गुळपोळी........................................

 साध्या पोळ्या करणे हे भुमितीतील प्रमेयासारखे आहे. प्रयत्न करुन , पाठांतर करुन ते जमू शकते. गुळपोळ्या , पुरळपोळ्या हे भुमितीतील रायडर सारखे आहे. ते आले तर आले नाहीतर काही केल्या जमायचे नाहीत.

असे पदार्थ कोणी करताना बघणे फार आनंददायी असते. नंतर खाणे तर त्याहूनही आनंददायी असते. पाहताना वाटते हे काय साधे सोपे आहे. कणकेच्या गोळ्यात गूळाचा गोळा घालायचा, लाटायचा ,भाजायचा ,आणि खायचा . पण हा पण फारच महत्त्वाचा असतो.
दरवर्षी संक्रात आली आणि मी एकटा असलो की का कोणास ठाऊक मला गुळपोळ्या करायची अगदी हुक्की येते.
एकदा काय झाले पाहिलेले आठवून गूळ खिसुन घेतला. कणीक मळून त्यात त्याचे छोटे घातले. पोळ्या झाल्या. पण गूळावर संस्कार न झाल्याने त्या दिसायला, फोटोला सुंदर झाल्या. चव पाहता मात्र गुळपोळी न लागता गुळ आणि पोळी खाल्यासारखीच लागत होती. अर्थात खाणारे दुसरे कोणी नसल्यामुळे दोन, तीन दिवस त्या छान पुरल्या.
आता मागची चूक करायची नाही असे ठरवले. सकाळी ऊठल्या ऊठल्या त्याच कामाला लागलो. चांगली माहिती घेऊन ठेवली होती. आता चुकायचा चान्सच नव्हता.
तुपावर तीळ, खसखस, बेसन भाजून घेतले. त्यालाच पंधरा वीस मिनीटे लागली. आता गूळ खीसला की झाले. ते काम जरा वेळखाऊ असते. त्याला अर्धा तास गेला.
बाकीचा स्वयंपाक करण्यात आधीच तासभर गेला होता. गूळ तयार करेपर्येंत जेऊन कामावर जायची वेळसुद्धा झाली. आता ईलाज नव्हता. तयार गूळ झाकून ठेवला. " आता संध्याकाळी तुझ्याकडे बघतो " म्हणालो. आणि सरळ जेऊन कामावर गेलो.
संध्याकाळी सगळ्या तयारीनेच त्याच्याकडे वळालो. तो गूळ महाराजांचा गोळा थोडा घट्ट आणि कोरडा झाला होता. त्यामुळे फारसे बिघडणार नाही कणकेच्या गोळ्यात गेला की आपोआप सरळ होईल असे वाटले.
कणकेचा गोळा केला. त्यात गूळाचा गोळा घातला. लाटायला लागलो. तर काय आश्चर्य एका मोठ्या वर्तुळात , मध्यभागी छोटे वर्तुळ असते तसा तो बसला.हालेना की पसरेना. जरा जोर लावता तो हलायच्या ऐवजी पोळीतुन बाहेर येईल असे दिसू लागले.
असो. पोळी तर होते आहे याचे समाधान होतेच. पोळी तव्यावर टाकला ती गूळपोळी न वाटता गूळपराठ्यासारखी वाटत होती. असते कधीकधी अशी म्हटले. पोळी भाजून होता होता गूळ जरा काळसर होऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला तसे बाहेर पडू दिले नाही.
पोळी उलटी केली. तिकडे फारसा धोका नव्हता. परंतु खालची बाजू तापल्यामुळे गूळ थोडा थोडा बाहेर पडून तव्याला चिकटू लागला.
गूळाचा चंद्र पोळीतुन बाहेर पडून भोकाची पोळी दिसणार होती.पण थांबवली. आणखी दोन , तीन पोळ्यात गूळ बराच संपला. उरलेला थोडा तिळगुळात ढकलला.
येव्हढ्यात मित्र आला. बरे वाटले. आपणच चव बघण्यापेक्षा मित्राला दिलेली बरी. भरपूर तूप घालून खायला दिली. त्याने तीच्या रुपाकडे पाहिले आणि म्हणाला " जेवण ऊशीरा झालेय. भूकच नाही बघ. "
आग्रह केल्यावर एक तुकडा खाऊन "छानच झालीय" म्हणाला. त्याचे छान म्हणजे काय ते मला माहीतच होते. एक दोन पोळ्या जेवणात खाल्ल्या.
एक डब्यातुन नेऊन तिथल्या मित्राला दिली. त्याला ती फारच आवडली. नवा प्रकार दिसतोय म्हणाला. पोळ्या संपल्या. आता पुढच्या संक्रातीला पाहू आणखीन नवीन प्रकार काय होतोय. तोवर तिळगुळ घ्या गोड बोला.

Comments