आर. एम. आणि ए. व्ही. ............................................

 ही माझ्या दोन जिवलगांची आद्याक्षरे आहेत. परवा काही मित्रांबद्दल लिहील्यानंतर म्हटले की दोघांबद्दल वेगळे लिहीणे आवश्यक आहे.

ते दोन्ही आहेत कुलकर्णी , एक रविंद्र मधुकरराव आणि दुसरे अशोकराव व्यंकटराव. एक राहतात सांजा , ऊस्मानाबादला तर दुसरे बार्शीला .
सगळ्या खात्यात त्यांना आर.एम. आणि ए. व्ही. म्हणूनच ओळखले जाते. आर.एम. प्रथम भेटले सत्त्याण्णऊ साली आणि मग भेटत गेलो आम्ही एकमेकांना.
अगदी साधी राहणी. मोठ्यांदा बिनधास्त बोलणे , हसणे, आपले म्हणणे ठामपणे मांडणे हे यांचे विशेष. "माझे असे मत आहे. यात काय चूक आहे सांगा? " असे विचारताना ते अजिबात घाबरत नाहीत.
रात्री कितीही पर्येंत जागण्याची तयारी, मुद्दा समजेपर्येंत सतत वाचन चांगली स्मरणशक्ती या गुणांमुळे चारचौघात ऊठुन दिसतात.
साडेपाच फूट ऊंची, मराठवाडी, सावळा रंग, बहुतेक वेळा सफारी , हात हालवत बोलण्याची ,खूर्चीवर बसल्यावर खूर्चीसुद्धा हलवण्याची सवय, हे त्यांचे विशेष. घरची शेती आहे. तेथील सर्व कामे जाणतात. करु शकतात. स्वतःच्या गावाची परिसराची खडान खडा माहिती . कपडे , गाडी, साधी.
कोणाला माहिती नसेल तर माणूस शेतकरीच वाटायचा. पण एकदा बोलायला लागला, वेगळेवेगळे दाखले द्यायला लागला की मग त्यांच्यातली चमक लक्षात येते.
ते कोठेही रमतात. शास्त्रीय संगीत जाणतात. हार्मोनियम, बासरी चांगली वाजवतात. भजने गाणी गातात. देवा धर्मावर खूप श्रद्धा आहे. अधूनमधून वेगळेवेगळ्या पुजा, सप्ताह, करतात. एकट्याने गावक-यांच्या सहकार्याने भागवत सप्ताह गावी करतात. महाराज बोलावून , रजा काढून सर्व कार्यक्रम करतात. धोतर, टोपी घालून ,टाळ घेतात. तसेच गावातल्या लोकांना शक्यतो मदत करतात. आपल्या कार्यक्रमात मित्रांना आवर्जून बोलावतात. ड्रायव्हींगची प्रचंड आवड आहे.
त्यांचे भाऊसुद्धा असेच सुंदर , साध्या मनमीळाऊ स्वभावाचे आहेत. आईला मित्रांनी घरात येऊन, जेऊन खाऊन गेल्याशीवाय चैनच पडत नाही. एकामागून एक मोठमोठया सुंदर पुरणपोळ्या आई आग्रहाने वाढत आहेत. समोर अगदी घरच्यांची शेवटची पंगत. वडिल जुने , नवे काही सांगत आहेत. अशी आदर्श कुटुंब व्यवस्था आता पुस्तकात नाहीतर चित्रातच दिसायची. ती त्यांनी अजून जपून ठेवली आहे याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
अशा मनमोकळ्या स्वभावामुळे मुलेसुद्धा तशीच आहेत. इंजीनिअर होऊन अमेरिकेत राहणारा मोठा , शेतात बसायला , कामे करायला लाजत नाही आणि डाॕक्टर झाला तरी तसे भासवत नाही. हे संस्कार.
आर. एम. चे लव्ह मॕरेज. वहिनी सुद्धा वकिल . मग युक्तिवादाला काय तोटा. अजुनसुद्धा अधूनमधून दोघांचे बोलणे ऐकण्यासारखे असते. " येव्हढे साधे तुला कसे कळत नाही?. काल येताना बरोबर होता. चष्मा कसा विसरलीस. ? " त्या सांगताहेत " अहो चष्मा तुमच्याकडेच होता. नीट बघा. "
