पिठले....................................
पिठले हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. थोडे तेल, तिखट मीठ पाणी आणि पीठ यापलीकडे त्याला काही लागत नाही. फास्ट फुडचा जमाना आहे म्हणतात त्यापेक्षा कितीतरी आधीपासुन हा पदार्थ महाराष्ट्रात प्रचलीत आहे.
एक दोन भाकरी आणि थोडे पिठले करायला मोजून आठ दहा मिनीटेच लागत असतील. स्वस्त आणि मस्त. पण तेवढे साधे सोपे, स्वस्त आणि मस्त कोणाला नकोच आहे तो भाग वेगळा.
मला खूपदा वाटते आपण महाराष्ट्रीय लोक भांडणे करण्यात , जोराने बोलण्यात जेव्हढे तरबेज आहोत त्यापेक्षा थोडेतरी मार्केटींग करण्यात, व्यवसाय करण्यात, पैसे मिळवण्यात तरबेज असतो तर केव्हढे प्रश्न सुटले असते.
दक्षीण भारतीयांनी ईडली डोसा जगभर नेला. अगदी भारताच्या कोणत्याही कोप-यात नाष्ट्याला ईडली डोसा चालतो, मिळतो. पंजाबी रोट्या , नान, पराठा वगैरेही कोठेही मिळतात. पण पिठले भाकरी तेव्हढी लोकप्रिय नाही कारण आपल्याला ती लागते , आवडते पण मिळत नाही. कारण आपणच ती दूरवर नेली नाही.
असो. पिठले करण्यास शक्यतो हरभ-याच्या डाळीचे पीठ म्हणजे बेसन लागते. कोकणात कुळथ्याची पिठी म्हणजे घट्ट पिठले करतात. तेही लसुण व व्यवस्थीत मीठ असेल तर छान लागते.
कालचीच गोष्ट. मी घरात एकटाच. मेघना पुण्याला गेलेली. थोडी भाकरी शिल्लक . एका मिटींगला जाऊन आलेलो. रात्रीचे साडेनऊ वाजलेले. आता काय थोडेसे पिठले ढवळले की काम झाले असा विचार केला.
एका पातेल्यात भात लावला. कांदा, टोमॕटो, मिरची चिरली. थोडे आल्ले घेतले . फोडणी केली. कांदा, टोमॕटो परतला. पाणी घातले. उकळी आणली. झाले आता बेसन घालून ढवळले की पिठले तयार की जेवण खल्लास.
नेहमीचा पिठाचा डबा उघडला. तो पूर्ण रिकामा. इकडचे तिकडचे , सर्व डबे उघडले पण एकाही डब्यात पीठसदृश्य काहीही नाही. बरे गॕस बंद करुन दुकानातून आणावे तर दुकाने बंद असणार. आता मागायला कोठे जाणार म्हणून तो विचारही मनातून काढून टाकला.
आता काय करावे. पहिला मोठ्ठा डबा कणकेचा. त्यात कणीक डबाभर शिल्लक. मग विचार आला मराठवाड्याचा. नांदेडकर काकू आपण जसा रव्याचा शिरा करतो तसा कणीक भाजून ऊत्तम शिरा करत. बेसनाचाही शिरा करत. मग जर रव्याच्या म्हणजे गव्हाच्या म्हणजे कणकेच्या जागी बेसन चालत असेल तर बेसनाच्या जागी कणीक का चालू नये? असा तर्क केला.
झाले. ठरले. फोडणीत हळद टाकलेली असतेच. उकळी आलेल्या पाण्यात बेसनासारखी हळूहळू कणीक घातली. थोडी घातल्यावर संशयाने पाहिले तर काहीच वेगळे वाटत नव्हते. बेसनासारख्याच लहान लहान गुठळ्या तयार झाल्या होत्या.
नंतर व्यवस्थीत बेसनाएव्हढीच कणीक घातली. छान शिजवले. नेहमीच्या पिठल्यासारखाच खमंग वास सुटला होता. जेवणारा मी एकटाच त्यामुळे बाकीची म्हणजे कोण काय म्हणेल ? ही भिती नव्हतीच.
छान शिजल्यावर वाढून घेतले. चव तर नेहमीसारखीच. कोणाला समजणारही नाही काय घातले असेल अशी. बरे नुसते गरम असल्यामुळे बरे लागत असेल. चव कळत नसेल म्हणून थोडे थंड करुन खाल्ले. तरीही तीच चव.
मग काय आणखी एका नवीन कृतीचा शोध लागल्याचा आनंद झाला . फोटो तेव्हढा काढायचा राहिला . दुसरे दिवशी मेघनाला फोन केल्यावर सगळी पिठे ती घेऊन गेल्याचे समजले.
अर्थात दुसरे दिवशी दुकान उघडता बेसन आणून ठेवले. परंतु एखादा पदार्थ वेळेवर न मिळाल्यास दुसरे काहीतरी वापरण्याची भारतीय क्लुप्ती म्हणजे जुगाड सापडले ते सगळ्यांनाच सांगावे म्हणून हा पंक्तीप्रपंच.
Comments
Post a Comment