सरकार.......................................

 माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणी निवारा यांची आत्यंतिक गरज असते असे आपण म्हणतो. त्याबरोबर या यादीत मित्र किंवा मैत्रीणी यांचा समावेश असायला हवा असे मला वाटते.

जन्माबरोबर आईवडील , भाऊ , बहिणी , नातेवाईक मिळतातच. मित्रांचे तसे नाही. ते आपोआप मिळत नाहीत. चांगले मित्र मिळवावे लागतात. टिकवावे लागतात.
आमच्या मिरज सांगलीकडे संस्थानीक पटवर्धन असल्यामुळे ,सर्वच पटवर्धन लोकांना मजेने सरकार म्हणण्याची पद्धत आहे. एका पटवर्धनांकडे दाराबाहेर शिपाई आणी आत दारिद्रय अशी परिस्थिती होती असे म्हणतात.
माझा जिवश्च ,कंठश्च मित्र गजानन बाळकृष्ण पटवर्धन ज्याला अनिल या टोपणनावाने सगळे ओळखायचे याचे तसे नव्हते. तो धनाने नसला तरी मनाने, ऋदयाने, वागण्याने, बोलण्याने अखंड सरकारच होता. त्यालाही सगळेजण सरकारच म्हणायचे.
काय केले नाही या बाबाने तेच आठवावे लागेल. अभ्यासातील सामान्यांच्या गतीप्रमाणे फारसे कष्ट न घेता बी.काॕम. झाला. मग तेंव्हाच्या पद्धतीने गांधर्व महाविद्यालयात नोकरी केली . त्याच सुमारास अगदी व्यवस्थित परमीट , बॕच काढून, युनीफाॕर्म घालून रिक्षासुद्धा चालवली. तेंव्हा रिक्षावाल्यांची भाषा बोलली. एका कारखान्यात स्टोअर किपर म्हणून बरेच वर्षे नोकरी केली. नोकरीबरोबर व नंतर नोकरी सोडूनही फाईल तयार करण्याचे मशीन आणून तो धंदा केला. मग शेवटपर्यंत स्क्रॕपचा धंदा केला.
नवीन काहीही सुरु करताना उत्साह भरपूर असायचा. नंतर मात्र जगण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे म्हणून पण प्रामाणिकपणे काम करायचा.
अगदीच काही कारण झाले तर नोकरी, धंदा बदलायचा. एकदा अनिल इंटरव्ह्यूला गेला. एकच उमेदवार. इंटरव्ह्यूचे कारणच नव्हते. एक बँलन्सशीट करुन दाखवायला सांगितले . ह्या पठ्ठ्याने " साहेब, भूक लागली आहे. जेवून येतो." म्हणून परवानगी मिळवली. बॕलन्सशीट शिकून खूप दिवस झालेले. ते येतच नव्हते . मग कोणाला विचारुन का पुस्तक पाहून, परत जाऊन बॕलन्सशीट बरोबर सोडवली. छान नोकरी पटकावली व कित्येक वर्षे केलीसुद्धा. अर्थात नोकरीत बॕलन्सशीटचा संबंधही आला नाही हे वेगळे.
मुद्दा काय की काहीही करुन प्रसंग पार पाडायचा. नाही म्हणायचे नाही. गांधर्व महाविद्यालयात असता एक शिपाई होते. चांगले वयाने पस्तीस चाळीस वर्षांचे असतील. मग त्यांना आॕफीस बाॕय कसे म्हणायचे म्हणून अनिलने त्यांचे आॕफीस मॕन असे नामकरण केले होते.
परिक्षांसाठी , संगीत परिषदांसाठी त्याला तेंव्हा अचानक कोठेही म्हणजे उद्या भोपाळला जा, आल्यावर कलकत्याला जा असे करावे लागे. तेंव्हा तो प्रवासाचे कपडे वगैरे भरलेली एक बॕग तयारच ठेवत असे.
तेंव्हा हँड वाॕश इतके वापरात नव्हते. एकदा दिल्लीला गेले असता अनिल व सहकारी हाॕटेलात उतरले. सकाळी आवरुन बाहेर पडताना बेसीनजवळ आरसा व हँड वाॕश पाहून ह्यांना ते तेलच वाटले. लावले डोक्यावर चोळून चोळून. बाहेर फिरताना पाऊस आला . थोड्याच वेळात तोंडांवर फेस येऊ लागला. तेंव्हा हे तेल नव्हे साबणाचे काही असावे हा साक्षात्कार झाला आणी ह्यांची फेस पुसता पुसता फजिती झाली.
एकदा एका हाॕटेलात अनिल जेवायला गेला असता भाजीत मीठ कमी होते. त्याने ते मागून घेतले. बील देताना मॕनेजर म्हणाले," येव्हढे काय त्यात? घरी नाही का कधी कमी जास्त होत ?" अनिल लगेच म्हणाला," घरी कमी जास्त होते की पण जेवण झाल्यावर बील पूढे येत नाही हो" मॕनेजर आपले खजील होऊन गप्प झाले.