मग इकडेतिकडे पाहून खिशातच चष्मा सापडल्यावर त्यांची सारवासारव चालू होते, ती ऐकण्यात विशेष मजा असते. असे प्रसंग अधूनमधून घडल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसावे. एकूणच साधे , सरळ असले तरी मस्त राजासारखे राहणारे जिवनाचा सगळ्या अंगाने आस्वाद घेणारे आहेत म्हणून आर. एम. लोकप्रिय आहेतच शिवाय मनस्वीही.
अशोकराव आर.एम. च्या ऊलट . ते खणखणीत बोलून टाकणारे तर ए.व्ही. एकदम मृदुभाषी व कामापुरते बोलणारे. दोघेही अत्यंत सज्जन तरी दोघांची जात जरा वेगळी.
पावणेसहा फूट ऊंच, तरतरीत , लांब बाह्यांचे शर्ट किंवा सफारी प्रिय असणारे. सगळ्या लोकांनी कधीकाळी लोकप्रीय असणारा , काहीजणांनी बँडवाल्यांचा म्हणून हीणवलेला हा वेष. अशोकरावांकडे अशा भरपूर सफारी आहेत वा ते त्या आवडीने वापरतातही. त्यावरुनही त्यांना बरेच लोक ओळखतात.
आपले तत्व आणि स्वत्व सोडायचे नाही असा त्यांचा बाणा आहे. त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची तयारी असते.
ऊत्तम हस्ताक्षर आहे, वेगळेवेगळी शाईची पेने वापरण्याचा त्यांना एक साधा शौक आहे.देव आणि देश दोघांचे प्रेम आहे. देशाचे जास्त. पत्रलेखनाची प्रचंड आवड आहे. हक्कासाठी भांडण्याची तयारी आहे. त्यामुळे आर. एम. तोंडी भांडू शकतात तरी ए.व्ही. लेखी. कधीकधी त्यामुळे अडचणी सुद्धा येतात पण त्यांना डरतील ते अशोकराव कसले.
बी.काॕम.. झाल्यानंतर कसलेही पाठबळ नसता नागपूर विश्वविद्यालय एकाचवेळी एम.काॕम.आणि एलएल.बी.करुन देते म्हणून तेथे गेले. एकट्या हिंमतीवर सगळे शिक्षण पूर्ण केले. गांधी विचारांचा डिप्लोमा केला.
ते महाराष्ट्रभर फिरले आहेत. सगळ्या गावात यांचे मित्र सापडतात. कोणालाही निर्हेतुक मदत करण्याची त्यांना हौसच आहे. शिवाय केलेले , बोललेही आवडत नाही.
सगळे स्वच्छ , शुद्ध असल्यामुळे कामातसुद्धा सगळ्यांना प्रथमच " मी असे असे काम करणार आहे. मला महिन्यात, वर्षात इतकी . प्रकरणे संपवणे शक्य आहे ." असे सांगून, त्यापेक्षा थोडीशी जास्त , सगळ्यात जुनी प्रकरणे घेऊन संपवतात. त्यामुळे सगळेच खूष होतात.
वृत्तीप्रमाणे कृती असल्यामुळे ते कोणालाही अजिबात घाबरत नाहीत. तसाच त्यांचा मुलगा रामकृष्ण झाला आहे. लहानपणी त्याचे खेळही तसेच असत. "मेल्यानंतर काय होते? अमुक अमुक, इतके श्रीमंत कसे काय झाले ? " असे ऊत्तर देण्यास अवघड प्रश्न हे बाळ विचारत असे.
वहिनी सुद्धा ए.व्ही.सारख्याच शांत , सरळ आहेत. तशीच मुलगी राधीका . ही ए.व्हींची मुले आहेत हे कोणालाही न सांगता समजते.
असे हे मित्र आर. एम. आणि ए.व्ही. असल्यामुळे कोणत्याही विषयांवर गप्पा, चर्चा , वाद करायलासुद्धा वेळ काढावा लागत नाही. असे दोन चार मित्र मिळाले की बस्स. आयुष्यभर पुरुन उरणारे समाधान विनासायास मिळेल यात शंकाच नाही.

Comments