बोहारणी..................................................
दुपारी अडीच तीनची वेळ. साधारण लोकांच्या दुपारच्या झोपा झाल्यानंतरची. "काय कपडे, भांडी, बरणी." अशा उच्च स्वरातील ललकारी ऐकू यायची.
दर दोन चार महिन्यांनी बोहारणींची फेरी असायची सगळ्या गल्लीत. त्या एकट्या कधीच नसत. दोघी बायका. त्यांच्या डोक्यांवर बरीचशी अॕल्युमिनीअमची, दोन, चार स्टीलची भांडी डोकावत असत.
बरोबर एखादा तसला पुरुष, मळकट लेंगा, नीळसर शर्ट, पांढरी टोपी घातलेला. त्याला काहीजण हेडा म्हणत. बोहारणींच्या व्यवहारात त्याचा निश्चित सहभाग काय ते कळत नसे. त्यांच्या टोपल्यांना हात लावताना , थोडासा संभाषण करताना दिसायचा.
बोहारणींचे काम अगदी शिस्तशीर असे. आल्या, पाच दहा मिनीटांत गेल्या असे अजिबात व्हायचे नाही. त्यांचे सगळे काम सावकाश असे. कितीही वेळ जावो काहीतरी व्यवहार झाल्याशिवाय त्या मुळीच जायच्या नाहीत.
आता सगळ्याच लोकांकडे जरासा पैसा आला. भांडी दुकानातुनच घेतली जातात. तशाही वेळा कमीच येतात. आॕनलाईन आहे. अशात त्या बोहारणींकडून कोण बसलंय भांडी घ्यायला. हल्ली त्या दिसेनाशाही झाल्या.
कोठे गेल्या कोणास ठाऊक. कदाचित त्या आता आणखी आत म्हणजे खेड्यात वगैरेही गेल्या असतील. तसे बरेच लोक काय, जमातीच्या जमाती दिसेनाशा झाल्या असे मला कधीकधी वाटते. रोज येणारे भिकारी गेले. रस्त्यावरचे धंदेवाईक गेले. खेळ करणारे गेले.
तर या बोहारणी म्हणजे अगदी मार्केटींग, सेल्समनशीप शिकण्याची छोटीशी ट्रेनींग सेंटर्स होती. कुठून असली कला त्या शिकायच्या कळत नसे.
कोणी बोलावले तर त्या घरी किंवा नेहमी जात असतील त्या घरी त्या सरळ, दार बंद असेल तर उघडून आत शिरायच्या. त्यांना परवानगी वगैरे लागत नसे.
कोणी मुले असतील तर त्यांच्या डोक्यांवरच्या टोपल्यांना हात लावत. नाहीतर हेड्या असायचा तो ते काम करायचा. अंगणात किंवा ओसरीपर्येंतच त्यांचा प्रवेश असे.
टोपल्या ठेवल्यावर पदराने तोंडावरचा, हाताचा घाम पुसत. जरा हाशः, हुशः, असे आवाज करत. भिंतीला टेकून बसत. मग मुलांना "जरा पाणी आण की बाळा." म्हणत. पाणी पिऊन झाले की मग बिझीनेसला सुरुवात करत.
त्यांच्याशी डिलींग करणारी घरातली मामी, मावशी अशी ठरलेली असे. ती नसेल तर त्या मामी आल्यावर येतो म्हणून जात. त्या आल्याची वर्दी त्या कोणा सुमनमामी, कमूमावशी कडे जायची.
"आलीस का , बाबे. कुठे गावाला गेली होतीस काय?" " व्हय जी, जरा त्यो मामा आजार होता, तीकडे गेलोतो." अशी प्राथमीक बोलणी व्हायची. चहाची वेळ झाली असल्याने कधी त्यांना चहा दिला जायचा.
