ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ लेखांक --६

 मागील लेखात सेवेतील त्रुटीबाबत अपवादांचा विचार करता (१)जी सेवा मोफत दिली ती व (२)करारानुसार व्यक्तीला दिली जाते ती. असे लिहीले आहे .

या दुसऱ्या अपवादाबाबत स्पष्टीकरण हवे असे मत पडले. कारण सर्व सेवा करारानुसारच दिल्या जातात. भले तो करार लेखी असो वा तोंडी . मग सगळ्या सेवाच अपवाद आहे का?
तर नाही. या वाक्यात वैयक्तिक सेवा ज्या कराराने दिल्या जातात त्या हा अपवाद आहे. वैयक्तिक हा शब्द अनावधानाने राहून गेला. गैरसमज नसावा.
आता कराराने दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक सेवा म्हणजे कोणत्या? ते पहावे लागेल. त्याबाबत उदाहरणे या कायद्यात लिहीलेली नाहीत. परंतु कराराचा कायदा, विमा कायदा यांत अशी उदाहरणे मिळतील.
थोडक्यात सांगायचे तर हे नाते थोडेसे मालक नोकराचे असेल. मला डबा आणून देणारा व्यक्ती , माझ्यासाठी चित्र तयार करणारा व्यक्ती वगैरे. हे नाते कामगार कायद्यातही मोडत नाही. त्यासाठी दिवाणी न्यायालय असतेच. ग्राहक संरक्षणात ते येत नाही. म्हणून तो अपवाद. अशी अनेक उदाहरणे आपल्यालाही सापडतील.
आता पुढे जाऊ. ग्राहक कोण असतो, सेवा म्हणजे काय हे पाहिल्यानंतर वस्तूंतील दोष म्हणजे काय? सेवांतील त्रुटी म्हणजे काय? अनुचीत व्यापार प्रथा म्हणजे काय? हे पाहू. कारण असे काही झाले तरच ग्राहकाला तक्रार करता येईल.
वस्तूतील दोष पुढीलप्रकारचे असू शकतील.ते म्हणजे वस्तूचा गुण, मोजदाद, कार्यक्षमता ,शुद्धता, दर्जा एखाद्या कायद्याने ठरवला असेल किंवा व्यक्तींमधील वा अलिखित कराराने ठरला असेल व त्यात,
१)बिघाड.
२)अपूर्णता.
३)कमीपणा असणे.
यांची असंख्य उदाहरणे देता येतील. तुरीची डाळ शिजणारी हवी. कितीही शिट्ट्या घेता किंवा न घेता ती शिजत नसेल तर तो तीच्या गुणात बिघाड ठरेल. हे कायद्याने ठरलेले नाही परंतु अलिखित करारानुसार डाळ शिजणारीच लागते.
पॕकेटवर लिहीले २५० ग्रॕम , आत वस्तू २००ग्रॕम निघते. हा वस्तूच्या मोजदादीत कमीपणा आहे. वस्तू पॕकेटवर लिहीलेल्या वजनाची आत हवी असा कायदा आहे.
असाच प्रकार सेवांच्या बाबतीत असतो.
एखाद्या कायद्यात नमुद असता, किंवा लेखी वा अलिखित कराराने निश्चित केले असता,
सेवा देण्याच्या, दर्जा, पद्धत,व अवलंबामध्ये,
१)बिघाड.
२)अपुर्णता.
३)त्रुटी किंवा
४)असमाधानकारकता,
असणे याला सदोष सेवा म्हटले जाते.
याचीही उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर यायला लागली असतील.
बसचे तिकीट काढले. रात्रीला दहाला बस सुटायची. सकाळी गावी सकाळी सातला पोहचावयाची. तेथे मला दहा वाजता दुसरी बस मिळणार.
पहिली बस आलीच बारा वाजता. सुटली साडेबारा वाजता. पोचली दहा वाजता. माझी दुसरी बस चुकली. नुकसान झाले.
येथे लेखी कराराने ठरले असता सेवेच्या अवलंबामध्ये अपूर्णता झाली. सदोष सेवा दिली गेली.
कायद्याने एखाद्या कामाचा निपटारा अर्ज दिल्यापासुन तीस दिवसांत व्हायला हवा असेल, तो कधीच झाला नाही . ही सेवा देण्याच्या पद्धतीत अपूर्णता होईल.
ग्राहकाला सेवेतील निष्काळजीपणामुळे किंवा काही केल्याने वा न केल्याने तोटा किंवा शारीरिक ,मानसिक नुकसान झाले तर ती सेवासुद्धा सदोष सेवा समजली जाते.
बसमधुन बंदी असलेल्या वस्तू नेल्या गेल्या. पोलीसांनी बस तपासणी केली. वेळ गेला. नुकसान झाले. काही आर्थिक नुकसान झाले नसले तरी मानसिक त्रास झाला तरी ,ती सदोष सेवाच ठरेल.
ग्राहकापासुन जाणूनबुजून माहिती लपवणे ही सुद्धा सेवेत त्रुटी ठरते.
अनुचित व्यापार प्रथा. कायद्यामध्ये अनुचित व्यापार प्रथेची व्याख्या लांबलचक दिली आहे. ती जिज्ञासुंनी आवश्यक तर पहावी.
थोडक्यात म्हणावयाचे तर अनुचित व्यापार प्रथा म्हणजे वस्तूंच्या दर्जा , गुण, मोजणी, नवीनपणा,किंमत, विक्रेत्याचा अधीकार, वस्तूचे आयुर्मान, तीची दुरुस्ती, ती बदलून देणे यांबाबत असत्य आश्वासने देणे.
यांचे उदाहरण वस्तूला एक वर्ष काहीही होणार नाही सांगितले असता चार दिवसात तीचा आपोआप तुकडा पडणे वगैरे.
अशा प्रकारच्या सदोष वस्तूंबाबत, सेवेबाबत किंवा अनुचित व्यापार प्रथेबाबत ग्राहक तक्रार करु शकतील.
अशा आणखी काही बाबी आहेत. त्या पुढे ..

Comments