एक ड्राफ्ट --न वठलेला.......................................

 चिंतुभाऊंचा गावात नाही म्हटले तरी चांगलाच दरारा असे. त्यांचे गाव तसे छोटे. जिल्ह्याच्या जवळचे. गावात जेमतेम दहा वीस वाड्या होत्या. सगळे सुशिक्षीत असले तरी सल्ला मागण्यासाठी सतत कोणी ना कोणी चिंतुभाऊंकडे येत असत.

सिताकाकू आल्यागेल्याचे चांगले पहात असत. त्यांची एकुलती एक लेक सरीता एव्हानाच चांगली एम. ए. फर्स्टक्लास घेऊन पास झाली होती. चिंतुभाऊ पोस्ट मास्तर म्हणून रिटायर झाले आणि गावी स्थायीक झाले.
पेन्शन आणि थोडी वडिलार्जीत शेती होती. कामात , गावातील लोकांना मदत करण्यात त्यांचा वेळ छान जात असे. आता सरीतेचे लग्न ऊरकले की ते अगदी मोकळे होणार होते.
नातेवाईकांत, ओळखीत सगळ्यांना सांगून ठेवले होते. गावातल्या लोकांना मात्र सरीतेला छान नवरा मुंबईचाच मिळायला हवा असे मनापासून वाटत होते.
चिंतुभाऊंना एकच भाऊ. तो म्हणजे मधु. सगळेजण त्याला मधुकाका म्हणत. तो मुंबईला मोठ्या कंपनीत अधीकारी होता. त्याला गावाला यायला फारसे आवडत नसे. चिंतुभाऊ जसे तत्वनिष्ठ , तसा तो नव्हता.
माधुकाका आणि माधवीकाकु एव्हढेच त्यांचे कुटुंब. सरीतेवर त्यांचा फारच जीव असे. ती आमचा मुलगाच आहे असे ते सगळ्यांना सारखे सांगत. तीचे सगळे लाड पुरवत.
एकदा वाडीतील एकनाथराव मुंबईहून गावी आले असता मुद्दाम चिंतुभाऊंकडे आले. "आज हा एकनाथ इकडे कसा वाट चुकला? " असे चिंतुभाऊंना वाटलेच. लगेच त्यांनी प्रश्न केला "काय रे एकनाथा, आज तू इकडे कसा?"
तेंव्हा एकनाथरावांनी सरीतेसाठी त्यांच्याच कंपनीतल्या कुमारचे स्थळ असल्याचे सांगितले . "त्याचा मुंबईत फ्लॕट आहे. घरात एकटी आईच आहे. चांगला पगार, गाडी काही कमी नाही. त्याला मुलगी मात्र नोकरी न करणारीच हवी " हेही सांगितले .
चिंतुभाऊ त्यांना "बरे बघू, नंतर कळवतो ." सांगून घालवायच्या बेतात होते. पण सिताकाकूंच्या आग्रहामुळे येव्हढे घरी चालून आलेले पहिलेच स्थळ नाकारायला नको म्हणून फोटो, पत्रिका द्यायला तयार झाले.
सरीता हा संवाद ऐकतच होती. येव्हढ्यात मोडता घालायला नको म्हणून गप्प होती.
तीचा लग्नाचा योग मात्र जबरदस्त असावा. आठवेच दिवशी चिंतुभाऊंना कुमारचाच फोन आला. त्याची आईसुद्धा बोलली. त्यांना सरीतेचे स्थळ एकदम पसंत पडले होते.
त्यांनी सरीतेला पाहण्यासाठी शक्यतो लवकर मुंबईलाच बोलावले होते. जवळचाच रविवार धरुन चिंतुभाऊ आणि सरीता मधुकाकांकडे उतरले. काकाला तर सरीता मुंबईला आली व कदाचित मुंबईची होणार याचा खूपच आनंद झाला.