आता त्यांना फार बोलायला लागत नसे. त्या मामी , मावशी घरात जाऊन एखादी जुनी साडी, काही शर्ट, मुलांचे एक दोन कपडे आणून द्यायच्या .सगळे एकदम आणायचे नाहीत, आणि कितीही आणले तरी पुरे म्हणायचे नाही अशी दोन्हीकडची स्र्टेटेजी असे.
आणलेल्या प्रत्येक कपड्याची अगदी इंचन इंच तपासणी व्हायची. लहान सहान कपडे साधारण " ह्ये बर हाय. ह्ये ठीक हाय. " म्हणून बाजुला ठेवले जायचे. साड्या , शर्ट, पँट असे मोठे कपडे त्यांना लगेच कधीच पसंत पडत नसत. " केव्हढा फाटला ह्यो. साडी हाय, पर चार ठिकाणी गेली. चांगला दंड जाईल बघा. " म्हणायच्या. सोबतची दूसरी बाई तशाच काॕमेंट करायची.
त्या मामी, मावशीला हे सगळे माहिती असायचे. " हे बघ, बाबे, आत्ता माझ्याकडे येव्हढेच कपडे आहेत. ह्यावर काय काय देतीस बोल. "
" काय, काय, ओ मामी, ह्याच्यावर हा एक सट नायतर हा कुंडा येईल बघा. " येव्हढ्यावर हा येव्हढासा सट आणि कुंडा घेऊन काय करु. ती स्टीलची छोटी परात देतीस का? " "नाय हो. त्या परातीला म्या चाळीस रुपये दिलेत. तीला चार साड्या हव्या चांगल्या. "
कधीकधी मुलेसुद्धा संभाषणात भाग घेऊ लागली तर त्यांस " तुमचे काय काम इथे. अभ्यास नाहीत का?" म्हणून बाजुला काढले जाई.
परत कपडे पाहुन बाबी जरा मोठे पातेले काढायची. " मामी, शेवट ह्ये घ्या जावा, नाहीतर आणखी एखादी साडी, दादाचा शर्ट, कोट आणा. " मामी वैतागली तर " आता तुला द्यायला नवीन साड्या आणते , नाहीतर अंगावरचे तेव्हढे राहिले आहेत बघ." म्हणायची.
हा डायलाॕग सुद्धा ठरल्यासारखा शेवटी शेवटी येत असे. तरी बाबी हार मानत नसे. " आक्का , आता आमची जायची वेळ झाली. एक चांगले कायतर आण." म्हणायची. तेंव्हा हेड्या बायकी आवाजात, " व्हय की काकू, कायतरी चांगल कापड द्या की." म्हणायचा. मुले हसायची. त्यांना गप्प बसवले जायचे.
मामी बाजुला ठेवलेली आणखी एक बरी साडी आणायची. बाबी जरा खूष झाल्याचे दाखवायची. " ही आधीच आणायची नाही व्हय.काय तुमीबी . " म्हणून आणखी जरा मोठे पातेले किंवा भांडे काढायची.मामी मग त्याची तपासणी करायची. आणि व्यवहार संपायचा. परत शेवटी बाबी, " आणि काय नाई म्हणता. जाऊ मग?" असे फायनल करुन घ्यायची.
परत डोक्यावर चुंबळ ठेऊन त्यावर टोपल्या ठेवल्या जायच्या. आणि ती तीघे बाहेर पडायची. जाताना परत, " जाते ओ मामी, परत पुढच्या टायमाला कायतर चांगले ठेवा. " म्हणून पुढच्या वेळची नांदी करुन जायची.
येव्हढ्याशा व्यवहारात दोन तीन तास वेळ मस्त गेलेला असे. फाटक्या, टाकायच्या , कपड्यातुन काहीतरी मिळाले म्हणून मामी खूष. कपडे मिळाले म्हणून बाबी खूष. अशी लाईव्ह करमणूक मिळाली म्हणून मुले खूष.
असा सर्वत्र खुषीचा माहोल आपोआप पसरत असे. बाबी तोवर आणखी एखादे घर घ्यायला पुढे गेलेली असे.
Comments
Post a Comment