मनचित्र......................................
घाटातून पायलट कार, पोलीस जीप आणि अन्य चार पांढऱ्या गाड्यांचा काफिला वेगाने पुढं सरकत होता. मधल्या ‘कॉन्टेसा’ गाडीत बसलेल्या साहेबांनी मासिक चाळून संपवले. सभांच्या सतत गडबडींमुळे अलीकडे साहेबांनी लिंबूपाणी घेणे सुरू केले होते. तेच आता लेमनस नावाने मिळत असल्याने, गाडीत थंड बाटल्या ठेवलेल्या असत. ड्रायव्हर रामराव ती सर्व व्यवस्था पहात असत.
एका कड्याजवळून ती गाडी जात असतांना अचानक एक गाय कशी कुठून चुकून रस्त्यावर आली. रामरावांनी शिताफीने वेग कमी केला व गाडी थांबवली. बाकीच्या गाड्या ही थांबल्या. साहेबांचा डोळा लागला आणि..!
मागच्या कड्यासारखाच उंच कडा साहेब चढत होते. अधूनमधून दुखणारा उजवा गुढगा अजिबात दुखत नव्हता. मोठं वाढलेलं पोट मुळीच जाणवत नव्हते. शाळेतल्या मुलासारखा चपळपणा आपल्या अंगात कुठून आला असे त्यांना वाटून गेले. जमीन इतकी खडकांची तरीसुद्धा पायात काहीच टोचत नव्हते.
काहीतरी वेगळं घडलंय हे निश्चित. आपण गाडीत बसलो होतो व मुंबईला चाललो होतो असा विचार येताच, त्यांनी खाली पाहीले.. तर लाल गाड्यांचा ताफा व गर्दी दिसत होती. बहुतेक आपला कारभार आटपला असेही साहेबांना वाटले. परंतु, आता थांबणे शक्य नव्हते. कोणत्यातरी न जाणवणाऱ्या ओढीने त्यांची पावले आपोआप पडत होती.
समोर पहातात तर विस्तीर्ण असा प्रदेश पसरला होता. मऊ मऊ गवत. जागोजागी स्वच्छ पाण्याची टुमदार तळी. त्यात उगवलेली कमळे. त्यातून फिरणारे हंस कां कसले पक्षी. दूरवर दिसणाऱ्या टेकड्या आणि रम्य निळसर प्रकाश. पाहू तिकडं दृष्टी ठरत नव्हती. पण तेथे थांबून चालणार नव्हते. सर्व रस्ता माहिती असल्याप्रमाणे ते चालत होते.
थोड्या अंतरावर जुन्या किल्यासारख्या दिसणाऱ्या काही इमारती होत्या. आपण कुठं आहोत ? काय चालले आहे ? कशाचेच भान नव्हते. आपले कारखाने, कार्यकर्ते सगळ्या जाणीवा कापरासारख्या उडून गेल्या होत्या.
किल्याच्या दरवाज्यापाशी गेल्यावर डाव्या बाजूच्या एका दालनात त्यांना एका अतिशय सुंदर दिसणाऱ्या तरूणाने कोचावर बसण्यास सांगीतले. दालनातील व्यवस्था कॉर्पोरेट ऑफिससारखी होती. थोड्यावेळाने चांदीच्या घंटा वाजाव्यात असा मंजूळ आवाज आला आणि मघाच्या तरूणाने साहेबांना आणखी एका दालनात प्रवेश करण्याची नम्र सूचना केली.
आत पाय टाकला आणि साहेबांचा पाय एक फूट जाड गालीच्यात रुतला. आपले स्वतःचे ऑफिस साहेबांना गरीबाच्या झोपडीसारखे वाटले. हे काय आहे... ? पण त्याच्या पुढं विचारच जात नव्हते. दालनात समोरच संगमरवरी सिंहासनासारख्या आसनावर एक कोणी बसले होते. त्याच्या अंगावर एकही दागीना नसतांनासुद्धा त्यांचे शरीर तेजाने लखलखत होते.
