उपदव्याप................................
उपदव्याप हे कधीच एकटे न येणारे प्राणी आहेत. त्यांना "नस्ते" हे विशेषण लावल्याशिवाय उपदव्याप पूर्ण अर्थाने चमकत नाहीत.
अगदी बाळ जरा उठून फिरु लागले की उपदव्याप सुरु होतात. हरभरे, मोती, कानात ,नाकात घालणे इथपासुन ते सुरु होतात. तसे ते फारसे उपद्रवकारक नसतात उलट काही वेळा जाम विनोदी असतात. जास्तीत जास्त डाॕक्टरांकडे फेरी मारायला लावतात.
एका मुलाने , बहिणीला जादू दाखवतो म्हणून कानावजळ मोती धरले. एक मोती कानात गेल्याचे त्याला समजलेही नाही. रात्री झोप लागेना. कान दुखू लागला.
विचारल्यावर बहिणीने जादू सांगितली. डाॕक्टरांनी प्रयत्न केला , तो आणखीनच आत गेला. दुसऱ्या डाॕक्टरांनी मोती कानातच फोडून काढू म्हटले. तेही जमले नाही. तेंव्हा आॕपरेशन करुन कान उघडून मोती काढावा लागावा.
मुले इलेक्ट्रिक स्वीचमध्ये बोट घालण्याचा प्रयत्न करतात. ते लहान असतात म्हणून बरे.
नविन वस्तूंबाबत उत्सुकता, हे उपदव्याप करण्याचे मुख्य कारण असावे. उपदव्याप केले नाहीत असा मनुष्य आयुष्यात अगदीच मेंगळट होणार यात शंका वाटत नाही.
आई जवळ नाही पाहून कणकेत पाणी ओतणे , आई बाथरुमध्ये असता बाहेरुन कडी लावणे , स्वतः बाथरुममध्ये खोलीमध्ये अडकणे हे मुलांचे आवडते उपदव्याप असतात. ते फारसे त्रासदायक नसल्यामुळे थोडा वेळ काढला, ईकडची तिकडची चार माणसे जमवली की झाली. सगळ्यांची मस्त करमणूक होते आणि काही दिवस चर्चेला विषय पुरतो.
"अरे आतून बोल्ट सरकवलेला. निघणार कसा? तरी बरे ती जवळची खिडकी उघडी होती. कसाबसा गॕलरीत टोकाला जाऊन काठीने हळूहळू ढकलला तेंव्हा कुठे बोल्ट निघाला. आतून हा नुसता रडतोय. बाहेर आल्यावर म्हणतो कसा, मला येतो बोल्ट लावायला. "
दिवाळीत फुलबाजी अंगाला लावून घेणे, हातात धरणे हे काही उपदव्याप असतात.
आमच्या घरी एक म्हैस होती. छान , शांत होती बिचारी. तीच्या शेपटीची गाठ मारण्याचा प्रयत्न करणे, तीच्या अंगावर "म्हैस" असे खडूने लिहीणे , मग सगळ्यांचा ओरडा खाणे असे आमचे उपदव्याप असत.
पुर्वी सायकलला डायनोमा असे. तो अगदी बाटलीसारखा दिसायचा. त्याचे बुच फिरवून, आपटून काढण्याचा प्रयत्न करत असू. ते बूच वरुन नटाने आवळलेले असे. त्यामुळे हजार वेळा फिरवले आपटले तरी ते जाम निघत नसे.
कोणी म्हणे कपाळावर हजार वेळा बोट घासले की रामसीता दिसतात. कोणी कोणी तसे करुनही पाही. मग कपाळ घासून जखम होऊन ती दिसत असे. तेच रामसीता असावेत.
विलायती चिंचा वरून पांढऱ्या असतात. मस्त लागतात. त्यातील बी ला काळे आवरण असते. ते हळूच काढायचे. त्यातील पांढरे आवरण तसेच राहिले पाहिजे. अशा बीया सरकारी दवाखान्यात पाच रुपये किलो दराने विकत घेतात असे म्हणत. तसे कोणी मिळवल्याचे ऐकीवात नाही. कारण पांढरे आवरण रहातच नसे.
