नवलाई.........................................
नवे वर्ष सुरु झाले. लोकांनी नव्या" वर्षाचे , संकल्प मांडायला, सुरु करायला, हळूच मोडायला सुरुवातही केली. आपण काय करावे नवे हे काही ठरता ठरेना.
रोज, अधूनमधून काही ना काही लिहीण्याचा छंदच इतका आनंद देईल असे कधीच वाटले नव्हते. खरे म्हणजे यासाठी हे फेसबुक , वाॕट्सअॕपचे, सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या टिमचे आभारच मानायला हवेत.
हे थोडेसे नाटकाच्या प्रयोगासारखे आहे. पसंत पडले की ताबडतोब प्रतीसाद. जरा इकडेतिकडे झाले की तेही कळून येते. बरे खर्च शून्य .
पुस्तके काढायची म्हटले तर केव्हढा प्रपंच करावा लागतो. बरे नविन लिहीणारे मग खर्च करावा लागतो. बरे तोही केला, आले नविन पुस्तकांचे गठ्ठे छापून तर त्यांचे करायचे काय?
असो. आजचा विषय तो नाहीच. विषय आहे नवलाई. प्रत्येक माणसाला असणारी नुतनतेची आवड.
तशी आपल्यापैकी प्रत्येकाला काही जुन्या वस्तूंची , वास्तूंची, माणसांची, ठिकाणांची, आठवणींचीसुद्धा आवड असते. अधूनमधून तशा वस्तू वगैरे दिसल्या कसे छान वाटते.
परंतु या जुन्याच्या आवडीपेक्षा नव्याची आवड वेगळी व खासच असते. छोट्या बाळापासुन म्हाताऱ्यांपर्येंत नवीन गोष्ट आवडत नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही.
अर्थात काही जणांना नविन काही घेतले तरी लगेच न वापरता जपून ठेऊन सावकाश कधीतरी वापरायला काढायला आवडते. ते अपवाद सोडू. तरी त्यांनाही प्रथम नविन वस्तू घ्यायला आवडतातच.
लहान सहान वस्तू नविन घेतल्याचा आनंदही तेव्हढाच म्हणजे थोडाच टिकतो. एखादी पेन्सिल किंवा रबर घेतल्याचा आनंद काही मिनीटेच टिकत असेल.
पुर्वी बाॕलपेनचे रिफील, स्लीपरचे पट्टेसुद्धा बदलून मिळत. त्यांचा आनंद केव्हढा हे आठवावेच लागेल.
काही कारणांनी,एखाद्याला एखादी लहान वस्तुसुद्धा कित्येक दिवस, महिने , वर्षे मिळाली नसेल तर ती वस्तू मिळाल्या नंतरचा आनंद अगदी गगनात मावणार नाही इतका असतो. तो काही काळ.
नविन वस्तूची आपण केलेली प्रतीक्षा, ती मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न हे जितके जास्त तितका आनंद मोठा असतो.
वस्तूचे दर्शन , तीचा चमकदार रंग, सुरेख स्पर्श , ती प्रत्यक्ष वापरण्याचा आनंद , अभिमान भरपूर काही देऊन जातो.
असा आनंद स्वतःच्या घरातल्या वस्तूच देतात असे नाही. आपण रोज वापरत असलेला रस्ता जरी नवा केला तरी त्यावरुन वेगाने गाडी नेण्याचा आनंद और असतो.
आपल्या मोठमोठया प्राप्त्या मोठे आनंद देतात. हळूहळू तो कमी होत जातो. वस्तू , वास्तू रोजची होते मग आणखी काही नविनचा शोध सुरु होते. माणसे भेटल्यावर "मग काय म्हणता? आणखी काय नवीन ? " असेच विचारतात.
शाळेतील शिक्षकांना असे काही वैचारिक बोलायची फार सवय असते. " मुलांनो, वेळेला फार महत्त्व आहे. देव रोज तुम्हाला हे घे ,चोवीस तास म्हणतो. ते नीट वापरा. एकदा गेलेला क्षण परत कधीच मिळत नाही." वगैरे वगैरे.
पण मुले कसली तयार. ती म्हणतात. "अहो जाऊ देत आजचे चोवीस तास. ऊद्या परत नविन चोवीस तास मिळणारच आहेत. "
अर्थात असे म्हणून अभ्यासाकडे फार दुर्लक्ष करणाऱ्यांना त्याचे फळ मिळतेच.
या सर्व बाबीत आपले प्रत्येक नविन दिवसाकडे, नविन क्षणांकडे ,क्षणभरसुद्धा लक्ष जात नसते. दिवस, महिने ऋतू बदलतात. प्रत्येकाचे रुप वेगळे , स्वतंत्र असते. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन म्हणतो की नवे वर्ष आले.
प्रत्येक नविन क्षण, दिवस नवाच असतो. त्या स्लो फोटोग्राफीसारखे ते पाहिले तर त्यातली गती जाणवेल. कोणी म्हणतात आपल्या शरीरातील पेशी रोज बदलतात. काही दिवसांनी आपण पूर्ण नविन तयार होतो वगैरे.
जाऊ देत त्या मोठ्यांच्या गोष्टी . आपण नविनपणाचा आनंद आपल्याला जमेल तसा , वस्तू वगैरे घेऊन किंवा सृष्टीतल्या नाविन्यांचा आस्वाद घेऊन साजरा करत राहू. तीच नवलाई.
Comments
Post a Comment