विपश्यना.........................................
दोन हजार वीस साली विपश्यना वर्ग करण्याची संधी मला मिळाली. कोठेही योग, ध्यान, कुंडलिनी संबंधी काहीही भाषण, वर्ग असला की तिकडे पळायला मला फार आवडत असे.
सगळ्यातुन काही ना काही प्राप्ती , नवी माहिती मिळत असतेच. लोकांकडून विपश्यना शिबीरांबद्दल ऐकले होते. तेथे एकमेकांशी दहा दिवस अजिबात बोलायचे नसते. तासंतास ध्यान आणि ध्यानच असते. वर्गात प्रवेश सहज मिळत नाही. कितीतरी आधीपासुन बुकींग करावे लागते वगैरे.
असे बोलणे होत असता, कोणाकडुनतरी तो छोटासा फाॕर्म मिळालासुद्धा. नेहमीसारखे नाव, गाव, वय, पत्ता, अटी पाळायला तयार आहात का? अशा विचारणा.
फाॕर्म भरुन पाठवून दिला. काही दिवसांनी पुढील एका वर्गासाठी नंबर लागल्याचे पत्र आले. फार भारी वाटले. शिबीर तमदलगे येथे हातकणंगल्याजवळ भरत असते.
एस.टी.ने हातकणंगल्याला ऊतरलो. चार पाच वाजेपर्येंत पोचायचे होते. रिक्षावाल्याला विचारले. त्याला ते ठिकाण माहिती होते. प्रथम जरा डांबरी रस्ता नंतर डोंगराळ भागात असतो तसा छोटा रस्ता होता. वातावरण तर छान होते. फिरत फिरत अखेर शिबीराच्या जागी पोचलो. काही लोक आले होते. काही येत होते. पुन्हा नाव नोंदणी झाली.
एका छोट्या मंडपातुन पुढे प्रवेश होता. पेन , पेन्सिल , रेडिओ , मोबाईल (तेंव्हा ते फार नव्हते) जमा करावयाचे होते. दोघा दोघांत एक खोली दिलेली होती. अर्थात तीचा वापर झोपण्यापुरताच असे.
संध्याकाळी जरा एकमेकांशी बोलल्यानंतर नववे दिवशी संध्याकाळपर्येंत एकमेकांशी कोणत्याही त-हेने संपर्क करायचा नाही. यालाच आर्य मौन म्हणतात.
पद्धतीबाबत शंका असतील तर तेव्हढ्यापुरते मार्गदर्शकांना रात्री आठ ते साडेआठ या वेळेतच विचारु शकता असे सांगितले गेले. होणार नाही असे वाटेल त्यांना परतायची संधी होती.ती कोणी घेतली नाही.
दुसरे दिवशी सकाळपासून शिबीर सुरु होते. मार्गदर्शक बसलेले असले तरी सर्व शिक्षण आचार्य सत्यनारायण गोएंकाजी यांच्या आॕडीओ, व्हिडीओ टेप्स (आता पेन ड्राईव्ह असतील) च्या माध्यमातून चालते.
गोएंकाजी त्यांच्या धीरगंभीर, खर्जातल्या आवाजात कधी पाली, कधी हिंदी भाषेत श्लोक, कवने म्हणतात. हळूहळू सर्वांना समजेल अशा भाषेत विपश्यनेच्या सुरुवातीपासुन म्हणजे गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी विपश्यना कशी शोधून काढली, तीचा प्रसार कसा झाला, ती थायलंडमध्ये गेली व गोएंकाजी भारतात आल्यावर ती इकडे आली.उ.बा. खीन यांच्याकडून ते ती कशी शिकले येथपासून सुरुवात करतात.
रोज वेगवेगळे सांगणे असते. कधी गोष्टी सांगतात. पण मुख्य म्हणजे विपश्यना व्रतासारखी प्रत्येकाने रोज किमान एक तास आचरली पाहिजे हे कळकळीने शेवटपर्येंत सांगतात. या आजोबांना येव्हढी देणगी द्या म्हणतात. धर्माचे स्वरुप, गुणसंवर्धन सगळे सांगतात.