“या सिद्धू काळतांबे.” आपले बालपणातले नाव साहेब केंव्हाच विसरले होते. त्या दिव्य पुरूषाने स्वतःची ओळख करून दिली... “मायसेल्फ हर्षवर्धन पी.ए. टू मी. चित्रगुप्त. "हल्ली इंग्रजी बोलल्याशिवाय तुम्हा लोकांना बर वाटत नाही म्हणून ही ओळख करून दिली.
“मी.... मी कोण आहे ?, मला इथं कां आणलं आहे?”
“तुम्ही कोण आहात? केवढा महत्वाचा प्रश्न विचारलात.. इतका साधा प्रश्न देऊन आम्ही तुम्हाला तेथे पाठवतो. पण तुम्ही हे विसरून काही तरीच करत बसता.”
“मी समजलो नाही.”
“जरा थांबा.”
त्या पुरूषाने उजवा हात पुढं केला. तर लगेच एक स्फटिकाचे ग्लाससारखे पात्र समोरच्या टीपॉय सारख्या आकारावर प्रकट झाले. पुन्हा एकदा त्या पात्रावर हात ठेवताच त्या पात्रात चमचम करणारे काही पेय दिसू लागले. पीएने साहेबांना ते पेय पिण्यास सांगीतले.
आणखी एक बदल झाला. ते पेय पिताच साहेबांना जन्मल्यापासूनचा प्रत्येक क्षण न क्षण आठवू लागला. आपल्या आयुष्याचा सगळा पट कोणीतरी आपल्यापुढे ऊघडत आहे असे त्यांना वाटू लागले. चांगले-वाईट, सुख-दुःख सर्व भावना कुठच्या कुठं पळून गेल्या होत्या. फक्त एक तरल परंतु दिव्य असे सत्य जाणवू लागले होते.
“हा स्वर्ग आहे काय?” साहेबांचा दुसरा प्रश्न.
पीए पुरूष म्हणाले, “हा स्वर्गही नाही आणि नरकही नाही. हा आहे दरवाजा. इथंपर्यंत आम्ही तुम्हाला साथ करतो. आता थोड्या वेळांनी तुमचा हिशोब सुरू होईल.”
“हिशोब म्हणजे काय? आम्ही आमचं आयुष्य लोकांसाठी वेचले आहे. त्याचे फळ आम्हाला मिळेलच.”
पीए साहेबांनी एक रिमोटसारखी वस्तु काढली. तिच्यावरची कळ एकदा दाबून साहेबांपुढे धरली आणि दुसरे बटन दालनाच्या एका दुसऱ्या कोपऱ्याच्या दिशेने करुन दाबले. तेथे एक मोठा स्क्रीन तयार झाला.
“हे काय आहे?” साहेबांनी विचारले.“या शोधाचे नाव आहे *मनचित्र.* भारतीय ऋषींचा मनाचा अभ्यास, अमेरीकन तंत्रज्ञान व जपानी कलाकृती यांचा हा अविष्कार आहे. तुमच्या ‘सच का सामना’ सारखाच हा प्रकार आहे. आता तुम्ही तुमच्या शंका विचारा.”
“इथं येणारा प्रत्येक जीव शंका घेऊन येतो. माझे काय चुकले? मी बरोबरच होतो. मला खरेच असे करायचे होते कां? एक नां अनेक. आम्ही त्याला प्रत्येक प्रसंगात तो कसा वागला आणि त्याला कसे वागायचे होते हे दोन्ही ऑप्शन दाखवतो. त्यातून तो स्वतःचे परिक्षण करतो.”
साहेबांना पहिल्या निवडणूकीचा क्षण आठवला. कॉलेजात मुलांच्या प्रश्नांसाठी भांडता भांडता, तालुक्याचे नेतृत्व न सांगताच त्यांच्या गळ्यात पडले होते. परंतु निवडणूक जिंकून घेणे तसे सोपे नव्हते.
