कायद्याची भाषा........................................
ती तुझी कोर्टाची, वकिलीची भाषा सांगू नकोस. ती काहीही असते". असे बोलणे अधूनमधून ऐकू येते. कोर्टाची भाषा हा भाषेचा काही वेगळा प्रकार आहे का? असे वाटायला लागते.
भाषा सगळीकडे सारखीच असते. पण ती वापरायची पद्धत आमच्याकडे जरा वेगळी असते येव्हढेच. पुणेरी पाट्या, पुणेरी बोलणे, याबद्दल लोक काही काही बोलत असतात. पण कोर्टासंबंधी लोकांना त्यात वेगळे काही वाटत नाही. आम्ही नेहमी कोर्टात बोलतो, वापरतो तशीच ती असते.
साहित्यात जसे भाषेच्या छटांमधुन भावना डोकावतात तसे आमच्या भाषेतुन शब्दार्थांच्या छटा, खरा, गुप्त, गुढ अर्थ जाणवतो येवढेच. कारण आमच्याकडे भाव, भावना यांचा फार विचार केला जात नाही . त्यापेक्षा त्या व्यक्तीला त्या शब्दातुन खरे काय म्हणायचे आहे हेच मुख्यत्वे पाहिले जाते.
का असतो असा शब्दांचा वापर? कारण सोपे आहे. त्या कागदपत्रातील भाषेतुन शब्दांच्या वापरातुन वेगळा अर्थ निघुन कोणाचे नुकसान होऊ नये, एकाला काही द्यायचे ते दुसऱ्यालाच मिळून जाऊ नये हे पहावे लागते.
वसंतराव कानेटकर जसे "येथे गवताला भाले फुटतात" म्हणाले तसे "येथे शब्दांना , पुर्णविरामांना, स्वल्पविरामांनाही अर्थ फुटतात" म्हणून ही काळजी घ्यावी लागते.
कोर्टकामातील वापराच्या कागदापासुन ही सुरुवात होते. आत्तापर्येंत हा कागद हिरवा , जाड लागत असे. कारण त्याचे आयुष्य जास्त असते. निकालपत्रे ही कायम जपून ठेवली जातात.
कोणत्याही दिवाणी कामातील निकालपत्रांच्या प्रती मागणी करताच ऊपलब्ध होऊ शकतात ते त्यामुळेच.
डाव्या बाजुला , ऊजव्या बाजुला व्यवस्थीत समास सोडावे लागतात. परिच्छेदांना क्रमांक असावे लागतात. जसे कैद्यांना क्रमांक असत, पेशंटला काॕट नंबर असतो, तसे कोर्टात आल्यावर आपल्या प्रकरणांना क्रमांक दिले जातात. जसे रे.दि. मु. नंबर १६/२०१२ म्हणजे दोन हजार बारा मधील रेग्युलर दिवाणी दावा क्रमांक १६ म्हणजे ते ठेवायची सापडायची सोय होते. आता संगणकामुळे ते १२/१६ असे असते.
जरी व्यवहारात आपली नावे वेगवेगळी असली तरी कोर्टात आपण वादी, प्रतीवादी, फिर्यादी, आरोपी, अर्जदार, जाबदार होत असतो. ह्यातसुद्धा या नावांवरुन आपले काम दिवाणी आहे का फौजदारी का त्यातील आपणअर्जदार, जाबदार कोण आहोत ते समजते.
जाबदार म्हणजे विरुद्ध बाजु असते. हिंदीत याला सामनेवाले असा शब्द वापरला जातो. म्हणजे सामना करणारा विरुद्ध बाजुचा. या भाषेत हिंदी, फारसी भाषेतील शब्द आले आहेत. दरखास्त म्हणजे काय हे कोर्टात आल्याशिवाय कळावयाचे नाही. निकाल झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा हा अर्ज असतो.
पुरसीस हा असाच शब्द आहे. त्याच्या अर्थ कोर्टाला काही विनंती न करता केवळ कळवण्यासाठीचा हा कागद असतो. हमदस्त हा शब्द, काही अंमलबजावणीसाठी आपल्या हातात मिळावयाचा हा कागद असतो.
पुर्वी युक्तीवादासाठी "तक्रारी " असा शब्द वापरला जात असे. शिवाय वेगळेवेगळ्या भागात जसे निजामशाहीतील भागात काही विशिष्ठ शब्द वापरले जातात. लिहीण्याची पद्धत वेगळी असते.
येथे सर्व काही धर्मयुद्धासारखे असते. म्हणजे काही अपवाद वगळता एका बाजुने काही अर्ज देताच , दुसऱ्या बाजुचे म्हणणे विचारले जाते. ऐकले जाते ,मगच त्यावर हुकूम केले जातात. एखादी बाजु आलीच नाही तर त्या वेळी एकतर्फा हुकूम होऊ शकतो. त्याचेही ज्ञान नोटीस, समन्सद्वारे दिलेले असते. म्हणजे अमुक तारखेला अमुक वाजता (असे लिहीले तरी संध्याकाळपर्येंत वाट पाहिली जाते.) हजर रहावे नाहीतर आपल्याला काही म्हणायचे नाही असे समजुन एकतर्फा आदेश केले जातील वगैरे.
