पूजारी....................................
माझ्या क्रिकेटचे ज्ञान शून्याबरोबर आहे. तसे ब-याच बाबीं बाबतही आहे ते सोडा. अनुभवाने, वाचनाने आपल्याला आपल्या क्षेत्रातल्या ब-याच गोष्टी माहिती होतात आणि आपल्याला वाटते अरे मला यायला लागले की.
मुलांबरोबर गल्लीत व गच्चीत मी भरपूर क्रिकेट खेळलो. पण तेव्हढेच. बॕटींग, बाॕलींग या प्राथमिक गोष्टी कोणालाही कळतात तशा मलाही कळतात. पण ती काॕमेंट्री, ते तासंतास त्यात बुडून जाणे त्यातला थरार वगैरे मला कळालाही नाही व आवडलाही नाही.
त्या वेळी आम्ही बांद्र्याला गव्हर्मेंट काॕलनीत रहायचो. जवळच एम. आय.जी.चे सुंदर ग्राऊंड होते. तेथे आम्ही कधीतरी फिरायला जायचो. ते सचीनचे लहानपणापासुनचे ग्राऊंड होते म्हणे. तो कधीकधी तेथे येत असे. "ए सचीन आलाय एम.आय.जी.ला. चल बघायला." म्हणत मुले त्याला बघायला जात. ग्राऊंडच्या बाहेरुन त्याला बघत . सावकाश घरी येत.
फेब्रुवारी, का मार्च महिन्यातला नेहमीसारखा दिवस. सकाळी नेहमीसारखा तयार झालो. बरोबरचे साहेब आज यायचे नव्हते. नऊ वाजले. सावंत ड्रायव्हर आले. त्यांनी गाडी धुवून, पुसून घेतली. सिक्युरिटीचे जाधव आले.
फाईलचा बस्ता गाडीत ठेवला. सावंत बसले. जाधव पुढे बसले. मी माझ्या नेहमीच्या म्हणजे ऊजव्या बाजूला बसलो. गाडी सुरु झाली.
काॕलनीतुन बाहेर पडलो. एम. आय. जी. ग्राऊंडजवळ बरीच गर्दी होती. ट्रॕफिक थोडा स्लो होता. एम. आय. जी.च्या दारात जाताच पाच सात जण एकदम गाडीपुढे आडवा हात करुन ऊभे राहिले. "सर, सर, एक मिनीट."
"अरे काय झाले बघा जरा." मी सावंत व जाधवना म्हणालो. " एरव्ही आमची गाडी थांबवण्याचे धाडस कोणीच करत नाही. ते सगळे जण पांढऱ्या शर्ट , पँटीत होते. छान हसत होते.
गाडी थांबली. त्यातील एकजण म्हणाला,"सर यांची गाडी जरा बंद पडली आहे. यांना अर्जंट वानखेडेला पोचायला पाहिजे. जरा तुम्ही हेल्प केलीत तर " "बस्स. येव्हढेच. चला, चला."जाधवांनी दार ऊघडले. त्यांना आत बसण्यास सांगितले . त्यांची मोठी कसली बॕग डिक्कीत ठेवली. हातात एक बॕग दिली. मी म्हणालो. तो तरुण गाडीत बसला. सगळ्यांना हात हलवून निरोप दिले.
आत बसल्याबसल्या त्याने "सर यह परदा बंद करे क्या?" म्हटले व पडदा ओढून घेतला. कोणीतरी हौसेने ते पडदे लावले होते. पांढरे झालरीसारखे पडदे. त्यातुन दिसणे बंद होतच नसे. एरव्हीही आमच्या गाडीकडे तसे कोणी बघत नसे ते वेगळे.
"सर, ए.सी. नहीं क्या कारमें?" आता काय सांगावे याला. "अरे कसला ए.सी. ? फॕन आहे प्लॕस्टीकचा म्हणून ." सावंतांनी लगेच फॕन लावला. जरा बरे वाटायला लागले असावे त्याला.
सावंत आणि जाधव तो आत आल्यापासून भलतेच खूष दिसत होते. सारखे मागे वळून बघत होते. तो तरुण भलताच बोलका होता. "सर, थंडा लेंगे क्या?" यहाँ कैसा मिलेंगा थंडा?," मी म्हणतो तोच त्याने छोटी बॕग उघडली. चार छोट्या कोल्ड्रींकच्या बाटल्या काढल्या. आम्हाला एक एक बाटली दिली. एक स्वतः पिऊ लागला.
सावंत आणि जाधव सारखे पुजारी, पुजारी का काय असे म्हणत होते. ते मला काहीच कळत नव्हते. त्यांनी हळूच सेल्फीसुद्धा काढल्या. तो छान पोझबीझ देत होता.
