पोहणे..........................................

 मार्च महिना चालू झाला की भारद्वाजाचे स्वर परिक्षेची आठवण करुन देतात. शिकवलेले या ना त्या त-हेने लक्षात ठेवायचे आणि परीक्षारुपी देवीला अर्पण करायचे मग ती काय प्रसाद देते याची जुनपर्येंत वाट पहायची येव्हढेच हाती असते. त्याची फारशी चिंता नसते.

परिक्षा संपली की मात्र उन्हाच्या झळा दिवसभर असल्या तरी सकाळी एकदा थंडगार पोहणे झालेले असले की कसे छान वाटते.
एक अंडरपंँट टाॕवेलात गुंडाळून काखेत मारली की झाली तयारी. बाकी वेगळा काॕस्चुम असले प्रकार गावात लागत नाहीत. सगळी करमणूक फुकट आणि बहुतांशी घराबाहेरच.
जाताना कोणा मित्रांची घरे जवळ असली तर "ए ऊठलास का XXX ? चल , " म्हणत जायचे. गावाच्या जवळच्या विहीरींवर पोहायला जायचे. सात वाजल्यापासुन आडेआठ नऊ वाजेपर्येंत कार्यक्रम चालतो.
पोहण्याचे प्रकार , शास्त्र वगैरे काही नाही. सरळ हात पाय मारायचे. दगडी बांधकामाची मस्त मोठी विहीर . वर मोटर सुरु असते. पाण्याचा मोठ्ठाच्या मोठा फवारा पडत असतो. तेथे कोणी कपडे धुवत असते. ते पाणी फिरुन पिकांना जात असते.
पट्टीचे पोहणारे कपडे वर ठेवून , मोटेवरुन (कधीकाळी वर मोट असे म्हणून ते नाव) उडी, सूर किंवा गठ्ठा मारुनच पाण्यात प्रवेश करतात.
बॕकस्ट्रोक, तोंड पाण्यात ठेवून हात मारणे वगैरे प्रकार कोणीतरी चुकून करतो. गठ्ठा मारल्यावर पाणी किती उंच उडते ते पहायचे. दरवेळी "कसला गठ्ठा मारलाय. मस्त. " तर कधी " गठ्ठा बसला नाही. पचकला."त्याला फुस्स गठ्ठा म्हणायचे. जेथुन गठ्ठा मारला तेथपर्येंत पाणी उडाले तर शंभर मार्क असे गणित आहे.
कितीही उंचीवरुन गठ्ठा मारताना प्रथम साधी उडीच मारतात. पाणी अगदी चार फुटांच्या आत आले एका पायाचे पाउल दुसऱ्या पायाच्या गुढघ्याच्या मागे लावायचे, तो पायही आडवा करायचा. पाठ जरा तिरकी करायची. मग आवाज करुन अंगाच्या बाजुने पाणी आवाज करत वर जाते. त्याचे नाव गठ्ठा.
हे जरा चुकले म्हणजे खूप आधीच मांडी घातली गेली आणि पाठ सरळ राहिली तर पाठ पाण्याने शेकुन लाल होते. गठ्ठा मारलेला लागलेले कळू नये म्हणून बराच वेळ बुडून हळूच बाहेर येतो. बाहेरच्यांनी ते पाहिलेले , ऐकलेले असते. ते मात्र " कसला भारी गठ्ठा मारलास. लागले नाही ना? " असे मुद्दाम विचारतात.
"बाबा तुम्ही आम्हाला अगदी बेसीक पोहायला शिकवलेत. खरे प्रकार आम्ही टँकवरच शिकलो. " असे आमची मुले म्हणतात. म्हणोत बिचारी. मला मात्र असेच पोहायला येते.
तरीही मी व माझ्या मित्रांनी कित्येक मुलांना पोहायला शिकवले. हे सर्व खेळाडूंचे निरोगी नाद आहेत. एका मुलाला प्रश्न विचारायची फार हौस. ए कुठल्या विहिरीला चाललाय? पाणी किती आहे? असले प्रश्न विचारत बसायचा. त्याला क्वश्चनकुमार असेच नाव ठेवले होते. त्याच्या प्रश्नांना कोणी उत्तरे देत बसत नसे. "चल आमच्याबरोबर, म्हणजे सगळे कळेल बघ" म्हणायचे.
विहीरीवर कितीही गर्दी झाली तरी कोणाचीही तक्रार नसते. तिथे वय, काम, मुले , मुली कसलाही भेद नसतो. पोहायला येणारे आणि न येणारे हे दोनच भेद. "ओ काका, जरा हात द्या की, " असे कोणी नवशिका म्हणत असतो. त्याचा दम अगदी काठ दोन फुटावर दिसत असत असता संपत आलेला असतो. " "काही हात देऊ नका. तो नाटक करतोय. " असे आणखी कोणी म्हणत असतो. काय करावे ठरेपर्येंत नवशिका कसाबसा काठाला येऊन धापा टाकत असतो. हळूहळू दम वाढल्यावर मजेत पोहायला शिकतो.
पोहायला शिकवण्याचे डायरेक्ट आणि सपोर्टेड असे साधे प्रकार असतात. डायरेक्ट म्हणजे उचलायचे आणि पाण्यात टाकून द्यायचे. काहीजण याचा धसका घेऊन पोहण्याचा विचारच सोडून देतात.