समन्स हे फौजदारी कामातील आरोपीला कोर्टाचे बोलावणे असते तर वाॕरंट म्हणजे आरोपी आले म्हणून त्यास धरुन आणणेचा पोलिसांना आदेश असतो.
कोर्ट अर्जावर इंग्रजी O लिहून त्याखाली आडवी रेघ मारुन काही लिहीते तो ओ म्हणजे आॕर्डर असतो. निकालपत्राचा शेवटचा भाग परत तेथे आॕर्डर लिहीलेली असते म्हणजे प्रकरणात काय झाले ,कोणी , काय, कसे करायचे याचा हुकूम असतो.
कायदा समजणे यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते. म्हणजे शब्द तेच असतात त्याचा नीट अर्थ पहावा, वाचावा, समजावा लागतो. यात "अनलेस, हिअरईनआफ्टर, नाॕट विथस्टँडिंग, प्रोव्हायडेड " असे शब्द वारंवार येतात.
एक वकिल बसुन युक्तिवाद करु लागले. त्यांना विचारले काहो बसून का बोलता?" तर म्हणाले येथे नाॕट वुईथ स्टँडिंग " लिहीले आहे . असा पारंपारिक बेक्कार विनोद सांगितला जातो.
"नाॕट वुईथ स्टँडिंग " एकटे येत नाही. तर" नाॕट वुईथ स्टँडिंग एनी थींग कंटेन्ड इन धीस अॕक्ट " असे येते. म्हणजे या कायद्यात किंवा अन्य कोठेही काहीही लिहीले असले तरी. म्हणजे ही विशेष तरतुद असते.
"अनलेस" यावरुन प्रथम काहीतरी करणे अपेक्षीत आहे असे समजते. "प्रोव्हायडेड" यावरुनही तरतुदींचे विशेष स्पष्टीकरण समजते. काही तरतुदींखाली" एक्स्प्लनेशन्स " अशी स्पष्टीकरणे असतात. शिवाय कोणत्याही कायद्याचे एखादे कलम वाचुन चालत नाही. तर संपूर्ण कायदा, त्या कलमात असलेल्या विशिष्ठ शब्दांचे अन्य ठिकाणी असलेले संदर्भ पहावे लागतात. मग त्यांचा खरा अर्थ, त्यांच्या छटा , कायदा करणा-यांच्या अपेक्षा, त्यांना त्यातुन काय म्हणायचे आहे ,हे समजू शकते. नंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे त्याबाबतचे न्यायनिवाडे तपासावे लागतात. अर्थात सामान्य माणसांस कलम वाचले तर त्याचा अर्थ काय येव्हढे वाचुन समजू शकतेच.
स्त्री , पुरुष यांच्याकरीता वेगळे शब्द नसतात. एक पर्सन म्हटला की त्यात स्त्री , पुरुष, संस्था सगळे येतात.
पुर्वीचे कागदपत्र पाहता त्यात प्रत्येक परिच्छेद" दॕट " असा सुरु केलेला असे. तसे काहीजण मराठीत प्रत्येक परिच्छेद "की" असा सुरु करत. "ज्याअर्थी .... त्याअर्थी" असेही ब-याच ठिकाणी लिहिलेले आढळून येईल. "आमचे अशील " हा शब्दद्वय वाकिलांच्या नोटीसांतुन हमखास आढळणारा आहे.
"कैफियत " हे दाव्यास उत्तर असते.त्यात प्रथम दाव्यातील प्रत्येक परिच्छेदात लिहीलेले ...खोटे आहे असे लिहीलेले असते. शिवाय सर्वप्रथम स्पष्टपणे कबूल केले नसेल तर लिहीलेले सर्व अमान्य आहे असे बजावलेले असते. कारण जी गोष्ट स्पष्टपणे नाकारली नाही ती मान्य आहे असे समजले जाते.
मग असे नाकारल्याचे पंधरा वीस परिच्छेद संपले की खरी वस्तुस्थीती अशी आहे असे लिहून प्रतीवादीचे म्हणणे आणखी पाच दहा परिच्छेदात लिहीले जाते. म्हणून ते कागदपत्र जाडजूड होत जातात.
येव्हढे सगळे लिहीलेले वाचले जाते का? असा प्रश्न पडतो. तर त्याचे उत्तर होय असेच असते. कारण ते वाचल्याशिवाय, पचवल्याशीवाय त्यामधून सत्य समजणारच नाही.
तर अशी असते कोर्टाची भाषा. त्यातुन हवा तो अर्थ मिळतो का पहा. नाहीतर मी आहेच सांगायला.
Comments
Post a Comment