कशी झाली ओळख सरकारांशी. कल्चरल मुव्हमेंट ही आमची संस्था नवीन होती. एकांकिका व काही कार्यक्रम करायचे होते. नाटक , बालनाट्य , माहिती होते पण एकांकिका म्हणजे काय हे कोणाला माहिती होते? मग कोणी सांगितले एकच अंक, त्यात काही प्रवेश. मग बरे आहे म्हणालो. कलाकारांचा शोध." तो एक सरकार सगळ्याला तयार असतो. त्याच्याकडे जावा" असे कोणी म्हणाले.म्हणून त्याचेकडे प्रथम गेलो असेन.
अनिल त्यांच्या आईबरोबर रहायचा. एक बहिण गावात तर दुसरी उगारला दिलेली होती. भाऊ पुण्याला. सारवलेले घर होते. पुढे अंगण ,एक पायरी चढून आडवा सोपा की ओसरी, मागे अंधारे माजघर, त्यात मोठा देव्हारा मागे स्वयंपाकघर , त्यामागे थोडे अंगण त्यात एक झाड वर दोन माड्या असे त्याचे घर होते.
जसेजसे आपण माणसांच्या घरात बाहेरून आत आत जाऊ लागतो, बोलू लागतो तसेतसे त्यांच्या अंतरंगात डोकावायला येते असे मला वाटते . आईला अनिल ईन्नी म्हणायचा. ती जायची शाळेत गाणी शिकवायला. त्यामुळे अनिलला पेटी वाजवायला , तबला वाजवायला , गाणे म्हणायला आपोआपच येत असे.
रोज रात्री जेवण झाल्यावर अनिलकडे जायचे आणी गप्पा मारायच्या, गाणी ऐकायची हा ऊद्योग बरेच वर्षे पुरला. त्याच्या दारात एका जुन्या वठलेल्या झाडाची मोठी फांदी टाकलेली होती. ती रोज थोडी थोडी तोडून थंडीच्या दिवसात शेकोटी करायचो. येणारे जाणारे थांबायचे. अशाच गप्पात मग नाटक, संस्थेचे कार्यक्रम सगळे ठरायचे. खिशात काहीही नसताना मोठेमोठे कार्यक्रम छान पार पाडायचो. त्यामुळे आता कार्यक्रमांसाठी लाखांची आणी कोटींची बजेट लागतात हे ऐकले की हसायला येते.
अनिलला कोणतेही काम सांगा , तो ते करु शके. मासिकात लेख लिहीणे, वक्ता ठरवणे, मानधन ठरवणे, प्रवास नियोजन, नाटक एकांकिकेत काम, कोठेही तो शोभून दिसत असे.
एका एकांकिकेत ऊपोषणाला बसलेल्या मंडळीतुन आई आजारी आहे म्हणून "आई. " असा हंबरडा फोडून , खोटेच कारण काढून तो पळून जातो असा सीन. अनीलने असा हंबरडा फोडला की कितीतरी जण नंतर भेटुन " कसल अॕक्टिंग केलय राव. नंबर मारणार हा." असे सांगून गेले.
सव्वापाच फूट ऊंची, बारिक मिशी, साधा चपटा भांग, कायम पिवळ्या किंवा पिवळसर रंगाचे बारीक रेघा किंवा डिझाईनचे शर्ट , पँट असा अनिल त्याच्या एम. फिफ्टी. व नंतर मोटार सायकलवर जात असे.
रोज सकाळी आवरल्यानंतर देवपूजा केल्यावर गुरुचरीत्र वाचायचा. म्हणजे काय तर पोथी उघडायचा आणी मिटायचा. " का रे झाले येव्हढ्यात?" म्हटल्यावर " हो झाल्या की पाच ओव्या. " म्हणायचा. तरी अशी गुरुचरीत्राची कित्येक पारायणे झाली म्हणायचा.
कोणताही माणूस कितीही संतापलेला असो. अनिल त्याला शांत करु शके. " काय दादा, तुमचे बरोबरच आहे. " अशी सुरुवात. मग त्याचे ऐकून घ्यायचा पण शेवटी आपले कामही ऊरकुन घ्यायचा.
ईन्नीच्या हातचे भरलेला दोडक्यासारखे खास पदार्थ ब-याचवेळा खाल्ले. आनिलच्या भावाचे लग्न झाले. अनिलचे लग्न झाले. एक मुलगा, मुलगी झाले. त्यांचीसुद्धा लग्ने झाली. वाडा पाडून घर बांधले.
अधूनमधून तो भेटत असे. एकदा कोणीतरी सरकारला कँन्सर झाला सांगितले . मी चकितच झालो. भेटायला गेलो. तर महाराज हसत हसत मला आजाराची कहाणी सांगत बसला. आतअनंत दुखः, वेदना असल्या तरी वर त्याचा मागमूससुद्धा नव्हता.
आणी एकदा अचानक सरकार गेल्याचे समजले. सगळे गाव हळहळले. कारण जाईल तिकडे याचे मित्र, ओळखीचे , स्नेही पसरलेले. हक्काने त्याच्याकडून कामे करुन घेणारे. देवाला सुद्धा सगळ्या क्षेत्रातली चांगली माणसे लागतात ना? तसाच एखादा मध्यस्थ कमी पडला असेल नाही का?

Comments