माणसातला माणूस............................

 भवानराव आणि सुभानराव अगदी जीगरी दोस्त. तसे दोघेही सरकारी खात्यात वेगळेवेगळ्या मजल्यांवर काम करायचे. जाणे येणे सगळे बरोबर. एकाच काॕलनीत रहायचे.

भवानराव सातारा जिल्ह्यातले तर सुभानराव कोल्हापूरचे. ते सुद्धा त्यांच्या जवळ येण्याचे कारण होतेच. भवानरावांना एकच मुलगा रावसाहेब. तो इंजीनिअरच्या दुसऱ्या वर्षाला होता. सुभानरावाना मुलबाळच नव्हते. त्यांच्या गावचेच कोणी नातेवाईक त्यांना भेटायला येत जात असत.
एरव्ही भवानराव व सुभानराव यांचे काम वेगळे असले तरी स्वभाव अगदी सारखे. आपण बरे आपले काम बरे. आपले काम करताकरता चार जणांना मदत होत असेल तर ते ती सहज न बोलता करत.
त्यामूळे तसे नोकरीत मिसफीटच होते. पण आता दोघांच्याही नोक-या संपत आल्या होत्या. खात्यातले लोक त्यांच्या निवृत्यांकडे डोळे लावून बसले होते. नाही म्हटले तरी सध्याच्या जगात चांगुलपणाचा लोकांना त्रास होतोच ना.
पाच पन्नास किंवा सहा वीसच्या लोकलने ते परत यायचे. चहा पाणी, टि.व्ही. बातम्या झाल्या भवानराव सुभानरावांकडे किंवा कधी ऊलट असे जायचे. जेवणे झालेली असायची. फिरायला गप्पा मारायला म्हणून ते बाहेर पडायचे. सोसायटीच्या एका कडेच्या बिल्डिंगच्या बाहेर कट्यावर ते बसायचे.
लोकलमधले मित्र, खात्यातले काम, ईतर व्यवहार यांच्या गप्पा सुरु व्हायच्या. ते दोघेही ईतर स्टाफच्या इतर ऊद्योगात नसले तरी सर्व व्यवहारांची त्याना खडान खडा माहिती असे.
तसले काही त्यांना आवडत नसे पटतही नसे. परंतु तेथे कोणाला काही म्हणायची त्यांची शामत नव्हती. मग करायचे काय. सिग्रेटी ओढता ओढता त्यांना जणू रोज नवा हुरुप चढत असे.
भवानराव सांगायचे " आज माझ्या समोर त्या अमक्याने असा असा व्यवहार केला. अगदी जिभेवर आलेले त्याला सांगाव , अरे असे करु नका. " कुठले काय . गप्प बसलो.
सुभानवर आणखी कोणी कशा जागा घेतल्या असे सांगायचे. " असले व्यवहार करणाऱ्यांना चौकात फोडून काढले पाहिजे असे दोघांचे प्रांजळ मत असे.
कधी सुभानरावांच्या रावसाहेबाच्या शिक्षणाविषयी चर्चा होई. तर कधी निवृत्तीनंतर काय याची चर्चा होत असे. त्यात त्यांना फारसा रस वाटत नसे.
आॕफीसच्या कामातील शांततेपेक्षा वेगळ्या विषयांबद्दल ते जोराजोरात तासंतास बोलत रहात. अनोळखी लोकांना यांची भांडणेच चालली आहेत का असे वाटे. ओळखीच्यांना मात्र त्याची सवय झाली होती.
एकदा हे दोघे गप्पा मारत असता दोन तरुण सिग्रेटी ओढत आले."काका आम्ही जरा इकडे बसू का? " त्यांच्यातल्या एका चष्मा घातलेल्याने विचारले. सुभानराव म्हणाले. " बसा की राव. कट्टा काय आम्ही बांधला नाहीये. "
त्या दोघांनी त्यांच्या ओळखी करुन दिल्या. ते होते सुदीप आणि प्रकाश. ते दोघे एका सिक्युरीटी सर्वीसमध्ये सुपरवायझर होते. ते सध्याच ऊपनगरात रहायला आले होते. दोघे एकाच रुममध्ये रहात रहात असत. भवानराव सुभानरावांच्या गप्पा हळूहळू त्यांनाही आवडू लागल्या.
ते सुद्धा सवड मिळेल तेंव्हा भवानराव सुभानराव यांच्याबरोबर कट्यावर बसू लागले. त्यांच्या आॕफीसच्या गंमती ते सांगत असत. दोघांचीही लग्ने झाली नव्हती. त्यामुळे त्यांनाही घरी जाण्याची घाई नसे.
भवानराव ,सुभानरावांच्या गप्पांचा सूर सगळे कसे बदलत चालले आहे. कोणीतरी क्रांती केली पाहिजे असा असे. सुदीप म्हणायचा "काका आता तुम्ही आला रिटायमेंटला. कशाला असल्या गप्पा. गप्प मजेत रहा चार दिवस. "
भवानराव चटकन म्हणाले " अरे तुम्ही तरुणांनी पेटून ऊठायला पाहिजे. तर तुम्ही मजा मारायच्या गोष्टी करता? . जाऊदे. तुमचेही काही चूक नाही. आदर्शच नाहीत ना तुमच्यापुढे?" प्रकाश आणखी काही विषय काढून त्यांना शांत करत असे.
पावसाळा संपत आलेला. भवानराव ,सुभानराव कट्यावर येऊन बसले. एकामागून एक विषय निघत गेले. साडेबारा पाऊण वाजल्यावर आता जाऊ म्हणतात , तोवर मागच्याच बाजूने प्रचंड मोठा आवाज झाला. काही समजायच्या आत पडण्याचे, माणसांच्या आरड्या ओरड्याचे आवाज येऊ लागले.
