सर.............................

 "यथा शिखा मयुराणाम, नागानां मणयो तथा!

तद् वद वेदांग शास्राणाम, गणीतं मुर्धनी स्थितम!
म्हणजे ज्याप्रमाणे मोराचा पिसारा, नागाचा मणी डोक्यावर असतो, त्या प्रमाणे वेदांग शास्त्रा़ंत गणीत शिरोभागी शोभते.
यासारखी गणीताची थोरवी सांगणारी अनेक वचने त्यांच्या क्लासच्या भिंतीवर लिहीलेली होती. ते होते अत्यंत विद्यार्थीप्रिय , तळमळीने विद्यार्थ्यांच्यापिढ्यान पिढ्यांना गणित शिकवणारे "श्रीधर जोगळेकर " म्हणजेच जोगळेकर सर.
आमचे घर सरांच्या क्लाससमोरच असल्याने आमची सकाळ हं, बोला, "अ अधीक ब कंसाचा वर्ग बरोबर अ वर्ग अधीक दोन अब अधीक ब वर्ग " असे नियम ऐकतच होत असे.
सकाळी सहाला पहिली बॕच सुरु होई. ती बहुधा अकरावीची असे. सर्व शाळांतील मुलांना ती सोयीची असे. प्रत्येक बॕचला कमीतकमी चाळीस पन्नास मुले मुली असत.
जुन्या क्लासमध्ये पुर्वेकडे तोंड करुन स्टँडवर फळा ठेवलेला असे. मुली डावीकडे, मुले ऊजवीकडे, सरांसमोर सतरंज्यांवर बसलेली असत. सर भराभर खडूने लिहीत आहेत, तोंडाने ते वाचताहेत, मुलांकडून म्हणून घेत आहेत असे दृश्य असे.मुद्दा जोरात समजावून सांगताना हाताचा तळवा फळ्यावर आपटायचे. हं पुढे बोला म्हणायचे. कंपासने काढल्यासारखे सुंदर वर्तुळ हाताने काढायचे.
कालांतराने बागलकोटे वाड्यातील माडीची दुरुस्ती करुन जिना आतून होता तो बाहेरून केला. फळ्याची दिशा बदलली. तो पश्चिमाभिमुखी झाला येव्हढाच बदल.
अखंड लिखाण सुरु असल्यामुळे खडूंचे बाॕक्सच्या बाॕक्स संपत असत. सरांना डस्टर चालत , आवडत व पुरत नसेल. ते फडक्याने फळा पूसायचे आणी फडके खुंटीवर फेकायचे. खडूंचे छोटे तुकडे गच्चीत फेकायचे.
सकाळी सहाला सुरु झालेले क्लास दुपारी बारा एक पर्येंत चालत. मधून एक दोन वेळा चहा, काॕफी घेत. दुपारी जेवण झाल्यावर एखादा तास झोप घेत. " दुपारचे जाग्रण मला सहन होत नाही. " म्हणायचे. संध्याकाळी चारपासून रात्री नऊ ,दहा पर्येंत त्यांचा शिक्षण यज्ञ अखंड सुरु असे.
येव्हढे सतत बोलून यांचे तोंड दुखत कसे नाही असे लोकांना वाटत असे. फीच्या नोंदी रजीस्टरमध्ये करण्यापुरते सर खुर्चीवर बसत. एरव्ही अखंड ऊभे असत.
मध्यम ऊंची, साधे पण स्वच्छ परीट घडीचे शर्ट, पँट, बारिक मिशी, दोन्ही बाजुंनी विरळ होत गेलेले केस, सतत सुहास्यवदन असणारे सर मिश्किल विनोदी तरीही प्रसंगी अत्यंत कडक होऊ शकत असत. क्लासमध्ये सर आहेत म्हटल्यावर टवाळांची गल्लीत येण्याची शामत नसे. प्रसंगी मुलींची छेड काढणा-यांना कानफाटीत ठेऊन देत असत.
विद्यार्थी परिषदेचे संस्कार त्याच्यात ऊठुन दिसत असत. एरव्ही राजकारणाबद्दल सर बोलत नसत. सामाजिक आपत्तीच्या वेळेस सर्वात पुढे असत. कोयनेला भुकंप झाल्यानंतर अन्न कपडे ट्रकमधून नेणा-या तुकडीत सर पुढे होते. अंधश्रद्धा निर्मुलनाबद्दल न बोलता ,ग्रहणात मुद्दाम जेवायला बसायचे.
सर आणी काकू दोघेच भिडे वाड्यातल्या खोलीत रहायचे. घरात मोठ्या गोदरेजच्या कपाटात व सर्वत्र गणिताची पुस्तके भरलेली असत. दुपारच्या वेळी सर गणितच वाचत बसत.