ते दोनच दिवस राहणार याचे त्यांना वाईट वाटले पण चिंतुभाऊंचे एकदा ठरले म्हणजे ठरले. त्यात कोणीही बदल करु शकत नसे. त्यांनी मित्रांना फोन करुन कुमारची माहिती काढायला सुरूवातही केली.
सुदैवाने त्यांचे एक मित्र कुमारच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये रहात होते. ते कुमारला चांगले ओळखतही होते. त्यांनी "अगदी बेलाशक स्थळ पसंत करा " असे सांगितले .
रविवारी अकराच्या सुमारास चिंतुभाऊ, सरीता, मधुकाका, माधवीकाकु कुमारच्या घरी पोचले. त्याने सगळ्यांचे स्वागत केले.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. घरच्या चौकशा झाल्या. नाही म्हटले तरी मधुकाकांच्या मोठ्या कंपनीमुळे , पदामुळे थोडा फरक पडलाच होता. त्यांनी कुमारची सगळी चौकशी केली. दोघांच्या पत्रिका जमल्या होत्याच.
सरीता येतानाच तीला पाहून कुमार खूष झाला होता. गावाकडची असली तरी ती चुटचुटीत व मुंबईतल्या मुलींपेक्षा वेगळी वाटत नव्हती. चहा पोहे त्याच्याच आईने केले होते. त्यामुळे ते आवडतच होते.
सरीतेच्या आवडी , निवडीविषयी तसेच नोकरी करायचीच आहे का? हे त्याने विचारले. सरीतेची नोकरी करायचीच अशी आवड नसल्याचे ऐकून तो खूष झाला.
कार्यक्रम संपला. "लवकरच कळवतो." असे चिंतुभाऊंना त्याने सांगितले . सगळे घरी आले. माधवीकाकुंनी झटपट पण छान श्रीखंडपुरीचा बेत केला होता. सरीताला कुमार बरा वाटला होता.
मधुकाकाने सरीतेला घेऊन जाऊन दोन ड्रेस ती नको नको म्हणत असता घ्यायला लावले. रात्रीच्या गाडीने चिंतुभाऊ निघाले .
चार दिवस वाट पाहण्यात गेले.पाचवेच दिवशी चिंतुभाऊंना कुमारचा फोन आला. " काका, म्हणजे तुम्हाला काका म्हटले तर चालते ना ?" "चालते तर काय?" चिंतुभाऊ म्हणाले. मग त्याने आईकडे फोन दिला. त्यांनी सरीता त्या दोघांना पसंत असल्याची गोड बातमी सांगितली. मुद्दाम सिताकाकूंना बोलावले व त्यांनाही ते सांगितले . त्यांना तर एकदम अत्यानंदच झाला. इकडचे तिकडचे बोलून त्यांनी सगळ्यांना रविवारी मुंबईला लग्नची बोलणी करायला बोलावले. हळूच सरीतेची पसंती विचारली. तीला सगळे बरे वाटले होते. पहिलेच स्थळ येते काय , तो आपल्याला पसंत करतो काय. सगळेच वेगळे वाटत होते. तीने हळूच लाजून" ठीक आहे" म्हटले. त्यावरून सगळ्यांना तीची पसंती समजली.
परत सगळे मुंबईला रवाना झाले. मधुकाकांना बातमी आधीच समजली होती. सगळ्यांनी बसून ते लोक काय काय मागण्या करतील याचा विचार सुरु केला. चिंतुभाऊ त्यांच्या तयारीबद्दल बोलतच नव्हते. "पाहू उद्या प्रत्यक्ष बैठकीत" येव्हढेच ते म्हणाले.