दिवाळीत शेवटच्या दिवशी न उडालेल्या फटाक्यांतील दारुपासुन झाड तयार करणे हा असाच उपदव्याप , अंगाशी येणारा ठरु शकतो.
काचेच्या पेपरवेट मध्ये हवेच्या बुडबुड्यांसारख्या पोकळ्या असतात. फुले असतात. ते उघडून दिसतील या विचाराने एखादा छोटा पेपरवेट फोडून पाहिला जाई. परंतु आत काहीच नसते याचे तेव्हढेच ज्ञान होत असे.
पारा, लोहचुंबक , वेगवेगळी भिंगे, बाॕल बेअरींग, स्पीकर, ही सर्व लहानपणची अतीव आकर्षणे असत. कोणी सांगितलेला भिंगाने कागद, कापूस जाळण्याचा प्रयोग, भिंग कागदी बंद खोक्याला लावून आतील बाजुस समोरच्या वस्तूंच्या उलट्या प्रतीमा पाहणे, फिल्म , बल्ब घेऊन सिनेमा दाखवणे हे उपदव्याप बरेच मनोरंजन करत असत. आपण शास्त्रात काहीतरी करणार असे क्षणैक समाधान मिळत असे येव्हढेच.
कोणी म्हणाले घोड्याचा केस बांधला की चामखीळ जाते . टांगे जवळच ऊभे असत. त्याला काय भरपूर केस असतात. शेपटीचा एक केस घ्यायचा. गेलो. शेपटी मागून धरली. केस ओढणार. येवढ्यात ते त्याला कसे कळले काय माहिती . खट्ट असा आवाज. गुढघा फुटला तेव्हढा नाही. कसातरी चालत आलो. काय झाले कोणाला सांगितले नाही. तरी कळालेच की घोडा लाथ मारताना दिसला नाही तरी मारु शकतो .
खूप लांब फिरायला जाणे , आपल्याला नविन काहीतरी दिसले ते सगळ्यांना सांगत बसणे याचेही कौतुक असे. एकदा आम्ही खूप लांब म्हणजे एखाद्या किलोमीटरवर ओढ्याजवळ खूप दगडी शिवलींगांसारखे आकार दिसले. आम्हाला वाटले पुस्तकात लिहील्यासारखे काहीतरी जुने शहर सापडले. सगळ्यांना त्याबाबत अभिमानाने सांगता, ती एक स्मशानभुमी निघाली.
जुन्या घरांत पुर्वी धान्य साठवण्यासाठी पेवे असत. काही दुरुस्तीचे काम निघाले असता, वर ठेवलेले जाते , खाली खोल खड्डा दिसे. आतले फार काही दिसत नसे. त्यात आपण उतरून आत पाहण्याची अतीव इच्छा होत असे. परंतु तसे कोणी करु देत नसत.
वाड्याच्या वरच्या माडीत खिडकी होती. त्याखाली थोड्या अंतरावर एक भिंतीतून बाहेर आलेला नळा दिसे.
त्यादरम्यान काहीतरी गुप्त खोली असावी असे उगाचच वाटत असे. माडीवर मातीचे सारवणच होते. कधीतरी तेसुद्धा जरा खणून पाहिले. गुप्तद्वार सोडाच मातीशिवाय काहीच दिसून आले नाही.
शाळे काॕलेजपर्येंत उपदव्याप चालू असतात. ते आयुष्याला छान रंगत आणत असतात. काहीजणांचे उपदव्याप मात्र कितीही मोठे झाले तरी संपत नाहीत. ते दुस-यांना त्रासदायक नसतात तोवर चालते.
नपेक्षा जास्त पैसे , एकदम मिळवण्याच्या नादात साखळी स्कीम काढणे, पैसे दुप्पट करुन देतो सांगणे, चमत्कारी वस्तू, रुद्राक्ष, नागमणी, दोन तोंडाचा साप अशांच्या नादी लागून एकतर पैसे घालवणे किंवा दुस-याला घालायला लावणे, यात माणूस अडकतो. अशा लोकांना खूप जुन्या मुंबईत म्हणजे इंग्रजांच्या वेळेस तर्कटी लोक म्हणत असत.
तात्पर्य काय उपदव्याप जरूर करावेत, पहावेत पण जपून मनोरंजना येव्हढेच.
Comments
Post a Comment