डिप्लोमाचा पेपर टन आणी टनी या शब्दांच्या फरकामुळे टाकून आलो असे सर सांगत. मग गणित घेऊन सर बी.ए. झाले. थोडे दिवस शाळेत शिकवल्यानंतर सरांनी क्लास सुरु केले. ते धो धो चालू लागले. शिकवण्याचे शिक्षण घेण्यासाठी ते त्यांचे बंधू भास्करराव जोगळेकर यांच्या क्लासमध्ये जाऊन बसत.
आठवी असो किंवा ईंजिनिअरींगरींग वा बी.एस्सी. एम. एस्सी. तेव्हढ्याच तन्मयतेने शिकवायचे. प्रथम थिअरी, फाॕर्म्युले, नंतर सर्व प्रकारची गणिते करुन दाखवायचे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास आपोआप वाढत असे. गणिताची भिती केंव्हाच पळून जात असे.
डेरिव्हेटिव्ह, मेट्रायसेस, इंटीग्रेशन, लिमीटेशन , सगळे करुन घ्यायचे.साॕलिड जाॕमेट्री मला जरा छान येत नाही असे सहज म्हणायचे. काॕलेजात जे शिकवायला दोन ,तीन प्रोफेसर असायचे ते सगळे ,सर एकटे करुन घ्यायचे. त्यामुळे शाळा काॕलेजच्यात शिकवावयाच्या आधीच आमचे सगळे तयार असायचे. मग त्या सरना शंका विचारत बसायचे.
सरांच्या क्लासला जायचे हा एक प्रेस्टीज इश्यु होता. आठवीपासुन एस. वाय. पर्येंत आठ वर्षे सरांकडे शिकण्याची संधी मला मिळाली. ऊत्तम अक्षर, शिकवायच्या नविन युक्त्या यांमुळे क्लासमध्ये हास्याच्या उकळ्या अधूनमधून फुटत असत.
"कोणी पडले की मला हसू अनावर होते. " म्हणायचे. एका मुलीला "आमच्या गावाकडच्या म्हणून फायदा घेऊ नका म्हणायचे. " कोणा मुलीने कुंकू लावले नाही तर दात्यांच्यात जाऊन या म्हणायचे.
"खालचे इंटू वरच्याच, मायनस वरचे इंटू खालच्याच प्लस वरच्याच इंटू खालच्याच अपाॕन खालच्याचा वर्ग" अशा काहीशा पद्धतीने डेरिव्हेटिव्हचे नियम शिकवायचे. मग ते चांगले लक्षात रहायचे. इंटिग्रेशन अवघड आहे. थोड्या वेळेत जमल तर बघा नाहीतर सोडून द्या सांगायचे.
रात्री नऊ ते दहाची बॕच सर्वात सिनीअर म्हणजे बी.एस्सी.किंवा डिप्लोमाच्या मुलांची असायची. मुलांना झोपा येईपर्येंत क्लास चालायचे. आता एक छान गणित करुया, मग एक सुंदर गणित घेऊन थांबू म्हणायचे.
भरपूर तयारीकरुन घेत. सर्व विद्यापीठांच्या पेपरमधील गणिते सोडवून घ्यायचे. मग मुलांना ढीगाने मार्क पडायचे. मुले इच्छेप्रमाणे ईंजिनिअरींगला जाऊ शकत.
तसे तगडे असल्यामुळे सरांना लेंगा, नेहरु शर्ट, धोतर, सुट, बूट सर्व पोषाख खुलून दिसत. सरांचा आवाजही तितकाच छान होता. निरोप समारंभाला "मधुबनमें राधीका नाचे रे. " म्हणत.
सरांचे लग्न ठरले. सर्व गाव लग्नाला लोटला होता. सरांना मुलगी झाली. तीचे नाव रमा ठेवले. दृष्ट लागल्यासारखे अपँडिक्स फुटल्याचे निमीत्त होऊन सर गेले. विद्यार्थीच काय ते गणितही पोरके झाले.
वक्तशीरपणा, स्वच्छ आणी स्पष्ट विचार, चुकीला चूक हे तोंडावर सांगायची वृत्ती , अभिमान, अभ्यासूपणा सगळे शिकवून सर गेले. बस्स, जगायला आणखी काय लागतय , नाही का?

Comments

  1. खूप छान लिखाण. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. सगळे चित्र डोळ्यासमोर आले.तेंव्हा आम्ही भिडे वाड्यात रहात असल्यामुळे सर जवळचे होते.

    ReplyDelete

Post a Comment