिकाण जवळच म्हणजे चालत जाण्याइतक्याच अंतरावरच होते.
आम्ही दहाबाराजण झालो. काॕलनीतुन पुढे जाताजाता रस्ते जरा जास्तच स्वच्छ वगोरे दिसू लागले. आश्चर्य वाटले. बरेच लोक हातात काही छोटी पुस्तके घेऊन चालले होते. काहीजण भक्तीभावाने महाराजांची भजने म्हणत चालले होते. आमच्या आॕफीसातले काहीजण दिसले, "का हो इकडे कुठे?" विचारले. "आम्ही बहुतेक प्रवचन दर्शनांना येतो. नंतर इकडूनच घरी जातो." छान छान. म्हटले.
आणखी जरा पुढे जातो तो काय अनेक लोक छोट्या , छोट्या दिंड्या घेऊन लोक आले होते. मी म्हटले अशा दिंड्या तर तिर्थक्षेत्री दिसत असतात. कोणी म्हणाले "लोक हौसेने अशा दिंड्या आणतात."
एका मोठ्या पटांगणात भिंतींलगत बरेच स्टाॕल लावले होते. काही उपवासाच्या पदार्थांचे तर काही पुस्तकांचे , काही माळा, लाॕकेट, वह्या, डाय-या , टी शर्ट,शर्ट, यांचे होते. सगळ्यांवर महाराजांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे वेगळेवेगळ्या मुद्रांतील सुंदर फोटो होते . त्या स्टाॕलवर मात्र ब-यापैकी गर्दी होती. सहज एका वहीची किंमत विचारली. तर म्हणाला ,"शंभर रुपये. " वही तर साधी पंधरा वीस रुपयांचीच होती. पण महाराजांच्या नाममुद्रेने तीची किंमत पाच , दहापट वाढली होती. काही लहान लहान काटक्या एकत्र बांधलेल्या होत्या. तेही पन्नास का शंभर रुपयांना होते. " हे काय आहे?" मी सहज विचारले. तर त्या स्पेशल समिधा होत्या. किंमत फक्त शंभर रुपये.
असे स्टाॕल पाहिल्यानंतर खाद्यपदार्थांच्या स्टाॕलकडे जायला नकोच वाटत होते. मुलांनी तिथले पदार्थ पाहिल्यानंतर घरीच जेवण करावे, पीझ्झा आणावा असे वाटू लागले.
तिकडे पुढच्या प्रवचनाची पुर्वतयारी सुरु होती. स्क्रीन लावणे, माईक टेस्टींग, लाईट, स्पाॕट, मला तर ती नाटकाचीच तयारी वाटू लागली.
तसे आता दर्शनाला फारसे लोक नव्हते. हळूहळू छोट्याश्या रांगेतुन आम्ही पुढे सरकत होतो. मोठ्या स्टेजवर चांगले कार्पेट घातले होते. मध्यावर पांढऱ्या शुभ्र गाद्यांचा डोंगरच रचला होता. त्यात भगव्या कार्पेटवर पांढरेच कपडे, पांढरी शुभ्र लांब दाढी, तेजःपुंज रुप का तोही मेकअप का काय माहिती असे महाराज छान मांडी घालून बसले होते. मंद स्मीत चेहऱ्यावर झळकत होते. समोर बरेच माईक ठेवलेले होते.
आम्ही त्या स्टेजसमोरच्या बॕरीकेडच्या अलिकडे म्हणजे महाराजांपासुन कमीतकमी पंचवीस फुटांवर असू. लोक महाराजांना लांबूनच हात लांब करुन , डोके त्यांच्या पायांवर ठेवल्यासारखे करत होते.
आम्ही सगळे एकदम महाराजांपुढे गेलो. कोणीतरी त्यांच्या कानात काहीतरी सांगितले . त्यांनी दोन्ही हात वार करुन "छान. छान. चांगले. या." येव्हढे म्हटले. काही फुले प्रसाद म्हणून पाठवली. आम्हाला पुढे सरकण्याचा इशारा झाला. आम्ही पुढे सरकलो. मागचे लोक पुढे आले.
दर्शन तर झाले. आता थोड्याच वेळात प्रवचन सुरु होणार होते. आणखी बराच आग्रह झाला म्हणून आम्ही सगळे खुर्च्यांवर बसलो. बराच वेळ गेला. हळूहळू खुर्च्या भरु लागल्या. पटांगण भरु लागले.
सगळीकडे शांतता पसरली. मग कोठे महाराजांचे प्रवचन सुरु झाले. साध्या सोप्या मराठी, हिंदी भाषेत, धीरगंभीर स्वरात महाराज बोलत होते. प्रथम ते येव्हढ्यातच त्यांनी वाचलेल्या ब्लॕक होलबद्दल ते बोलू लागले. व्हाॕटअॕप कृपेने मीही ते वाचले होते. त्याचा अध्यात्माशी संबंध काय हेच मला कळेना.
महाराज ज्ञान, विज्ञान, ग्रह , परग्रहावर बोलू लागले. भक्तगण मात्र रंगून गेले होते. हळूहळू गाडी धर्माकडे, माणसांच्या परस्परसंबंधांकडे वळाली. मुले वैतागली होती.पुढेच बसल्याने उठणेही बरे दिसले नसते.
अशावेळी मुलांचा फायदाही होतो. मुलांना धरुन महत्वाचे काम असल्यासारखा मी उठलो. हळूच बाहेर पडलो. बघतो तर हळूहळू सगळेच मित्र आणि कुटुंबीय बाहेर पडले.
मुलांना आईसस्क्रीम , वडे वगैरे घेऊन घरी आलो. मधुनच उठल्याने ते मित्र जरा नाराज होते पण मुले खूष होती.
काय काय प्रवचन झाले अशा गप्पा सुरु होत्या. इकडचे तिकडचे वाचन करुन कोणालाही असे प्रवचन देता येईल असे मला वाटून गेले.
परत एका वेळेस त्याच पटांगणात गेलो होतो. तशीच गर्दी होती. आज महाराज नव्हते. त्यांच्या चांदीच्या पादुका कोणी डोक्यावरुन आणल्या. राजांपुढच्या भालदार चोपदारांसारखे कपडे केलेले लोक आले. "बा आदब "'अशा ललका-या देत आहेत असे उगाचच वाटून गेले. आणि थोड्याच वेळेत तसेच प्रवचन सुरु झाले. मी आपला मागचेच प्रवचन आठवत घरी परत आलो. मनोमन सर्व प्रकाराला नमस्कार केला आणि व्हाॕटस अॕपमध्ये प्रवचन दिसते का पाहू लागलो.
Comments
Post a Comment