दुसऱ्या सोप्या पद्धतीत पांगारीच्या हलक्या पांढऱ्या लाकडांचा बिंडा, किंवा सील केलेला डालडाचा गोल डबा पाठीला बांधायचा. हळूहळू पोहण्याचे तंत्र जमले की बिंड्यातील लाकडे कमी करायची, डबा सोडायचा. अशा प्रकाराने शिकण्यास वेळ लागला तरी भिती वाटत नाही. आता काहीजण ट्यूब किंवा फ्लोटर वापरतात.
एकदा तीस, पस्तीस वर्षांच्या दोन डाॕक्टर स्त्रियांना एका दिवसात पोहायला शिकवण्याचे चॕलेंज आले . त्यांना प्रथमच तुम्ही घाबरणार नसाल तर एका दिवसात निश्चित शिकवतो सांगितले .
ते पहायला विहीरीवर जरा जास्तच गर्दी झाली होती. दोघी होत्या मात्र बिंन्धास्त. काही सपोर्ट वापरणे शक्यच नव्हते. त्यांना प्रथम हात पाय कसे मारतात ते सांगितले . करुन दाखवले. काठावर बसून करुन घेतले. थोडेसे धरल्यावर त्यांना तंत्र समजले. आणि काय आश्चर्य . दोघीही एका तासात प्रथम जरासे घाबरत व नंतर व्यवस्थीत पोहायला लागल्या.
तेंव्हा मात्र सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले. पोहायला आल्यावर मारुतीला नारळ फोडायचा कार्यक्रमसुद्धा लगेच पार पाडला.
याउलट एखाद्याने भिती घेतली असेल तर त्याला शिकायला थोडा वेळ लागू शकतो.
पाण्यात पाठीवर झोपून राहण्यास तर प्रचंड मजा येते.ते तंत्र शिकावे लागते. सगळीकडे थंडगार पाणी, वर निळे आकाश , मनातले विचार आपोआप विरुन जातात. छान झोप लागल्यासारखे वाटते. कित्ती वेळ गेला तेसुद्धा समजत नाही.
मुलांचा दंगा वाढला की विहिरीचे मालक वैतागतात. कधी वरुन शेण मारतात. असले तर कुलूप घालतात. मग मुले वरुन उड्या मारतात , कोणी आलेच तर हळूच बाहेर पडून पळून जातात.
पोहण्यात सगळेजण इतके गुंग होतात की विचारता सोय नसते. कोणी व्यवस्थीतपणे फेऱ्या वगैरे मारतात आणि सरळ बाहेर पडतात. तर काही नुसताच दंगा करतात.
विहिरीत खेळायचे आणखीही खेळ असतात. जास्तीत जास्त वेळ पाण्याखाली राहणे.फुटक्या बशीच्या काचांचे तुकडे पाण्यात टाकणे, ते पाण्यात बुडून बाहेर काढणे. पकडा पकडी, पाण्यात आसने करणे, हँड बाॕल असे.
एक मुलगा रात्री सगळ्यांबरोबर पत्र्यावर झोपला होता. रात्री झोपेतच जागा होऊन पत्र्याच्या कडेला जाऊन " ए बाजुला सरका, मी उडी मारतोय ." असे म्हणून विहिर समजून उडी मारायच्या तयारीत होता. कोणीतरी जागे झाले म्हणून वाचला.
नदीत पोहणे जरा वेगळे असते. आता वाहणाऱ्या नद्याच नसतात, त्यामुळे त्यासुद्धा विहिरीच झाल्या आहेत. लांबून पलीकडचा काठ अगदी जवळ वाटत असतो. आत गेल्यावर मात्र काठ गाठता गाठता चांगला दम लागत असतो. पुरात पोहणे, मोठा प्रवाह, वाहणाऱ्या वस्तू , साप वगैरेंमुळे थरारक असते.
समुद्रात किना-यावरुन पोहायला , न शिकलेल्यालासुद्धा जमते. भरतीच्या वेळेस लाटा पाठीवर घेण्यात तर प्रचंड मजा येते. कितीही दमून गेलो, तरी तो खेळ संपूनच नये असे वाटते.
या मजा टँकमध्ये तासाला पैसे देऊन काय येणार? दुसरी सोय नसते म्हणून शहरांत तेच करावे लागते. तेथे आधी शाॕवर, नंतर शाॕवर, चेंजींग रुम्स असले काही असते.
एका मित्राला नेव्हीचा काॕल आला होता. पहिल्या परिक्षा झाल्यानंतर पोहायला सोडले. थोडे बुडून दाखवा म्हणाले. थोड्या वेळात सगळे बाहेर आले. "अरे वो चार नंबरवाला कहाँ गया? डायव्हर्स को बुलाओ! " म्हणाल्यावर हा सावकाश बाहेर आला. जरा ओरडा बसला खरा, पण सिलेक्शन झाले हे सांगायलाच नको.
लोक भाषणांमधुन भवसागर वगैरे पार करायच्या गोष्टी करतात. त्यांना जरा ह्या ख-या आणि खा-या सागरात पोहायला लावायला पाहिजे, म्हणजे जरा गप्पा कमी होतील. पाण्यात जरा हात पाय मारले की छान अंग सैल पडते. पोहून परत येताना , जरा निसर्ग पहावा, झाडांच्या खोडांतला डिंक नखाने काढून खात यावे. परत येऊन नाष्टा करुन झोपावे . दुपारी पत्त्यांचा डाव रंगवावा. अशा सुट्या भोगल्या की नंतर येणाऱ्या वर्षाची मजा जास्त वाटत असे.

Comments