धन्वंतरी...................................
तुम्ही म्हणाल की तू अशी अत्युच्च विशेषणे अगदी तुझ्या समोरच्या माणसांसाठी कशी काय वापरतोस? तर अस आहे की आपल्याला अगदी अत्युच्च असे समजेल का नाही? देव आपल्याला तर दिसणार नाही. तरी चांगले गुण खूप असणाऱ्या माणसांना आपण देव नाही तर देवमाणुस म्हणतोच ना? तसेच हे.
देवांकडे अजर, अमर बनवणारे अमृत होतेच ना? मग त्यांना डाॕक्टर म्हणजे धन्वंतरी कशाला लागत असावेत? अशी छोटीशी शंका मनात येतेच. मग आम्ही काय करतो तसेच गुण असणाऱ्या डाॕक्टर, वैद्यांना धन्वंतरी म्हणतो.
परवाच सांगलीच्या नव्वदीच्या पुढच्या डाॕक्टर दातार त्यांच्या गुणवैशीष्ठ्यांबद्दल वाचले आणि आमच्या डाॕक्टर साठ्ये म्हणजे डाॕ.गोपाळराव अनंत साठ्ये यांची आठवण झाली . पुर्वी मी त्यांच्याबद्दल एका मासिकात लिहीले होते. आता या माध्यमातून तुमच्यासाठी लिहीतो आहे येव्हढेच.
ते माझ्या वडिलांचे मित्र आणि आमचे फॕमीली डाॕक्टर . आता फॕमीली डाॕक्टर म्हणजे काय हेही सांगणे आवश्यक झाले आहे. कारण फॕमीली डाॕक्टर ही संज्ञाही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
फॕमीली डाॕक्टर म्हणजे ते
फॕमीलींचे केवळ डाॕक्टर नसत तर फ्रेंड, फीलाॕसाॕफर, गाईड वगैरे असत. कुटुंबातल्या सगळ्यांना त्यांनी वेगळेवेगळ्या वयात, वेगळेवेगळ्या आजारांसाठी तपासलेले असे. त्यांच्या प्रकृतींबद्दल त्यांना पूर्ण माहिती असे. त्यांना काय सोसते काय नाही त्यानुसार ते औषधयोजना करत असत. लहानपणी ब-याच वेळा बाटली घेऊन त्यांच्या दवाखान्यात जाण्याचे काम लागत असे. मग कोणाला काय होते आहे ते सांगीतल्यावर ते औषध देत. अगदीच आवश्यक असेल तर त्यांचे व्याप सांभाळून घरी येत.
डाॕक्टर थोडेच असण्याचा तो काळ होता. डाॕक्टरांच्या बुलेटचा आवाज लांबूनही ऐकू येत असे. फटफट आवाज करते म्हणून तीला फटफटी असेही म्हणत.
घरी आल्यावर त्यांच्या हातातली ती काळी जाड बॕग ऊघडत. साबणाने हात धुवत. त्यांना आम्ही टाॕवेल द्यायचो. त्यातही तू टाॕवेल देणार का मी? अशी स्पर्धा असे. मग ते मुलांना " आता तुम्ही पळा." म्हणत. पेशंटला तपासत. कीती दिवसांपासुन बरे नाही? खाण्यात काय आले होते? विचारत. जीभ , पोट तपासत. आवश्यक व आवश्यक तेव्हढीच औषधयोजना करत. एक किंवा दोन डोसात पेशंट बरा होऊन जाई.
जाताना डाॕक्टर सगळ्यांचे काय काय चाललेय याची चौकशी करत. कोण काय शिकतेय येव्हढेच नव्हे तर कोणी काय शिकावे, धंद्यात असला तर तेथीलही बरे वाईट काय याचीही त्यांना माहिती असे. शिवाय ते घरच्यासारखेच असल्याने त्यांना काही सांगायलाही लाज वगैरे वाटत नसेच.
