गुरोपदेशाचे शास्त्र .................................

 बापरे. असा ऊदगार काहींच्या मनात उमटणे स्वाभाविक आहे. काहींना हा लहान तोंडी मोठा घास वाटणेही साहजिक आहे. परंतू , कोणाच्याही कसल्याही भावनांचा श्रद्धेचा अनादर करण्याचा यात कणभरही हेतू नाही. लेखातील मते ही वैयक्तिक आहेत असे डिसक्लेमर आधीच लिहीत आहे.

हा लेख लिहीण्याचा अधीकारही विचारला जाऊ शकतो. त्यावर मला पामराला असे वाटते, एव्हढेच उत्तर द्यावेसे वाटेल. आपल्यालाही या बाबतीत मते असतील. त्या प्रत्येकाचे मी स्वागतच करेन. मी कोणत्याच बाबतीत कसलाच अधीकार सांगत नाही.
माणूस हा विचारी प्राणी आहे. किंबहुना आपण म्हणजे आपले विचारच असतो. मी म्हणून जो काही म्हणतो तोही एक विचारच असतो.
माणसाच्या मनात ,जन्मापासून का त्याच्याही आधीपासुन, शेवटपर्येंत रोज असंख्य विचार येत असतात. त्यापैकी काही तांत्रिक म्हणजे कामाबद्दल असतात . बरेचसे विचार भूतकाळच असतात. काही भूतकाळात मोडतोड करुन नविन दृश्य दाखवल्याचा आभास निर्माण करणारे असतात.
भोवताल, परिस्थिती , भूतकाळ , त्याबद्दलचे आपले विचार , वगैरेंनी आपले व्यक्तीमत्व म्हणजे स्वभाव घडतो.
अनादी काळापासून पुढेही प्रत्येकाला चांगला माणूस व्हायचे असते. अगदी वाईट माणसाचीसुद्धा चांगला माणूस होण्याचीच ईच्छा , धडपड असते. कोणीही मला वाईट माणूस व्हायचे आहे म्हणणार नाही.
अर्थात ईच्छा आणि परिस्थिती यात फरक असतो. अपवाद वगळता कोणीही शंभर टक्के चांगला व कोणी शंभर टक्के वाईट असे असत नाही.
समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये गुरुंचे प्रकार, त्यांची लक्षणे, कोणते गुरु कसे वगैरे छान लिहीले आहे. कला, विद्या, शास्त्र , शिकवणा-या म्हणजे टेक्नीकल गुरुंबाबत त्यांचा फारसा आक्षेप नाही. परंतु आध्यात्मिक गुरु जे आहेत, असतात, असावेत त्यांची फार पत्थे त्यांनी सांगितली आहेत.
ती का असावीत याचा विचार केल्यास असे दिसते की आध्यात्मिक गुरुंना समाजात फार मोठे स्थान असते. त्यांचे म्हणणे लोक ऐकतात. लोकांना ते पटते. म्हणून त्यांची कृती त्यांच्या ऊक्तीप्रमाणे असली पाहिजे.
रामकृष्ण परमहंसानी साधू बोने, जोने व कोने म्हणजे जेवताना, समाजात व एकांकात तपासावा असे म्हटले. या सगळ्याला कारण मला एकच वाटते ते म्हणजे त्यांच्या सांगण्याला वजन येते. त्यांना अधीकार येतो. म्हणून कोणीही उठून उपदेश केलेला त्यांस आवडत नसे.
काय सांगतात हे आध्यात्मिक गुरु. मुख्य उपदेश चांगले व्हा. काही वाईटपणा असेल तर तो सोडा. यासाठी नामसाधन, वाचन, सेवा असे त्या माणसाची कुवत व आवड पाहुन सांगतात.
वर म्हटल्याप्रमाणे गुरु अधीकारी , श्रध्येय असतील तर लोकांचा त्यावर विश्वास बसतो. ते तसे वागू शकतात.
मला वाटायचे हे सगळे प्रकार आत्मसंमोहनाचे आहेत. असे असे कर , असे असे समज. त्यामुळे त्यांत खरेपणा नाहीच.
एक विचार असा आला की कोणत्याही माणसाला एखादी गोष्ट , सतत केली की तीची सवय लागू शकते. हे मोबाइल चॕटिंग, सर्फींग, गेमस अशा साध्या उदाहरणावरुन स्पष्ट होईल.
मग जर नकोशा गोष्टी सतत केल्याने त्यांची सवय लागत असेल तर चांगल्या पण आवडीच्या गोष्टी करायला सांगितल्या , केल्या तर त्यांचीही सवय लागेल, तोच स्वभाव होईल, तसेच चांगले व्यक्तीमत्व तयार होईल त्यासाठी मदत करणे हेच गुरोपदेशामागचे शास्त्र असावे असे मला वाटते.
या साध्या प्रकाराला उच्च अनुभूती, डायरेक्ट देवदर्शन वगैरेत नेऊन ठेवल्यामुळे ते आपल्याला जमणारे नाही असे किंवा स्थलदर्शनासारखे मानले जाईल.
ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या अनेक संतांच्या चरित्रांवरुन ते किती साधे होते, सरळ होते, लोकांना भेटत होते, उपदेश करत होते असे दिसते.
आता असे संतांचे लाईव्ह दर्शन अवघड , अप्राप्य झाले आहे. सबब ग्रंथ हेच गुरु मानावेत असे वाटते.
गुरोपदेशाचा अर्थ असा सरळ, साधा , माणसाला चांगला होण्यासाठी, वाईटपणा टाकण्यासाठी चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी, सोपे मार्ग सांगणे असा जमिनीवर आणला तर अधीक उपयोगी ठरेल असे वाटते.
उपदेश घेऊन देवदर्शन घेण्याची आपल्यासारख्याची पुण्याई असेल असे वाटत नाही. शेवटी शक्य त्याला शक्य तेव्हढी मदत करणे हा माझा धर्म. वेळेला मदत करतो तोच देव. नाही का? शुभं भवतु.

Comments