हनुमान जयंती/ जन्मोत्सव.........................................
काल परवा कोणी हनुमान चिरंजीव असल्यामुळे त्याच्या बर्थ डे ला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणावे असे सुचवले. ते धार्मिक वगैरे दृष्ट्या बरोबर असेलही. परंतु सध्या तालमी, मारुती, उत्सव, आऊटडेट होऊ पहात असता , बर्थडेला केक वगैरे का कापू नये यांस उत्तर देण्याची वेळ येणार आहे.
शक्ती येण्यासाठी व आलेली शक्ती , युक्तीने योग्य कारणासाठी वापरण्याची बुद्धी मागण्यासाठी दैवताची जरुरी असते. असे दैवत म्हणजे हनुमान . प्रचंड शक्ती असताही, ती त्याने रामाची भक्ती करुन योग्य कारणासाठी वापरली. रावणाची लंका पेटवली . अशा कथा सर्वांस माहिती असतात. मारुतीरायाचे सोज्वळ, सुंदर रूप मुर्तीरुपे ऊभे असते. म्हणून शक्तीच्या उपासकास वेगळे शिकवावे लागत नाही.
अंबाबाई तालमीतला हनुमान जन्मोत्सव मी वय वर्षे सहा ते साठ काही अपवाद वगळता दरवर्षी पहात , त्या आनंदात सहभागी होत आलो आहे.
ह्या उत्सवाचे रुप मला वेगळेवेगळ्या भूमीकांतुन पहायला मिळाले. तालमीतल्या सर्वांच्या घरांत मुलाचा काही मुलींचाही जन्म झाल्यानंतर त्यांच्या नावाचा नारळ जन्मोत्सवाला मारुतीला देण्यापासुन सुरुवात होते.
हे म्हणजे शाळेत नाव घालताना जशी पाटीवर सरस्वती काढून शाळेत पाठवत तसा तालमीत आॕफीशीअल प्रवेशच असे. प्रवेशासाठी अर्ज, आधार, पॕन, फोटो, वर्गणी असा प्रकार नसे. आजही नाही. मग सवडीने मूल कधीही तालमीत येऊ शकत असे.
कळायला लागल्यापासुन भावाबरोबर नारळ, चार फुले घेऊन लवकर उठून आवरुन पोहचायचे असे.
मशीदीजवळच्या कडुलिंबाच्या झाडाखालुन जाताना त्या फुलांचा वेगळाच छान वास येत असे. तो कोठून येतो तेही कळत नसे.
भराभर चालत तालमीजवळ पोचताच बारिक आवाजात काही ऐकू येत असे . "म्हणजे आपण वेळेत आहोत." म्हणत बाहेरच्या नळावर हात पाय धुवून आम्ही आत शिरत असू. तालीम स्वच्छ धुतलेली असे. सगळीकडे पाना, फुलांच्या पताका लावलेल्या असत.
खूप म्हणजे खूप वेगळेवेगळ्या वयाचे लोक जमलेले असत.त्यात आप्पा, म्हणजे म.द. करमरकर. हरेराम जोशी, आण्णासाहेब देशपांडे, साठ्ये डाॕक्टर , कृष्णाभाऊ साठ्ये, तात्या साठ्ये, काका आपटे, अनिल आपटे, सतीश आपटे सर, आठवले बंधु , गोरे बंधु , गोखले बंधु , गूरव, लाड सर, कित्ती जेष्ठ, श्रेष्ठ, बरोबरीचे असत. आखाड्याच्या बाहेर मारुतीसमोर तीन्ही बाजुस चार पाच रांगांमध्ये लोक हात जोडून उभे असत.
सर्वत्र धुपाचा , उदबत्यांचा, फुलांचा वास भरुन राहिलेला असे. काशीचे जोशी गुरुजी प्रथम मारुतीरायाची साग्रसंगीत पूजा करत. नंतर एखादा विद्यार्थी लंगोट बांधून , हातात उदबत्ती घेऊन तालमीच्या भिंतींलगत उजव्या हाताने उदबत्ती गोल फिरवत असे. डाव्या हाताने मागून उजवा दंड धरलेला असे. असे सर्व तालमीत उदबत्ती दाखवण्यास धुप देणे म्हणतात. तो तसाच कुस्तीच्या आखाड्यातही उतरुन धूप देत असे.
पुन्हा मारुतीरायाजवळ येऊन उदबत्ती ठेवल्यानंतर दोन विद्यार्थी ऊजव्या हातात मोरचर म्हणजे खूप मोरपिसांचा एकत्र बांधलेला गठ्ठा घेऊन प्रार्थना होईपर्यत हळूहळू मोरचर हलवत असत.
कबाडे शास्त्री आणि साठ्ये बुवांनी रोज म्हणण्यासाठी वेगळी प्रार्थना व नित्यपाठासाठी वेगळ्या प्रार्थना केल्या आहेत. परंपरेने त्या म्हटल्या जातात. हनुमान जन्मोत्सवाला सर्व वारांच्या प्रार्थना , रोजची प्रार्थना म्हणून सर्वांपुढे धुप फिरवला जाई. नमस्कार करुन सगळे बाहेर येत.
थोड्या वेळाने मुलांच्या प्रतीवर्षी घेतल्या गेलेल्या , वैयक्तिक खेळांच्या, योगासने, मल्लखांब, सुर्यनमस्कार यांच्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडे. पाहुणे, खेळाडू, अधीकारी, डाॕक्टर असत. ते थोडक्यात बोधप्रद काही सांगत. मुलांना बक्षीसे घेतल्यानंतर आणखी कशात रस नसतो हे त्यांनाही कळत असतेच.
खेळाडूंच्या पिढ्यानपिढ्या तालमीत घडल्या. मुख्य हाॕलजवळच्या खोलीत नारळ, वर्गणी जमा करण्याचे टेबल असे. लगेच तो नारळ आत फोडण्यासाठी दिला जाई. त्याचे पाणी, खोबरे एकत्र केले जाई. प्रत्येकाला बाहेर जाताना प्रसाद म्हणून खोब-याचे तुकडे दिले जात.
स्टीलच्या बादलीतुन प्रसाद देण्याचे काम माझे वडील करीत. तेही परंपरेने माझ्या भावाने व मी केले.
प्रथम बक्षीसे घेता घेता हळूहळू कार्यक्रमाच्या तयारीत आलो. संपूर्ण तालीम बादल्याने पाणी घेऊन खराट्याने धुऊन काढणे. आखाड्यात उतरुन मऊ मातीचा चौकौनी पिरॕमीडचा कट्टा तयार करणे, त्यावर दुस-या पितळी हनुमानाची मूर्ती ठेवणे, ट्राॕफीज ठेवणे, हत्ती ठेवणे वगैरे मोठ्यांकडुन पहात, शिकत गेलो.
पाहुणे बोलावणे कधी पाहुणाही होणे , मुलांचे कौतुक करणे आपोआप जमत गेले. खेळाडू बदलत गेले. परंपरागत उत्सव, उत्साहाने तसाच सुरु आहे. राहणार आहे. हनुमानचा जन्मोत्सव अखंड साजरा करण्यासाठी.
Comments
Post a Comment