एकदा आमच्यापैकीच कोणी आजारी होते. एक पेपर बुडाला. शाळा पुन्हा पेपर घेत असे. डाॕक्टरांचे सर्टिफीकेट असले तर. "डाॕक्टर सर्टिफिकेट द्या . तो आजारी होता. तुम्ही औषध दिले होते."म्हणालो. "मला सांगतो काय रे शहाण्या? बर बघु." मग त्यांनी त्यांची वही काढली. नोंद पाहुन सर्टिफिकेट दिले. मग आपोआप मनात, अशा नोंदी करतात, पाहिल्याशिवाय सर्टिफिकेट देत नाहीत हे मनात फीट्ट बसले.
बहुतेक वेळा डाॕक्टर त्यांच्याकडच्याच गोळ्या , कधी एखादे औषध , त्यात गोळ्या खलून , मिसळून औषध तयार करुन देत. कधी ते काम कपौंडर रामभाऊ म्हणून होते ते करत.
"राधा गोविंद धाम " आसेतु हिमाचल ग्रंथाचे रचयीता असे लिहीलेल्या वाड्यात जायचो. डावीकडच्या दगडी जीन्याने वर डाॕक्टरांचा दवाखाना होता. आत डाॕक्टर रहात असत. तो दरवाजा बंद असे. बाहेर चार पाच मोठे लाकडी बाक असत. नंबरप्रमाणे लोक बसत. कधीकधी व्हिझीट संपवून डाॕक्टर यायचे असत. आल्यावर एकेका पेशंटला पाच , दहा मीनीटांत तपासून औषधे देत. इंजेक्शन कमीच वेळा देत असत. चार दिवस जास्त गेले तरी चालतील पण उगीचच जास्त , व स्ट्रा़ँग औषधे देत नसत. बाहेरुन घ्यायची औषधेही अगदीच वेळ आली तर किंवा काही टाॕनीक वगैरे लागले तरच द्यायचे.
आत पेशंटना तपासण्यासाठी उंच बेड होता. लाकडी स्टूलवरुन चढून जायचे आणि झोपायचे. जीभा बघू. पोट दाबून तपासत. हळू श्वास घे. असे सांगत. समोर टेबलवर स्टोवर पाणी ऊकळत असे. त्यात काचेच्या सिरींज असत. ती काढून घेत धुवून त्यात बाटलीतील औषध घेत. सुई लावून कारंजी ऊडवत. तोवर बरे वाटे. आता तिकडे वळ. हं. झाल. म्हणून इंजेक्शन देत. तेःव्हा हायसे वाटे. पण त्यांनी इंजेक्शन देताना दुखत नसे.
अंडे वगैरे खायला सांगितले तर "त्याऐवजी दुसरे काही नाही का चालणार ?" असे लोक विचारत. तेंव्हासुद्धा डाॕक्टर आपल्यासारख्या ब-याच लोकांचे फॕमीली डाॕक्टर आहेत हे समजत असे. इतके लोक औषधे घेऊन जातात, बिले देणारे कोणी दिसत नाही हे तेंव्हाही जाणवत असे. तो व्यवहार मोठे बघत असतील असे वाटायचे.
डाॕक्टर तालीम केलेले होते. मार्गशीर्ष महीन्यात लक्ष सुर्यनमस्कार घालण्यात ते पुढे असत. सकाळी लवकर येऊन नमस्कार घालून वहीत नोंद करुन जात असत. पुर्वी त्यांनी सायकलवरुन लांब लांबच्या सफरीही केल्या होत्या.
साडेपाच फुट उंची, गोरा वर्ण, तालीम केलेली असल्यामुळे गुटगुटीत , छान तब्येत कधीतरी वाचण्यापुरता चष्मा , चेहऱ्यावर सतत हास्य त्यामुळे पेशंटला त्यांना पाहूनच बरे वाटत असावे.पँट आणि फिक्कट रंगाचे प्लेन हाफ शर्ट.
"काहीतरी अरबट, चरबट खाल्ले असशील. आता जरा दोन दिवस कमी खा. औषध घे. मग होशील बरा." असे सांगत असत. प्रचंड अनुभव , अचूक निदान , पुरक व कमीतकमी औषध योजना अशी काहीतरी त्यांची पद्धती असावी.
मी जरा मोठा झाल्यावर कधीतरी "मिशन हाॕस्पीटल मध्ये एकेक वेळा दोन दोन, तीन तीन दिवस सलग ड्युटी केली आहे. किती आणि कसले कसले पेशंट पाहिलेत. बरे केलेत. " असे म्हणाले होते.