भवानराव सुभानरावांना मागची इमारत जुनी झाली आहे. कधीतरी पडणार आहे हे माहितच होते. बांधकाम खात्याने सर्वांना इमारत खाली करायला सांगितले होते. नोटीसा दिल्या होत्या. काहीजण गेले होते. तरी प्रत्येक मजल्यावर काही खोल्यात लोक रहातच होते.
इमारतीची डावी बाजू पडू लागली होती. वरचा मजला कोसळला होता. तेथे कोणी रहात नव्हते. पण अलिकडच्या दोन तीन खोल्यात लोक होते. मधला भाग हलू लागला होता.
भवानराव , सुभानरावांच्या अंगात बारा बैलांचे बळ संचारले. भवानराव म्हणाले "चल सुभान्या, पळ. सगळ्या लोकांना बाहेर काढू. "
ते पळत तिस-या मजल्यावर गेले. लाईट गेले होते. सगळीकडे अंधार झाला होता. सारखे पडापडीचे आवाज येत होते.काय झाले, काय करावे हेच कोणाला सुचत नव्हते. भवानराव प्रथम एखाद्या सेनापतीसारखे सगळ्यात डावीकडच्या अगदी पडायला लागणा-या खोलीत गेले. त्यांनी जोरात दार वाजवले. दार उघडले एका मुलीसारख्या बाईने. तीच्याकडे तीचे लहान बाळ होते. भवानरावांनी बाळाला घेतले व तीला पटकन खाली जायला सांगितले . ती पोचताच रडत म्हणाली," वर घरात काॕटवर आजोबा आहेत. "
भवानराव झटकन पळतच परत वर गेले. आजोबा काॕटवर कण्हत पडले होते. त्यांना उठताही येत नव्हते. भवानरावांनी क्षणाचाही विचार न करता आजोबांना पाठीवर घेतले व हळूहळू खाली आणले. एका सुरक्षीत घरात सांगून त्यांना झोपवले. त्यांची सुन तिकडे थांबली.
सुभानरावांनी सुद्धा प्रत्येक घरात पाहून सामान राहू दे सांगून माणसांना अक्षरशः ओढत बाहेर काढले. इमारतीतील काही तरुणांना भवानराव सुभानरावांचे प्रयत्न समजले. तेही मदतीला आले.
सगळ्यांनी मीळुन एकूण दिड दोनशे माणसांना इमारतीबाहेर काढले. आता धोकादायक भागात कोणीही नाही याची खात्री झाली.
पुढे काय करायचे. येव्हढ्या लोकांची सोय कोठे करायची ? हा प्रश्न उभा राहिला . तेथेही भवानराव सुभानराव पुढे झाले. त्यांनी काॕलनीतील मोठ्या समाजमंदिराची इमारत उघडायला लावली. सर्व लोकांना तेथे हलवले. त्यांची प्राथमिक सोय लावून दिली.
आता पोलिसांना कळवावे की कसे . यावर भवानरावांनी फायर फायटरला बोलवायला सांगितले . त्यांना फोन गेल्यावर पंधरा वीस मिनीटांत त्यांच्या गाड्या आल्या. त्यांनी इमारतीत कोणी आहे का चौकशी केली. भवानराव सुभानरावांच्या पराक्रमामुळे सगळी इमारत खाली झाली म्हटल्यावर त्यांचे काम लवकर सुरु झाले.
त्यांनी इमारतीच्या पडलेल्या भागातील कचरा हलवला.हलणारा भाग पाडून टाकला. दोन तीन तासाने महानगरपालीकेचे लोक आले.
सगळे स्थीरस्थावर झाल्यावर भवानराव सुभानराव चार वाजता घरी गेले. सगळे सांगितल्यावर रावसाहेब भवानरावांच्या गळ्यात पडला. " बाबा आय अॕम प्राऊड आॕफ यू. केव्हढे मोठे काम केलेत तुम्ही. " " अरे आम्ही नुसत्या गप्पा मारणारे नव्हेत. प्रसंगाने बळ येते." म्हणून ते झोपी गेले.
बातमी मिडीयापर्येंत गेलीच होती. सकाळपासून दोघांच्या घराबाहेर सगळे लोक, पत्रकार, गाड्या यांनी गर्दी केली. सगळ्यांना तेच तेच सांगून दोघे अगदी वैतागून गेले. दोन चार दिवस ते आॕफीसला जाऊच शकले नाहीत.
इमारतीतील लोकांची व्यवस्था करायला आता खूप लोक पूढे आले. महानगरपालिकेने सर्वांना जवळच्या एका ब-या इमारतीत रहायला तात्पुरती घरे दिली.
भवानराव सुभानराव सर्व चॕनलवर पेपरमध्ये झळकले. त्यांनी केले ते माणूसकीच्या कळवळ्याने. आॕफीसात त्यांचे सत्कार झाले. त्यांना खास बाब म्हणून एक एक जादा वेतनवाढ द्यायचे ठरले.
सुदीप आणि प्रकाश बरोबर त्याच दिवशी कट्यावर आले नव्हते. त्यांनी भवानराव सुभानरावांना बुके, शाल , नारळ देऊन सत्कार केला. सर्व कुटुंबीयांना जेवण दिले.
दोघे म्हणाले, " भवानकाका, सुभानकाका हेच आजचे खरे हिरो आहेत. आम्हाला हे म्हणायचे, तुमच्यापुढे आदर्श नाहीत. तुम्हीच आमचे आदर्श. साध्या माणसांत दडलेली देवमाणसे. "

Comments