बुंदी वडी...............................
हा पदार्थ आहे? किंवा हा काय पदार्थ आहे? असे आपल्याला निश्चित वाटेल. पण तसे नाही. आजच या पदार्थाचा शोध लागला .(का लावला?)
कसा? तर आपापल्या जबाबदारीवर शक्यतो बायको घरात नसता व लगेच परत येण्याची शक्यता तो करावा. होतो कसा? तर सुंदर. करायला वेळ? अगदी थोडा.
झाले काय आॕफीसातली एक सहकारीणी म्हणाली " आमच्या मालकीण काकूंनी कार्यक्रमासाठी थोडे लाडू करायचेत. बुंदी आणून द्या सांगितले . त्यांना आणून दिली. "
माझे कान टवकारले. नवीन पदार्थ. काय .तर आवडते बुंदी लाडू. कृती विचारली. त्यांनी सहज सांगितली. बुंदी घ्यायची. त्यापेक्षाथोडी कमी साखर. थोडे पाणी घालून एकतारी पाक करायचा. त्यात बुंदी टाकायची. अर्धा पाऊण तास झाकून ठेवायचे. पाहून मऊ असतानाच वळायला घ्यायचे. हवे तर बेदाणे , वगैरे घालायचे.
"फुस्स. येव्हढे सोपे? ऊद्याच करून सँपलच खायला आणतो बघा." आणा आणा असे त्यांनी सांगितले . त्यांनी सांगितलेल्या बेकरीदादाकडे गेलो.फक्त त्यांच्याकडेच वर्षभर अशी बुंदी मिळते म्हणे.
बुंदी द्या म्हटल्यावर त्याला कळेचना." वो लाडू बनाते है ना?" "ए कळी दो इनको." एकच गिऱ्हाईक आणि दुकानात दोघे असताना त्याने दुसऱ्याला हुकूम सोडला. चांगल्या मस्त मोतीचुरासारख्या कळ्या होत्या. "कितनी चाहीये?" आता काही सणाचे दिवस नाहीत. शिवाय रीस्क नको म्हणून मी पाव किलो दो म्हटले. तर म्हणे "आधे किलेसे कम नहीं मिलती." काय करता. दे म्हटले.
उत्साहात घरी आलो. मोजून दोन वाट्याच बुंदी घेतली. जरा कमी साखर घेतली. त्याहून जरा कमी पाणी घेतले. इकडेतिकडे करता पाणी उकळायला लागले. आणखी जरा वेळाने चमच्याने उचलून पाहिला. तर पाक जाड झालेला. बारीकशी एकच तार पडत होती. "अरे व्वा जमले की आपल्याला " म्हणून स्वतःच छोटे प्रशस्तीपत्रही घेतले.
बुंदी पाकात टाकली. जरा ढवळले. घट्ट वाटत होते. चमचा थोडा कष्टाने हालत होता. गरम होते झाकून ठेवले. त्यात घालण्यासाठी बदाम , चेरी काढून ठेवली.
येव्हढ्यात फारसा न येणारा मित्र आला. उत्तम पदार्थ होता फार साक्षीदार नसतात. पण इकडेतिकडे काही व्हायचे तर साक्षीदार हजरच असतात. "काय वहिनी नाहीत म्हणून बदाम , किसमीस खुराक चाललाय वाटत?" "अरे खुराक कुठला. एक प्रयोग चाललाय." मग त्याला प्रयोग सांगावाच लागला. "छान. छान. बरे झाले. मला पण बघायला मिळेल. "
" काय बघतोस बाबा. बघ. " म्हणून झाकण उघडतो तो काय? अर्ध्या पाऊण तासाने होणारी बुंदी मस्त फुगली होती. पण पातेल्याशी तीचे फारच प्रेम जमले होते. निघायलाच तयार नव्हती.तो म्हणाला "पाक किती तारी केलास?" जसे काही तो रोज लाडू करतो. तर म्हणाला " बीनतारी करायला पाहैजे होतास. " बर बर तसाच करु पुढच्या वेळी."
सहकारीणीला फोटो टाकला. "आता काय करु ?" विचारले. तर आता उत्तर नाही. उद्या सांगितल्यावर हसायला पहिली पुढे असेल.
चमच्याने उकरुन थोडी निघाली. मित्र जरा खाउन " अरे फारच छान आहे. लाडवासारखीच चव आहे ." असे हसत म्हणाला. मीही पाहिली जरा. चव बरी, पण जरा पंढरपूरच्या साखरेच्या खडकु पेढ्यासारखी होती.
ते जाउदे. पहिले काम ही पातेल्यातुन बाहेर काढायला हवी. चमचा , सुरी यांना ती दाद देईना. मग टोकदार सोलाणे घेतले. आणखी काही चुरा निघाला.
जरा फिरुन आलो. आता बुंदीचे पातेल्याशी प्रेम जरा पातळ झालेसे वाटले. आणखी जरा उकरले. मग सगळेच हालल्यासारखे वाटले. आणि सटकन सगळे निघुन आले. छान वड्या पडल्या. आणि बुंदी वड्यांचा शोध लागला. मजेत कितीही दिवस ठेवून खाव्यात. अगदी मुंगी लागण्याचीही भिती नाही. त्यांचा कुठे जीव वर आलाय?
Comments
Post a Comment