“आज या ठिकाणी ,तरूण तडफदार सिद्धाजी काळतांबे यांचे नेतृत्व आपल्या भागाला निश्चित पुढं नेणार आहे.” अशा सभा होत होत्या आणि अचानक स्क्रीनवर वेगवेगळ्या गटांच्या प्रमुखांची मते मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी, मतदानाच्या आदले दिवशीपर्यंत सर्वांना खूष करण्यासाठी घातलेल्या जेवणावळी, पूजा, देणग्या सर्वच दिसू लागले. ते बंद झाले आणि साहेबांच्या मनात त्या वेळेला जे करावयाचे होते , ते म्हणजे चांगला प्रोफेसर होऊन मुलांना शिकवणे तेच दिसू लागले.
शेवटी या प्रक्रियेत +2 व -7 असे आकडे दिसून बाकी -5 दिसली.
साहेब त्यानंतर मंत्रीमंडळात गेले. पुन्हा वेगवेगळ्या योजनांचे विचार त्यांच्या मनात डोकावले. कागदावर दिसणारे कोट्यावधी रुपये कुठं गेले आणि प्रत्यक्ष ज्या भव्य योजना किरकोळ स्वरुपात उभ्या राहिल्या, त्या पुढच्या वेळेस पूर्ण करू म्हणून त्याच आश्वासनांचा खेळ सुरू झाला.
शिवाय नातेवाईक, कार्यकर्ते, श्रेष्ठी कुणालाच दुखवता येत नव्हते. यात कसले पाप अन् कसले पुण्य? या विचाराला सवडच नव्हती. ढिगभर ताक ढवळून कणभर लोणी निघावे असे वाटू लागले.
प्रत्येक योजनेपूर्वी पंचतारांकित हॉटेलात भरगच्च पत्रकार परिषदेसमोर केलेली भाषणे दिसू लागली व लगेच संध्याकाळी पडद्यामागच्या चर्चाही दिसू लागल्या. स्क्रीनवर खूप मोठी आकडेमोड झाली आणि +1 व -9 होऊन -8 हा आकडा दिसला.
“अहो, या हिशोबात काहीतरी चूक आहे. लोकांच्या विकासासाठी आम्ही जन्मभर झटलो आहोत. मला हिशोब मान्य नाही. चित्रगुप्तसाहेबांना मला भेटायचे आहे.”
“ते शक्य नाही.” पीए शांतपणे उद्गारले. “आमच्या साहेबांनी असली कामे स्वतः करणे केंव्हाच बंद केले आहे. जर हिशोब मान्य नसतील तर तुमच्यापुढे एक पर्याय आहे.”
“तो कोणता?”
“पुन्हा खाली जाऊन चांगले वागता येते कां ते बघा. तुम्हाला दिलेला वेळ संपत आला आहे. मला प्रवचनाला जायचे आहे.”
“कुणाचे प्रवचन?”
“अर्थात महात्मा गांधींचे. बघायचंय तुम्हाला?” पीए साहेबांनी स्क्रीनकडे हात केला तर सुंदर हिरवळीवर महात्माजी काही रामधून म्हणत होते. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, शास्त्रीजी, आंबेडकर, यांच्यापासून नेताजी, भगतसिंग आणखी खूप नेते समाजसेवक ,सगळेच दिसत होते. त्यांच्या दर्शनाने साहेबांची मान खाली झाली.
“तुमचा दरवाजा हा नव्हे, हे यंत्राने ठरवले आहे. तरीसुद्धा मी तुम्हास एक संधी देतो. एकतर दुसऱ्या दरवाजाने जा.”
“म्हणजे नरकात काय?” साहेबांनी विचारले.
“नाही. आता आम्ही त्याचे नाव भारत ठेवले आहे. किंवा दुसरीकडे जन्म घ्या व आपल्या चुका सुधारा.”
साहेब उठले. पहिल्या दालनात आले. अचानक राजवाड्यासारखी इमारत व सगळा देखावा नजरेसमोरून वितळू लागला.
गाडीचे दार उघडले. रामराव म्हणाले, “साहेब, बरं वाटत नाही काय?”“कुठं काय? मला काही नाही झाले..” आणि गाड्यांचा ताफा पुढे चालू लागला.
Comments
Post a Comment