माॕल संस्कृती ................................
खरेतर माॕल ही वस्तू खरेदी करण्याची साधीशी गोष्ट आहे . तीचा संस्कृती वगैरेशी संबंध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु माॕलमधील खरेदी तेथेच न थांबता तीचा थेट जगण्याशी संबंध येत आहे असे वाटते .
संस्कृती म्हणजे तरी काय, जगण्याची पद्धत. एखाद्या प्रदेशातील ब-याच लोकांना तसे रहायला , वागायला , बोलायला आवडू लागले की त्या लोकांची ती संस्कृती तयार होते असे वाटते . वर्षानुवर्षे करत करत पिढ्यानपिढ्या तसे वागू लागल्या की मग तिच्यावर पुटे चढून घट्ट आवरण तयार होते. तिच्यात बदलाला कोणी तयार होत नाही. या ना त्या कारणाने तीच्यात बदल होऊ लागले की सांध्यांची खडखड सुरु होते. प्रत्यक्षात त्यात गंभीर काहीच नसते.
सुदैवाने मला परदेशातील प्रचंड मोठे माॕल व तेथील संस्कृतीचे थोडे दर्शन झाले. तेथे माॕलना माॕल न म्हणता "सुपर मार्केट" असे म्हणतात . मोठमोठया कंपन्या ती मार्केटस् चालवतात.
तीच्या व्यवस्थापनामध्ये अर्थातच सगळीकडे असतात तसे वर्ग असतात. जनरल मॕनेजर, सेल्स मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, स्टाफ वगैरे. त्यांना भरपूर काम असते. ब-यापैकी सुखसोयी असतात.
आपल्याला व्यवस्थापनापेक्षा गि-हाईकांमध्ये जास्त रस आहे. आठवडाभरातील कामाच्या दिवशी काही खरेदीचा प्रसंग आल्यास स्त्रीया गाड्यातून जाऊन खरेदी ऊरकतात.
कुटुंबाची खरेदी करायची असेल किंवा नसेल तरीही एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणाला भेट दिल्यासारखे लोक मार्केटांस भेटी देत असतात. त्यामुळे सुट्यांच्या दिवशी माॕल माणसांनी तुडुंब भरुन वहात असतात.
माॕलमध्ये सर्व असले तरी आपल्याला ओळख नसते. आपला दुकानदार आपल्याला ओळखतो. त्याचा काही फायदा होतोच . माॕलमध्ये सगळे सारखे असतात. आपली ओळख "क्रेडीट का डेबीट कार्ड येव्हढीच असते. पार ते आपल्याला " सर ये आपपर बहोत जचता है! " वगैरे म्हणत असले तरी आपली पाठ वळताच दुसऱ्या गिऱ्हाईकामागे धावतात.
"फ्राॕम पीन टू पियानो" सगळे आमच्याकडे मिळते अशी माॕलची जाहिरात करण्याची पद्धत असते. पुर्वी घरे मोठीच्या मोठी होती, तेंव्हा लहान दुकाने चालत होती. आता घरेच लहान लहान झाली त्यामुळे दुकाने प्रचंड मोठी झाली असावी. माणसाला एकूण मोठेपणाची ओढच असते असे वाटते . ते कोठेतरी मिळावे लागते.
गाड्या बाहेर लाऊन आपण आत शिरलो की काचेचे दरवाजे आपोआप बाजूला सरकतात. सिक्युरीटी आपली आपण चोर असल्यासारखी तपासणी करतात. येथून आपली ओळख संपत जाते. आपण वेगवेगळ्या शेल्फजवळुन जाताना मागून कोणीतरी सेल्सवाले फिरतच असतात.
तुम्हाला पाहिजे ते सर्व आमच्याकडे आहेच हे दाखवण्याचा आटापिटा सुरु असतो. एकदा तुम्ही खूपखूप खरेदी केलीत की त्यांना फार बरे वाटते.
