फ ,फ , फजितीचा .....................
फजिती, फसगत आणि फसवणूक हे तिन्ही सारखे शब्द वाटले तरी ते तसे नाहीत. त्यांच्या अर्थात आणि परीणामात फरक आहे.
फजिती ही स्वतःच्या चूकीच्या कृतीमुळे झालेली मजेशीर गोष्ट असते. तीला अन्य कोणी जबाबदार नसते. तीचे परीणामही फारसे चिंताजनक नसतात. जास्तीत जास्त जरा चार लोकांत आपले हसे होते येव्हढच.
" हे दिसतात त्यापेक्षा जरा जास्तच .... दिसतात " असे विचार कोणाच्या तोंडात किंवा मनात येतील येव्हढेच.
फसगतीमध्ये मजेपेक्षा जरा करुणा जास्त दिसते. कोणावर अती विश्वास ठेवावा आणि त्याने त्याचा गैरफायदा घ्यावा असा प्रकार असतो. लग्नाच्या बाजारात वगैरे फसगतीचा प्रकार दिसून येतो. चांगला डाॕक्टर, भरपूर प्राॕपर्टी आहे, म्हणून लग्न करुन द्यावे पण तो जनावरांचा डाॕक्टर निघावा, प्राॕपर्टी दुसऱ्याचीच असावी असे प्रकार त्यात मोडतात.
फसवणूक हा प्रकार जरा जास्त गंभीर आहे. त्याची व्याप्ती केव्हढीही व कितीही वाईट असू शकते. ती शक्यतो दूसरा माणूस जाणूनबुजून करतो. एखाद्याच्या व्यक्तीत्वाचा गैरफायदा घेवूनच.
फजितीचे तसे काही नसते. ति-हाईताच्या नजरेतुन " तुम्ही नीट कसे पाहून, वाचून घेतले नाही ?" असे प्रश्न आपण सहज विचारतो पण स्वतः त्या परिस्थितीत वेगळे वागलो असतो का याचा विचार करत नाही.
काही काही लोकांच्या बाबतीत मात्र असे प्रकार चुकूनच होतात. त्यांना व्यवहारी म्हणतात. माझा मुलगाही मला " तुम्ही जागरुक ग्राहक नाही म्हणतो. " बाजारात इकडेतिकडे नोटा घेताना तो प्रथम नोटा उलट्या करतो. तेंव्हा फाटलेल्या, चिकटवलेल्या नोट्या सहज समजतात म्हणतो. त्या परत देवून गोड शब्दात " काका ही नोट जरा दुसरी द्या " म्हणतो. काकाला नोट कसली आहे माहितीच असते. तो गप्प नोट बदलून देतो.
मला मात्र काही म्हणजे ब-याच वेळा फाटक्या , चिकटवलेल्या नोटा घेऊन त्यांचे काय करावे हा विचार पडतो. तो या ना त्या मार्गाने खपवत बसाव्या लागतात.
एकदा आमचे एक मोठ्ठे साहेब येणार होते. आमच्याबरोबरच्या कोणीच त्यांना पाहिले नव्हते.त्यांच्या स्वागतासाठी चांगला मोठा हार घेतला होता.
गाड्या आल्या. एक साहेब बाहेर पडले. एका साहेबांनी चटकन त्यांच्या गळ्यात हार घातला. नमस्कार केला. ते म्हणाले " अबे शाने ! मुझको पहचानता नही क्या? वो बडे साब पिछली गाडीमें है! ये ले हार!" ही फजिती. त्या साहेबांसकट ड्रायव्हरसकट सगळे हसत सुटले.
रात्रीची गाडी पाहिजे . काढ तिकीट . पाठवले कोणालातरी . आले तिकीट. साडेबाराची गाडी. गेलो स्टेशनवर . तर गाडी कालच गेलेली. मग झटकन साधे तिकीट काढले. मिळेल जागा तसा प्रवास केला.
नवीन मोबाईल घेतलेला. त्याचे काही माहिती नव्हते. चार्जींग संपले. दुकानात बोर्ड असतात. " येथे मोबाईल चार्जींग भरुन मिळेल. " वाटले इथे चार्जींग करुन मिळेल. विचारले तर म्हणाला " अहो इकडे चार्जींग पॕक भरुन मिळतो. चार्जींग करुन नाही. "
मग कोणाकोणाला विचारुन चार्जींग करुन घेतले. चार्जर ही मोबाइलसाठी महत्वाची गोष्ट आहे हा पत्ता लागला.
मग ते डोक्यात ठेवले. पुढच्या वेळी आठवणीने चार्जर घेऊन गेलो पण मोबाइलच विसरलो. तो चार्जर कोणाला चार्जींगला द्यायला उपयोगी पडला.
मुंबईत फॕशन स्ट्रीटवर अशा वस्तू घेतल्या जातात. त्या जागेवर चालवून पाहता येत नाहीत. घरी पाहता चालत नाहीत. दुसरे दिवशी दुकान सापडत नाही. सापडले तर दुसराच कोणी तेथे बसलेला दिसतो. यात नुकसान फारसे नसते. सगळयांची करमणूक मात्र फार होते.
कार्यक्रमाला तारीख, वेळ जागा नीट न पाहता गेल्यामुळे जरा फेरफटका होतो येव्हढेच.
एका गावी आम्ही बाहेरचे ओढायचे गेट नुसतेच बंद करत असू. एकदा नेहमीप्रमाणे लवकर उठलो. पाहतो तर एक मुलगा आत येऊन झोपला होता. त्याला उठवले. "कोण तू. इथे कशाला आलास ?" असे विचारले. तो काही अगम्य भाषेत बोलला. निघुन गेला.
घरातले सगळे उठल्यावर त्यांना पराक्रम सांगीतला. मुलगा म्हणाला " बाबा माझे पांढरे बूट दिसत नाहीत. तो मुलगाच घेऊन गेला असणार. " पराक्रम राहिला बाजूला. मुलाला दुसरे बूट आणि गेटला कुलूप आणावे लागले.
आपण हौसेने आणले ले कपडे माप रंग न आवडल्याने , ब्रेंडेड नसल्याने तशाच पडून राहणे वगैरे यातलेच प्रकार असतात.
दरवेळी वेगळेवेगळ्या फजित्या होत असल्यामुळे उलट जास्ती मजा येत राहते आणि सगळ्यांना हसायला कारण. दुस-यांना हसण्यापेक्षा अशा स्वतःच्या फजित्यांवर हसणे बरे म्हणून मी ते सोडून देतो येव्हढेच.
Comments
Post a Comment