सारे कसे शांत शांत........................

 शशी आणि मधू लग्न ठरल्यानंतर शांतपणे गप्पा मारायला पर्वतीवर येतात. तिथे शांततेऐवजी एक एक व अनेक नग येऊन त्यांची शांती कशी बिघडवतात याची ही सुंदर एकांकिका पु.लं.च्या लेखणीतली.

आता तीची आठवण वेगळ्याच कारणाने होते. एकांकिकेत पात्रे शांती शोधताहेत , आता शांती नको म्हणायची वेळ आली आहे.
दुसरे वर्ष सुरु झाले. लाॕक आऊट हा शब्द फक्त कामगार कायद्यात वाचला होता. सगळे जगच लाॕक डाऊन होईल अशी शंकाही फेब्रुवारी मार्च वीस पुर्वी कोणाला आली नसेल.
जिकडे तिकडे गर्दी, गोंगाट, आवाज याचीच आपणा भारतीयांना फार सवय आहे. जरा जास्त शांत शांत झाले की काहीतरी चुकतय असे वाटते.
केवळ नैसर्गिक आवाजांनी आपले समाधान होत नाही. आध्यात्मिक वगैरे लोकही शांतीच्या शोधात असतात म्हणे. परंतू सध्याची शांती ही तशी आनंदी न वाटता उगाचच वेगळी व नकोशी वाटत आहे.
पेपर, बातम्या सगळीकडे कोरोनाचे स्कोअर दाखवत आहेत. चार आकडी, पाच आकडी रुग्णसंख्या. इतके बरे झाले. रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी एक ना अनेक.
व्हाॕटस अॕप, फेसबुक सगळीकडे अनेकविध परिचीतांपैकी हे गेले, ते गेले , आदरांजली आणि श्रद्धांजली येव्हढेच. या लाटांत कितीतरी लोक निघुन जात आहेत.
काही व्हाॕटसअॕपी स्वयंघोषीत तज्ञ कोरोना हा आजारच नाही, प्रत्यक्ष लोक वेगळेवेगळ्या कारणांनी जात आहेत असे सांगत असतात. पण तीस , तीस , चाळीस पन्नास वर्षांचे लोक असेच अवेळी गेले असते असे वाटत नाही. एस.टी. वाल्यांनी त्या कोरोनाला "करुणा" म्हणून माणसाळवुन टाकला आहे.
मग त्यावरही शुअर शाॕट म्हणून हे करा, पाच मिनीटांत सर्व रोगांपासुन मुक्ती देणारेही भेटतात. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण कोणी पाहिल्याचे सांगत नाही.
शिवाय आपल्याला तसे थोडक्यातले , स्वस्त म्हणजे जुगाडी उपाय उगाचच रुचतात. त्यांनी उपयोग होणार नाही हे मनात एका बाजुला वाटतही असते पण म्हणतोय तर बघुया करुन असे म्हणत राहतो.
साधा गर्दी करु नका हा नियम पाळणे काहीच अवघड नाही. पण कोठे अपरिहार्यतेने कोठे कारण नसताना गर्दी केली जाते आणि संसर्गाला आमंत्रण मिळते.
बंद म्हटले की कोठुन, काय,कसे मिळवायचे याचा शोध सुरु होतो. दोन दरवाज्यांची दुकाने, घरे शोधली जातात. नको तेंव्हा असहकार, कायदेभंग आठवतो.
थोड्या सावधानतेने कोरोना टाळणे, बाऊ न करता परतवणे , अशक्य नाही. तसेही कित्येक जण पाच सात दिवसात बरे होऊन परत येतही आहेत.
आपले शरीर अत्यंत प्रभावी मापक आहे. ते आपल्याला सतत संदेश देत असते. तिकडे आपले लक्षही जात असते पण त्यांकडे तेव्हढे गंभीरपणाने पाहिले जात नाही. तसेच जवळच्यांना, मित्रांनाही ते जाणवते. "काय भाऊ, फार बारिक व्हायला लागला आहेस, काही आजार नाही ना? " किंवा "जरा ढेरी दिसायला लागली." तेंव्हाच काही करण्याची वेळ असते.
तसेच याही आजाराचे असावे. लक्षणे दिसताच, उपचार करायला हवेत. युक्त आहार , विहार, योग, प्राणायाम, शुद्धिक्रीया प्रतीबंधात्मकच आहेत. कोणताच आजार, कोणाला , कधीही होऊ नये. शरीर, मन तंदुरुस्त रहावे यासाठी त्याची योजना आहे. रोज थोडा वेळ काढला की झाले.
रातकिडे रात्रीच असतात असे नाही. दिवसाही काही झाडांवर किर्र, आवाजात ते ओरडत असतात. पोलीस लोकांना विनाकारण फिरु नका बजावत असतात. लांबलचक रस्त्यांवर दूरदूरवर कोणीही दिसत नाही.
शाळा, काॕलेजे पुन्हा गजबजावी, सर्वांची कामे सुरु व्हावी, सगळे कार्यक्रम नाटक, गाणी, माॕल, खाणी , सुरु व्हावीत आणि जीवघेणी नकोशी शांतता संपावी.
ती आज ना उद्या संपणार आहेच. पण तीने दिलेला धडा कधीच विसरण्यासारखा नाही.

Comments