डाळवांग.........................................

 काय हा विषय. एखादा खाद्यपदार्थ लेखाचा विषय होऊ शकेल काय याबद्दल सुद्धा भिन्न मते असू शकतात. पण आमच्या अंबाबाई तालमीचे खेळाडू जिथे जिथे पसरले आहेत त्यांच्या दृष्टीने डाळवांगे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.

परवाच एका मित्राने तालमीतल्या डाळवांग्याचा विषय काढला म्हणून हा प्रपंच.
आता रोजच दिवाळी असण्याच्या दिवसात डाळवांग्याचे कोणाला काय पडलय? मुलांना तर अस्सल म-हाठमोळ्या पदार्थांचे प्रेम वाटत नसावे. एकूणच खाण्यचे प्रेम कमी होत आहे असे वाटते. पुर्वी साधी पोळीसुद्धा कधीतरी होत असे. त्यामुळे गोडाधोडाचे फारच अप्रूप असे.
जितके मागे जावे तितकी साध्या साध्या गोष्टींना खूपच किंमत होती असे दिसते. तालमीचे अगदी जुने खेळाडू त्यामुळे डाळवांग्याबद्दल जास्तच प्रेमाने बोलताना दिसतात.
प्रस्तावना फारच झाली. अंबाबाई तालीम हे मिरजेतले एक संस्थान होते. अंबाबाई तालीम , भानू तालीम किंवा शाखा यापैकी कशाशीतरी प्रत्येक मुलाची, काही मुलींचीही बांधीलकी होती.
वंशपरंपरेनेही बांधीलकी जपलेली होती. शाळा काॕलेजे असलीतरी इतकी काटे की टक्कर कधीच नव्हती. तेथे शिकवतात त्याकडे नीट लक्ष दिले, आल्यावर दोन तीन तास अभ्यास केला की खूप होत असे.
संध्याकाळी मुलाने घरात राहणे मान्यच नव्हते. तालमीत , शाखेत मुले चांगली असतात. शिकवणारे असतात. वेळ चांगला जातो. उत्तम व्यायाम होतो. शरीर तयार होते. मोठे होण्याच्या वयात चांगले संस्कार होतात वगैरे, वगैरे.
तालमीत मुख्यत्वे प्रथम हुतुतू, नंतर कब्बडीचे राष्ट्रीय पातळीवरचे सामने पुरुष व महिलांचे वेगवेगळ्या वयोगटाचे होत. तो एक मोठ्ठा उत्सवच असे.
क्रीडांगणे माती घालून , पाणी मारुन तयार केली जात. प्रकाश योजना केली जाई. पंच परिक्षा , त्यातुन पंच मिळत. स्वयंसेवक, गॕलरी लावणे, प्रथमोपचार , सर्व काही दणक्यात असे. काही दिवस आधी म.द. करमरकर उर्फ आप्पा, के.सी.उर्फ काका आपटे, तात्या साठ्ये व तालमीचे कब्बडीपटू वर्गणी गोळा करायला बाहेर पडत.
बेंगलोर पासून दिल्ली, हरीयाना, पंजाब, रेल्वे असे संघ येत. वेगवेगळ्या संघामधले उत्तम खेळाडू आपला खेळ दाखवत.
कधी कुस्त्यांची मैदाने होत. व्यायाम प्रसारार्थ दौरे निघत. प्रत्येक दौरा म्हणजे वेगळा अनुभव असे. पन्नासभर खेळाडू बसमधुन जात. देशाच्या वेगवेगळ्या भागात कसब दाखवून येत.
हे प्रत्येक प्रकार हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. आज डाळवांग्यापुरता संबंध म्हणून त्यांच्याबद्दल थोडेसे लिहीले येव्हढेच.
तर वरच्यासारखे मोठे कार्यक्रम म्हणजे आजचे ईव्हेंट झाले की श्रमपरिहार म्हणून डाळवांग्याचा बेत ठरवला जाई. मोठमोठया कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्यांना येव्हढेसे नियोजन काहीच वाटत नसावे.
कोठेही प्रसिद्धी नसे. नोटीस सुद्धा लागायची नाही. रोज भेटणारे लोक. रात्री डाळवांगे आहे येव्हढा निरोप पुरेसा असे.
रोजचा व्यायाम खेळ संपल्यानंतर मुले , मुली, लहान , मोठे सगळे घरी जात व परत डब्यातुन पोळ्या, भाक-या जे काही असेल ते घेऊन येत.
ग्राऊंडवर माती ऊडू नये म्हणून पिणी मारलेले असे. लाईट लावलेले असत. पालपट्या घातलेल्या असत. प्रथम लहानमुले, नंतर मध्यम, शेवटी मोठे, स्वयंसेवक , डाळवांगे करणारे असे बसत.
डाळवांगे करणारे सुद्धा परंपरागत असत. कोंडीबा मास्तर हे सर्वात जुने असावेत. रामभाऊ काशीकर (कार्यालयवाले) , घोलकर , भालचंद्र काशीकर असे बरेच. प्रत्येकाची पद्धत तशीच असली तरी हाताच्या चवीप्रमाणे बदल होत.
पदार्थ तेच परंतु स्थानमहात्म असतेच . मोठ्या चुलींवर मोठ्ठी पातेली ठेवत. डाळ शिजवून , भरपूर वांगी, कांदे, लसूण, आल्ले, मसाले परतत. त्यांचा घमघमाट दूरवर पसरत असे. नंतर डाळवांगे शिजायला लावत. तीन चार तासांनंतर ते मिश्रण असेकाही तयार होत असे की विचारायची सोय नाही.
मध्यम तिखट, सुंदर मसालेदार चव, थोडासा गूळ बस्स . बाकी काही लागायचे नाही. थोडे पोळी भाकरीबरोबर खाऊन मग सरळ डब्यात घेऊन डबे तोंडाला लाऊन प्यायची पद्धत. कोणाकोणाच्या नाका तोंडातून पाणी वगैरे येते. ते आडव्या हाताने पुसून कार्यक्रम सुरु.
मुले गेल्यानंतर मागच्यांना थोडेफार रहात असे. मग पांडू आण्णांच्या बेकरीतून पाव आणायचे आणी कार्यक्रमाची चर्चा करत जेवण आवरायचे.
थोड्याशा तयारीत, कमीतकमी पैशात प्रचंड आनंद देणारे ते क्षण असतात. परत पुढे कधी होईल असे वाटायला लावणारे. घरात , अगदी फाईव्ह स्टार , सेव्हन स्टार हाॕटेलात जेवण होईल पण कितीही किंमत दिली तरी डाळवांग्याची सर येणे नाही.

Comments