रविवारी चिंतुभाऊ , मधुकाका , सरीता , सिताकाकू , माधवीकाकु छान आवरुन कुमारच्या घरी पोचले. तेथे त्याची मावशी , तीचे पती व एक काका होते. त्यांनी रितसर बोलण्यांना सुरुवात केली. " आम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. मुलगी पसंत आहे. तुम्ही रितीप्रमाणे मानपान करा. लग्न करुन द्या. मुंबईहून , पुण्याहून आमची पन्नासएक माणसे येतील त्यांचे भाडे द्या. "
तशा मागण्या फारशा नव्हत्या. तरी काही लाखात खर्च जात होता. चिंतुभाऊंनी "ठीक आहे." म्हटले. रितीप्रमाणे ठराव लिहून झाला. त्याला हळदी कुंकू लावून तो देवापुढे ठेवला. सगळ्यांनी नमस्कार केले. चहा फराळ होऊन कार्यक्रम संपला.
कुमार आणि सरीता तोवर जवळच्या देवळात म्हणून जाऊन आले. मंडळी घरी परतली. एक मोठ्ठे ओझे उतरल्यासारखे झाले.
तसे चिंतुभाऊंना फारसे जड नव्हते. त्यांनी मनाशी खर्चाचे हिशेब सुरु केले. मधुकाका म्हणाले " आरे दादा, काही काळजी नको. मी आहे . सरीता माझा मुलगाच आहे. " चिंतुभाऊ म्हणाले,"मी तीचा बाप आहे ना? लागले तर मागेन हो तुला. "
सगळे समजून चुकले की चिंतुभाऊंना कोणाचीही मदत नको होती. सगळे क्षणभर गप्प झाले. मग पुन्हा सरीतेची चेष्टा मस्करी सुरु झाली.
चिंतुभाऊ घरी आले. आता लग्नाचा मुहूर्त ठरवायचा होता. तो सगळ्यांच्या सोयीने मे महिन्यातला रविवार ठरवला. आता मंडळी पुढच्या तयारीला लागली.
एके दिवशी चिंतुभाऊंच्या नावाचे एक रजीस्टर आले. उघडून पाहतात तो काय आत मधुकाकांचे एक पत्र आणि पन्नास हजारांचा ड्राफ्ट . " ह्या मधुला हे कोणी सांगितले होते. मला लागले तर मागेन म्हणालो. मला काय हा भिकारी समजला का?" असे चिंतुभाऊ कधी नव्हे ते जोरजोरात बोलू लागले .
सिताकाकू , सरीतेने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी हा ड्राफ्ट चा विषय घरात काढायचा नाही या मुद्द्यावर एकमत झाले.मधुकाकाचे फोन येत होते. चौकशा होत होत्या. चिंतुभाऊ जेवढ्यास तेव्हढी उत्तरे देत होते. हळूहळू लग्नाच्या तया-यांनी वेग घेतला. चिंतुभाऊ ड्राफ्ट आल्यापासून नाही म्हटले तरी थोडे नाराज झालेत हे तीने केंव्हाच ओळखले होते. चार दिवसांनी होईल ठीक असे तीला वाटत होते.
लग्न समारंभ गावाच्या मानाने थाटात पार पडला. सरीता जड मनाने सासरी निघाली. "भाऊ , आईकडे लक्ष द्या. ड्राफ्टचा विषय डोक्यातून काढून टाका. " हो.हो." म्हणत चिंतुभाऊंनी सगळ्यांना निरोप दिला.
रात्री जेवणे झाल्यावर मधुकाकांनी हळूच विषय काढला. " दादा लग्न , मानपान छान केलेस. जावई सुद्धा चांगला आहे. तुला पैसे नकोत तर राहू दे. तो ड्राफ्ट दे. मी बँकेत भरतो. "
चिंतुभाऊ म्हणाले, " मी मागीतले होते का पैसे. ? ड्राफ्ट का फाफ्ट मला नको सांगू. मला माहिती नाही कुठे आहे तो?" झाले. मधुकाका समजून चुकला हे प्रकरण आता बिघडले आहे.
