ती परी............................................
खरे म्हणजे परीबद्दल लिहावे की नको असा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पण एकदा वाटले की अशा प-या कदाचित ब-याच जणांना माहिती असतील .त्यांना कदाचित समदुखःत्वाचा आनंद मिळेल .
ती परी कोण असा पुढचा प्रश्न निश्चितच उभा राहील. तर तीला सध्या परीच म्हणू म्हणजे सगळ्यांनाच बरे.
एकदम डोळ्यापुढे राहतो तो पहिली, दुसरीचा वर्ग. लांब फळ्या जमीनीवर ठेवलेले बाक. दहा बारा मुले आणि दहा बारा मुली. समोरच्या भिंतीत एक खिडकी होती. त्यातून छान हवा उजेड यायचा. एक बाई होत्या. त्या मॕडम किंवा मिस झाल्या नव्हत्या. त्या फार प्रेमळ होत्या. अजिबात रागावत , मारत नसत.
तेथे एकदा आली ती परी. तीची मुर्ती तशी फारशी स्पष्ट डोळ्यापुढे येतही नाही. पण ती होती परीसारखी गोरी गोरी पान. तीचे बाबा डाॕक्टर होते. अर्थात हे संदर्भ , माहिती नंतर कधीतरी मिळत गेले. तेंव्हा डाॕक्टर म्हणजे कोणीतरी मोठे माणूस येव्हढेच कळत असेल. आमच्या त्या छोट्याशा शाळेला युनीफाॕर्मही असावा.
एकदा परीने तीच्या वाढदिवसाला वर्गातल्या सगळ्यांना तीच्या घरी बोलावले होते.
वाढदिवस आणि तो साजरा करणे हे आमच्या घरात तरी माहिती नव्हते. "तूझी जन्मतारीख किती? असे कोणी विचारले तर घरी विचारुन सांगतो असे उत्तर मी देत असल्याचे आठवते.
असो. तर परीने , अगदी चित्रातल्या परीसारखा झालर लावलेला , सुंदर पिवळा किंवा गुलाबी फ्राॕक घातलेला असे कधीतरी आठवते. खाणे वगैरे झाल्यानंतर जवळच्या छोट्या बागेत घसरगुंडीवरुन परी घसरत खाली येते, उड्या मारत परत वर जाते असे घडले असावे.
ती दोन तीन वर्षे कशी निघुन गेली कोणास ठाऊक. परीसुद्धा कधी, केंव्हा, कोठे गेली काही आठवत नाही.
मार्कांच्या , नंबराच्या, अभ्यासाच्या लहानशा लढाईत परी कोठेच नव्हती. नंतर अचानक मोठ्या काॕलेजच्या एका वर्षात "परी त्या वर्गात आली आहे," असे कोणा मित्राने कधीतरी सांगितले . ती फारशी दिसतही नसे. तीची ओळख मात्र कोणीही मित्र कधीही विसरला नव्हता.
परत तेही दिवस संपले. सगळे आपापल्या उद्योगाला लागले. भेटीगाठी होईनाशा झाल्या. आपापले उद्योग, घरेदारे, मुले बाळे, आपले करीअर झाल्यावर त्यांचे करीअर यात सगळे गुरफटले.
एकाच गावातले मित्र अधूनमधून भेटत. गप्पागोष्टी करत. आता सगळे मित्र बरेच रिकामे झाल्यावर जास्तच जवळ आले. जरी मैत्रीणी त्या काळी बोलत नसल्या तरी माहीततल्याच होत्या.
सगळ्यांच्या एकत्र गप्पात कोणीतरी परीचा विषय काढला. कोठे असते परी? करते तरी काय? वगैरे , वगैरे. बाकीच्या मैत्रीणींनी आम्हा सगळ्यांना वेड्यातच काढले .
" तुम्ही काय वेड्यासारखे परी, परी करत असता रे? गेली ती तुम्हाला सगळ्यांना टांग मारुन वगैरे वगैरे. "
परी तेंव्हातरी फार हुशार वगैरे नसावी. सुंद-या हुशार नसतात म्हणे. पण ती खास तर होतीच. त्याशिवाय ईतक्या जणांच्या इतकी वर्षे जशीच्या तशी लक्षात राहणे शक्यच नाही.
तसे पहिल्या छोट्या वर्गांनंतर ती कधीतरी लांबून दिसली असेल नसेल. तसे कोणीही तीच्या मागे वगैरे लागले नव्हते. कदाचित सगळ्यांनी तीला लांबून पाहण्याच्या अप्राप्य फुलासारखे समजले असेल.
कोणी म्हणते परी या गावी आहे. ती कधीतरी कोणाला तरी भेटली होती. अशा गोष्टीत खरे खोटे शोधायचे नसतेच.
एक जण परवाच म्हणाला, " परी अमेरिका असते." असेलही कदाचित . तीला या ग्रहावरची मानलीच नव्हती. तीला अमेरिका काय अवघड. परी खरी दिसायलाच नको. तीच्या असण्याच्या त्या बालपणीच्या चित्रातुनच ती खुणावत आहे, " मी ईकडे आहे. या ईकडे." बस्स आणखी काय हवे नाही का?
Comments
Post a Comment