त्यामुळे अगदीच हाताबाहेरची केस वाटत असेल तरच हाॕस्पीटलला जा असे सांगायचे. एरवी आजारांना ते घाबरत नसत , आजार मात्र त्यांना घाबरत असावेत. पेशंटला तर ते आजाराबद्दल फार सांगतही नसत. त्याच्या घरच्यांना मात्र बाहेर आल्यावर थोडक्यात सांगत असत.
डाॕक्टरांचे शेत होते म्हणजे अजूनही आहे. डाॕक्टर रोज एखादी फेरी शेताकडे मारत असत. कामाला माणसे असली तरी तेथेही एखाद दुसरे काम करायला लाजत नसावेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ अशा मुशीतले ते प्रकरण होते. नगरपालीकेत विरोधी पक्ष नसल्यात जमा असला तरी डाॕक्टर निवडून येतच होते. पण ते पक्षबीक्ष , त्यांच्या व्यावसायिक लोकसेवेच्या कधीच आड येत नसे. "कोणी आजारी आहे बघायला या." म्हटले की गाडी काढून डाॕक्टर कोठेही जायला तयार असत.
माझ्याच एका मित्राचा काका बसमधून ऊतरताना खांबाला थडकला. बरगड्यात काहीसे झाले असे त्याला वाटले. तो विव्हळतच घरी आला.तोच काय पण त्याला पाहणारेही घाबरले. त्याला कोणीतरी डाॕक्टरांकडे नेले.डाॕक्टरांनी छातीभर घट्ट चिकटपट्या चिकटवल्या. त्याला "मी सांगितल्याशिवाय घराबाहेर पडलास तर बघ." असा चांगला दम भरला. नुसत्या गोळ्या औषधांवर आठ दिवसांत त्याला बरा केला. असा चमत्कार पाहिल्यावर लोक मानणार नाहीत तर काय?
दुसऱ्या एकाच्या पायाचे बोट तारेच्या कुंपणात अडकून फाटले, लोंबकळायला लागले तर ते फक्त नीट जोडून योग्य ड्रेसींग करुन काही दिवसांत बरे केले.
मग न समजणारे लोक डाॕक्टर कित्ती दिवस औषध देतात. त्यांच्याकडच्या त्यांच बरण्यातले तेच औषध देतात, म्हणू लागले. पण त्याच औषधांनी पिढ्यानपिढ्या हजारो लोकांना कमीतकमी पैशांत बरे केले होते हे मात्र त्यांना आठवत नाही. असो. तो विचारांचा काळाचा महीमा म्हणायचा.
डाॕक्टर तालमीच्या कार्यक्रमांत भाग घ्यायचे. त्यांना त्यांच्या माडीवरचा, सोंगट्यांचा खेळ आवडायचा. बरोबरच्या मल्लांसारखे पैजा लावून जिलब्या खायला आवडायाचे. ठणठणीत जगावे कसे हे त्यांच्याकडे पाहून कळायचे. मारुतीराय हे त्यांचे दैवत होते.म्हणून ते सगळ्यांना निरोगी रहायला निरोगी विचार करायला शिकवू शकत.
वरही धन्वंतरी डिपार्टमेंटला डाॕक्टर कमी झाले की काय माहिती नाही. थोडे वय होऊन थोड्या आजाराने डाॕक्टर गेले.
डाॕक्टरांचा मुलगा भालचंद्र चांगला डाॕक्टर झाला आहे. राजकारणही करतो. सुनबाईसुद्धा डाॕक्टर आहे. वारसा सुरु आहे. दोन मुली आहेत सुषमाताई आणि सुवर्णा. सुषमाताईने आमच्याच बँकेतल्या मित्राशी लग्न केले. सुवर्णा पुण्याला आहे. काकू आहेत.
पण काहीकाही वेळा , अशा वेळेस डाॕक्टर काय म्हणाले असते? त्यांनी काय केले असते? असे वाटून जाते. त्यांच्यासारख्या धन्वंतरीची आठवण येते. हात आपोआप जुळतात आणि डोळे पाणावतात...
Comments
Post a Comment