विपश्यना म्हणजे विशेषत्वाने पाहणे. शरीरातील पेशी बदलत असतात. विचारानुरुप संवेदना शरीरात उमटत असतात. संवेदना स्थुल व सुक्ष्म असतात. त्या राग आणि विराग , मोह यांचे स्वरुप असतात. त्या जाणवणे जमल्यास त्यांच्याकडे लक्ष, दुर्लक्ष , करता येते. त्याने तुम्ही अंतर्बाह्य बदलता म्हणजे शुद्ध होता. आपण जगात वावरतो त्यामुळे नवनवे संस्कार रोज तयार होतात म्हणून अखंड साधना हवी असते असे ते तत्वज्ञान आहे.
आता ते साधावे कसे याचा तो मार्ग आहे. दहा दिवसाच्या शिबीरात रोज बारा तास विपश्यना ध्यान करावयाचे असते.
एखाद्याला प्रश्न पडेल इतके तास ध्यान जमते कसे? तर ते शिकवतात. हा प्रकार "डू इट युअरसेल्फ " म्हणजे वाचून ऐकून करावे असा नाही. करु नये असेही बजावतात.
पहिले चार दिवस "आनापान सती" सजगता वाढवण्यासाठी करुन घेतली जाते. ती हणजे श्वास ऊच्छवासावर त्रयस्थभावनेने लक्ष देणे असते. हा श्वासोच्छवास प्रथम नाकपुड्यांच्या आत, नंतर नाकपुड्यांसमोर ओठांवर जाणवतो का हे अखंड तासंतास पहावयाचे असते.
बसण्यासाठी छान गाद्या असतात. मऊसर वेगळ्या ऊशीवर बसायचे. त्यामुळे ताण जाणवत नाही. तासा तासानंतर छोटीशी विश्रांती मिळते.
पाचवे दिवशीपासुन संवेदना शोध सुरु होतो. डोक्यापासुन पायाच्या अंगठ्यापर्येंत व उलट असे लक्ष फिरवत राहणे. ही विपश्यना.
स्थुल , सुक्ष्म संवेदना जाणणे . त्या आल्या पाहिजेत हेही नाही कशा पाहिजेत हेही नाही. केवळ निरीक्षण. गोएंकाजी ह्याला स्वतःच स्वतःचे केलेले आॕपरेशन म्हणतात.
त्यामुळे काय होते? . ते आपल्या जवळच्यांना , घरच्यांना जाणवले पाहिजे. तर तीचा ऊपयोग झाला असे म्हणत येते. गोएंकाजी "तपो! खूब तपो!" असे म्हणतात.
कविता हा प्रकार शाळेत मार्कांपुरता वाचला असेल. विपश्यनेमुळे बाकी काही झाले असो नसो हा गुण कणभर जिवंत झाला असे वाटते.
शिबीरे स्वेच्छानिधीवर चालतात. शेवटी प्रत्येकास इतके पैसे लागले असे औपचारिकता म्हणून लिहीतात. वाटले तर कितीही देणगी द्यावी अथवा न द्यावी. वर्गणी नाही. फी तर नाहीच नाही.पुढील शिबीर मागच्या शिबीराच्या देणगीवर चालते.
सकाळी संध्याकाळी चहा, काॕफी , लिंबूपाणी असते. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी मात्र खाणे असते. रात्री जेवण नसते.
विपश्यनेवरच कधीतरी दोन ओळी लिहील्या होत्या.
विपश्यनेने मानव प्राणी सावध होई क्षणोक्षणी !
तथागताने जगास दिधली ऐसी रत्नांची खाणी!
असे काही. ती मात्र अपूर्णच राहिली .
Comments
Post a Comment