सर्वत्र ए.सी.चा थंडावा , मंद संगीत, शेल्फवर आकर्षकपणे मांडून ठेवलेल्या वस्तू आपल्याला खुणावतात. सुंदर प्रकाश योजना असते. निरनिराळ्या जाहिराती खुबीने मांडलेल्या असतात. तुम्ही जरा रिकामे दिसलात तर चटकन म्हणून कसल्याशा योजनांबद्दल सांगणारे कोणीतरी चिकटतेच.
5/-रु, 17/-रु, असे मोठे फलक असतात. त्या वस्तूंच्या किंमती वाटून खुश व्हावे व जवळून पहावे तर तेव्हढे पैसे कमी असे लिहीलेले दिसते. दोन वस्तू घेतल्या तर एक फ्री, तीन घेतल्या तर चौथी फ्री हे परदेशात काही वस्तू म्हणजे साबण, बिस्कीटे, जॕम, बाबत असते ते आपल्याकडे आत्ता छोट्या छोट्या वस्तूंपुरते आले आहे.परदेशात स्प्रेच्या छोट्या बाटल्या वापरुन पाहण्यासाठी ठेवलेल्या असतात. कपड्यांचीच काय पण सोन्या चांदीच्या दागीन्यांची दुकानेही असतात. सर्वांना फुकटचे आकर्षण फार असते, त्याचाच फायदा घेतला जातो.
विशेष काय की ज्या वस्तू फारशा गरजेच्या नाहीत, त्या नसताही चालले असते त्याच प्रचंड प्रमाणात चकचकीतपणाने मांडून ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्याच खूप प्रमाणात घेतल्या जातात. त्यामुळे अर्थातच मार्केटांचा फायदा वाढतो. रोज लागणारे धान्य , भाज्या, फळे मात्र कोठेतरी कोपऱ्यात पहायला मिळतात. तेथे अर्थातच चकचकीतपणा वगैरे नसतो. तेथे तो लागतही नाही.
मोठ्या मार्केटांत प्रमोशन वगैरे सुरु असतात. कोणी सेलेब्रीटी कधी डोकावतात. कधी स्पर्धा कधी लाॕटरी असे इव्हेंटस सुरु असतात. मोठ्यांसाठी, मुलांसाठी करत करत एकूण खरेदी पाहता ३०% ते ४०% सामान नको असता घेतले जाते. धान्य, किराणा वगैरे अत्यावश्यक साहित्य फारसे नसतेच.
त्यामुळेही काही फारसे बिघडण्याचे कारण नाही. परंतु त्या मागोमाग सगळे तयारच आणावे, घरे फक्त झोपण्यासाठी, वीक एंड साठी वापरली जावीत असे बदल नवीन संस्कृतीला जन्म देत आहे.
कुटुंबे ,मेगाची मिनी व मायक्रो होतआहेत.दादा ,दादी ,नाना ,नानी, येऊन जाऊन असणारे होत आहेत. स्नेहाचा परीघ, घरच्यांबरोबर बाहेरच्यांना, जवळच्यांना कवळत होता तो आक्रसत जात आहे ही खरी खंत आहे.
आमच्यात तसे नाही म्हणणारे अपवाद वाढतील तेव्हढे चांगलेच आहे. माॕल मधील चकचकाट घरांतही असतोच. तेथे मिळणाऱ्या जेवण, सिनेमा वगैरे ऐशो आरामाच्या व्यवस्था घरातही तयार होत आहेत. जाता ,येता स्वतःबरोबर आणखी चार जणांची चार जणांची कामे करण्याची सभ्यता अपवादात मोडत आहे त्याचे दुखः आहे.
किराण्याच्या, खरेदीच्या निमीत्ताने किंवा कारण नसताना फिरणारा माणूस खूप काही गमावत आहे असे वाटते.
लहान लहान करत स्वतःपुरते पाहण्याची संस्कृती जन्म घेत आहे. तिच्या खुणा लहान लहान बदलांतून दिसत आहेत. हे सर्व परकियांनी केल्यानंतर त्यांना कुटुंब व्यवस्था आवडू लागली आहे. त्या बदलाचे आपण साक्षीदार होत आहोत एव्हढेच.
Comments
Post a Comment