दोन दिवासांनी मधुकाका थोड्या विषण्ण मनानेच मुंबईला गेला. सरीता पुढे गेलीच होती. तीचे हळूहळू मुंबईत रुळणे सुरु झाले. काका काकुंना फोन, भेटीगाठी सुरु झाल्या. काकाने ड्राफ्टचा विषय काढला. बँकेत चौकशी करुन झाली. त्यांनी ड्राफ्ट नसेल तर हरवला म्हणून अॕफिडेव्हीट, इंडेम्नीटी बाँण्ड तसेच चिंतुभाऊंचे नो आॕबजेक्शन पत्र तेव्हढे आणायला सांगितले . तिथेच घोडे अडले.
येव्हढ्या पैशाने मधुकाकाला फार फरक पडणारा नव्हताच. पण उगाचाच पैसे फुकट घालवावेत हेही पटत नव्हते. मग याला उपाय काय करावा तेही सुचेना.
कोणा मित्राशी बोलल्यावर शेवटी ओळखीच्या वकिलांकडुन सौम्य नोटीस पाठवावी असे ठरले. अगदी अनिच्छेनेच सरीतेला सांगून, नोटीस पाठवली गेली.
नोटीस पोचली मात्र , चिंतुभाऊ फारच रागावले. सख्खा भाऊ, मला वकिलाची नोटीस पाठवतो काय? त्यांनीही एक वकिल गाठले व मधुकाकाच्या नोटीसीला चांगलेच खरमरीत उत्तर पाठवले की त्यांच्या अशीलानी पैसे मागीतले नव्हते. घेतले नव्हते. ते कोणताही ड्राफ्ट देण्यास , नो आॕब्जेक्शन देण्यास बांधील नाहीत वगैरे वगैरे.
आता मस्करीचा सुर संपला. पैसे तरी मिळावेत म्हणून मधुकाकाने एकदा गावी येऊन चिंतुभाऊंवर ड्राफ्ट परत द्यावा किंवा नो आॕबजेक्शन द्यावे म्हणून दावाच केला.
झाले. अशीलच भांडायला येऊन बसले तर वकिल काय करणार. तारखा सुरु झाल्या. "तुम्ही दर तारखेला येऊच नका. मी पाहतो काय ते" असे मधुकाकांच्या वकिलाने सांगितले होते. चिंतुभाऊ मात्र दर तारखेला ड्युटीवर असल्यासारखे हजर असत.
चांगल्या दोन वर्षांनी एकदा सुनावणीची तारीख आली.मधुकाकांनी प्रतीज्ञापत्र दिले. उलटतपास झाला. चिंतुभाऊंनी त्यांना पुरावाच द्यायचा नाही सांगितले कारण त्यांना काहीच सिद्ध करायचे नव्हते.
न्यायाधीशसुद्धा असा वेगळा खटला पाहून चकीत झाले. तरीही कागदपत्र पाहून त्यांनी दावा मंजूर केला व चिंतुभाऊंना, ड्राफ्ट मधुकाकांना देण्यास किंवा ते नको असेल तर नो आॕबजेक्शन देण्यास सांगितले .
चिंतुभाऊंना हा आदेश विनाकारण वाटला म्हणून त्यांनी अपील केले. मधुकाकांनाही आदेश पसंत पडला नाही म्हणून त्यांनीही अपील केले.
अपील चालायला आले. जिल्हा न्यायाधीशांनी अपीले वाचली. वकिलांना बोलावले. खरा वाद, केवळ , मला न विचारता का? येव्हढाच असल्याचे ओळखले.
मधुकाका व चिंतुभाऊंना चेंबरमध्ये बोलावले. मधुकाकांना चिंतुभाऊंची माफी मागायला लावली. ते तयारच होते. त्यांनी माफी मागताच चिंतुभाऊंनी ड्राफ्ट त्यांना परत केला.
न वटलेल्या ड्राफ्टचे प्रकरण मिटले पण घरात दरी पडली ती सांधता सांधली गेली नाही.

Comments