प्रभुकुंजास भेट.....................................
महावीर जयंती का कसली सुट्टी होती. जेऊन मस्त आराम करत होतो. आमचे न्यायाधीश मित्र आले. "चला दिदींना भेटायला येता काय?" म्हणाले. दिदींना भेटायला कोणी बोलावल तर नाही म्हणणारा एकतर पृथ्वीवरचा नसेल किंवा कर्मदरीद्री असेल. म्हटले "काय विचारता राव?" हे कसे जमवलेत. तर त्यांनी सांगितले की काही कामांच्या चौकशीसाठी त्यांनी प्रभुकुंजाची भेट जमवली होती.
प्रत्येक घरातले दोन दोन म्हटले तरी आठ दहा जण झाले. एक दोन कार होत्या. देवळात आपण जातो तरी तो काही प्रत्यक्ष दिसत नाही. येथे मात्र गानसरस्वतीचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते. सगळेजण आनंदाने नाचायचे बाकी होते. मुलांना ती मजा येव्हढी कळली नव्हती. त्यांना खाली गाडीत खालीच बसवायचे ठरले.
फार नटल्यासारखे वाटू नये तरीही ऊत्तमात ऊत्तम कपडे वगैरे सगळ्यांनी घातले होते. दिदींना काय द्यायचे. शेवटी एखादा मोठासा बुके द्यावा असे ठरले. एरव्ही त्यांना देण्यासारखे आपल्याकडे किंवा कोणाकडे काय आहे?
चारची अॕपाॕईँटमेंट ठरली होती. तीनला निघालो. हाजी अलीवरुन पेडर रोड. प्रभुकुंजाखाली एक बुकेवाला आहे. तेथून एक बुके घेतला.
सिक्युरीटीला सांगितले . निरोप गेले. लिफ्टमधुन वर गेलो. काय काय दिसतय, सगळेजण डोळ्यात साठवत होते. दरवाज्याबाहेर दिदींच्या सहीसारखीच नेमप्लेट आहे. बेल वाजवली. कोणीतरी दार ऊघडले. सगळेजण आत गेलो. जाताना पॕसेजच्या डाव्या बाजूला मोठ्ठे म्हणजे आपल्या घरांच्या दिड दोन खोल्यांएव्हढे देवघर आहे. शंकरराची मोठी पिंडही दिसली.स्मृती चिन्ह व अॕवार्डस तर लाॕफ्टवर ठेवले होते. एखादे असले तर कौतुक . इतकी असल्यावर काय करणार.
हाॕलमध्ये हळूहळू सोफ्यांवर बसलो. दिदी थोड्या वेळेत येतील असे सांगण्यात आले. ऊषाताई होत्या. त्यांना नमस्कार केले. ओळखी सांगीतल्या.
नाश्ता चहा पाणी झाले. साहेंबानी कामाचे बोलणे केले. ऊषाताईंना मी लिहून नेलेली एक कविता दिली. त्यांनी ती वाचली .त्यातच जन्माचे कल्याण झाल्यासारखे वाटले.
सुदैवाने दिदींची कोणी नातेवाईक वकिल आहे. हुशः झाले. टेकायला धागा मिळाला. मग काय कोर्टात असल्यासारख्या गप्पा रंगल्या.
थोड्या वेळाने दिदी येत आहेत अशी खबर आली. आम्ही आणखी सावरुन बसलो. आणि डाव्या बाजूच्या रुमकडून पडदा सारुन दिदी आल्या. आम्ही सर्वजण अवाकपणे ऊभे राहिलो . दिदींनीच सर्वांना ऊभे काय राहता बसा, सांगितले . आम्ही बसलो. थोडावेळ दिदी एका कोचाच्या कडेवर बसल्या होत्या.आम्हालाच अवघडल्यासारखे झाले. मग त्या कोचावर बसल्या.
थोडे कामाचे बोलणे झाले. मग ओळखी सांगता सांगता आम्ही मिरजेचे आहोत सांगितले. दिदी खूष झाल्या. आपल्या घरचेच कोणी असल्यासारखे त्यांनी सांगलीच्या चौकशा केल्या. त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. डाॕ.दादा परांजपे कसे आहेत? वगैरेसुद्धा त्यांनी विचारले.जुन्या सांगलीबद्दल सांगितले . ओढून ताणून किती बोलणार. "दिदी तुमची गाणी आम्हाला आवडतात. " म्हणणेसुद्धा बालीश वाटायचे. त्यांच्या कलाक्षेत्राच्या जागी तर आपल्याला पायरीशी सुद्धा ऊभे करुन देणार नाहीत असे वाटले. किती ग्रेट आहेत हे सगळे . थोड्या वेळाने भेट संपली. आशाताई येणार आहेत. जरा थांबा म्हणत होत्या. तरी अर्धा तास वेळ होता. मुले खाली होती. म्हणून निरोप घेतला. खाली आलो.
मुलांना भेळ वगैरे दिली. ती खूष झाली. एका पौराणिक कथेची आठवण झाली. देवी प्रसन्न होते. तीची इतकी मुखे पाहुन " सर्दीने तुझे किती हाल होत असतील ?" येव्हढेच भक्त बोलू शकला. देव देवता भेटल्या तरी त्या आपल्या येव्हढ्या होऊन भेटतील तेंव्हाच आपला पाड लागायचा नाही का? दिदींची भेट मनाच्या स्मरणकुपीत जपून ठेऊन सगळे परत आलो. ......
Comments
Post a Comment