"मेरे एक दूरके रिश्तेदार आप जैसे साहब थे! बचपनमें हम लोक ऊनके आॕफीसमें जाते थे!" असा संवाद त्याने चालू केला. त्याच्या क्रिकेटमधले मला ओ का ठो समजत नव्हते. बोलायचे काय त्याच्याशी. बर एकदम अनोळखी प्राण्याला तुझे नाव काय विचारणे गैर दिसले असते म्हणून मी गप्पच होतो.
मग त्याने त्याच्या जवळच्यांच्या कामाबद्दल माहिती विचारली. त्याच्याकडून प्रकरण विचारुन घेऊन त्याला काही सांगण्यात बराच वेळ गेला.
गाडी नेहमीप्रमाणे माटूंगा, दादर प्रभादेवीकडून पुढे चालली. महालक्ष्मीजवळ येताच चॕनलवाल्यांच्या एक दोन ओ.बी. व्हॕन आमच्या गाडीमागून येताना दिसू लागल्या.
अशा व्हॕन मुंबईत कधीमधी दिसत असतात. आज काही महत्वाचे काम वगैरे आमच्या आॕफीसात नव्हते. बरे कोणा सेलेब्रीटीचे काम वगैरे असल्याचेही माहिती नव्हते.
नेहमीप्रमाणे व्ही.आय. पी. रोडने जरा लवकर जात गाडी वानखेडेच्या बाहेरच्या गेटजवळ पोचली. त्याने सावंताना गाडी जरा आत घ्यायला सांगितले .
गाडी आत जाताच तो ऊतरला. सावंत आणि जाधवांनी तत्परतेने डिक्की उघडून दिली. बॕग दिली. लगेच आतून चार जण आले. तो "थॕक्यु सर. प्लीज्ड टू मीट यू." म्हणत गेलासुद्धा.
माझे क्रिकेटप्रेम जगजाहीर
असल्यामुळे सावंत, जाधव गप्प राहिले. आम्ही आॕफीसात गेलो. पावणेअकरा वाजत आलेच होते.
पहिली कामे संपवली. नेहमीप्रमाणे संध्याकाळपर्येंत कामे मिटींग्ज चालल्या. मी घरी आलो. आवरुन वगैरे सात वाजता बातम्या लावल्या.
"वानखेडे स्टेडियम आज सुरु होणाऱ्या मॕचच्या आधी एक मजेशीर घटना घडली."
वृत्तनिवेदीका वेगळ्याच मुडमध्ये दिसत होती. "खेळाडू आपल्या निवासव्यवस्थेकडून वेळेवर येतात. पुजारा मात्र वेळेत पोहचू शकत नव्हता. बांद्र्याला तो एका इंटर काॕलेजिएट मॕचचे उदघाटन करण्यास गेला होता. कार्यक्रम झाला. इकडे येणार तर त्याची गाडी बंद पडलेली. "
"काय होणार एकदम. इकडे तर पोचायचे. पुढे काय झाले. बघा आमच्या कॕमेरामनने सगळे टिपलेय."
आश्चर्य म्हणजे एकदम आमच्या आॕफीसचीच गाडी दिसू लागली. मुलांनी ती पटकन ओळखली. "अरे, बघ बाबांची गाडी. " कॕमेरा आमच्या गाडीमागून येत होता. एकदम वानखेडेलाच थांबला. " बघा पुजाराने चटकन निर्णय घेऊन एका साहेबांच्या गाडीतून लिफ्ट मिळवली आणि तो वेळेवर पोचला.
मुले नाचायलाच लागली. " बाबा तुम्ही पुजाराला लिफ्ट दिलीत. माहिती आहे का तो केव्हढा मोठा प्लेअर आहे?" असे का? बर, बर , म्हणत मी विषय बदलणार होतो. पण मुलांनी पुजारा गाडीत बसल्यापासून उतरेपर्येंत काय काय झाले परत परत सांगायला लावले.
दुसरे दिवशी बातमी सगळीकडे पसरली.काॕलनीत, आॕफीसात मी जणू मोठ्ठा पराक्रम केल्यासारखे सगळे माझ्याकडे पाहू लागले.
सावंत , जाधव आले. म्हणाले "काय सर, आम्ही कित्ती खूणा करत होतो. पुजारा , पुजारा म्हणून . त्यालासुद्धा समजले. " हां , हां, ते होय. मला वाटले कसला पुजारी. मंदिराची काही भानगड आहे का काय?"
अहो त्याने , तुम्हाला कार्ड दिलेय.मुलांच्या आग्रहाखातर मी एकदा मॕच पाहून आलो. तो काही परत भेटला नाही.
मुलांनी सगळ्या क्रिकेट टिमचा एक फोटो मुद्दाम गाडीत लावला. परत कोणी दिसला तर ओळखायला. पुन्हा काही तो योग आला नाही. खेळकर , बोलका पुजारा मात्र न विसरण्यासारखी आठवण ठेऊन गेला.
( काल्पनिक )
Comments
Post a Comment