एका फणसाची गोष्ट........................................................

 ही गोष्ट अर्थात ऐकलेली पण खरी घडलेली आहे. स्थळ कोकणातले एक छोटे गाव.दोन भाऊ. एकाच घरात पण वेगवेगळे राहणारे. त्यांची नावे श्रीकांत व उमेश अशी समजू. ते नोकरीला अरब देशात रहात. त्यांचे कुटुंबीय गावी रहात.

श्रीकांतची पत्नी सुशिला आणि उमेशची पत्नी प्रीया. एरवी वागायला बोलायला सगळे छान छान. परंतु अंतर्यामी सगळे पुरते कोकणी. म्हणजे तत्वाला पक्के.
फौजदारी खटल्यांपेक्षा दिवाणी दाव्यांवर कोकणाचे प्रेम जास्त .या कुटुंबाची जमीन थोडीशी . दोन्ही घरांच्या मधोमध एक जुने फणसाचे झाड होते.
बाकी वाटण्या झाल्या तरी एकाच फणसाच्या झाडाची वाटणी कशी करणार? मग तेव्हढ्यापुरते ठरले की फणस लागले की एक एक फणस एकेका कुटुंबाने घ्यायचा . भांडणाचे कारणच उरणार नाही.
अशी वाटणी बरेच दिवस बरी चालली. प्रीया लहान त्यामुळे जरा ऐकून घेणारी. थोडी मनमीळाऊ. सुशिला मोठी. जरा जास्त करारी वगैरे होती .
एकदा प्रीयाने फणस घेऊन झाला होता. तीची बहीण नेहा तीला भेटायला आली होती. तीला फणस फार आवडायचे. गप्पा मारुन झाल्या. तीने एक तयार होत आलेला फणस पाहिला. आणि प्रीया काही म्हणणार तोवर शेजारचा हरी आला होता , त्याच्याकडून तो फणस काढूनही घेतला.
थोड्या वेळाने ती निघुन गेली.सुशीलाने कालच तो फणस काढायला झालेला पाहिला होता. संध्याकाळी देवळातून येताना पाहतो तो फणस नाही. प्रीयाने परवाच एक फणस घेतल्यावर हा तर मलाच मिळायला हवा.
ती तरातरा प्रियाकडे गेली.बाहेरुनच म्हणाली," प्रीया बाहेर ये. अग इथला फणस गेला कुठे?"
प्रिया चटकन् बाहेर येत म्हणाली," अहो तुम्हाला बोलणारच होते. नेहा आली होती. तीला फणस आवडतो. एक घेऊन जाऊ का? म्हणाली. " मी म्हटले जा. " आता पुढचे दोन तुम्ही घ्या. "
"ते नव्हे. पण मला आधी विचारायला नको का? आताचा फणस मी घ्यायचा होता ना? हे काही तू बरे केले नाहीस. आता मला फणस नको की काही नको." सुशीलाचा पारा चढला. आता तीला थांबवण्यात अर्थ नाही हे प्रियाने ओळखले.
सुशीला घरी गेली . मुलाला म्हणाली,"मधू चल माझ्याबरोबर. " कुठे?" त्याने विचारताच तीला सगळे सांगावेच लागले. मधू बारावीत शिकणारा अत्यंत हुशार मुलगा होता. "आई, काहीतरी विचार करु नको. एका फणसाने काय होणारे. नेहा मावशी किती चांगली आहे. " "ते मला सांगू नको. या प्रियाला काही कळायला नको का? . वाटणी ठरली म्हणजे ठरली. " असे म्हणत मधूने किती समजूत घातली तरी सुशिला पोलीस चौकीत पोचलीसुद्धा.
राणेसाहेबांनी तीचे म्हणणे ऐकले. एक फणस घेतल्याची फिर्याद कशाला करता. त्यांना फणस द्यायला सांगू का म्हटले. पण नाही. ती अगदी इरेलाच पेटली. राणेसाहेबांनी पवार काँन्स्टेबलना चौकशीला पाठवले.
प्रिया आणि मुलगी राणी घरात होत्याच. त्यांनी सगळी माहिती सांगितली. चार आठ दिवसांनी सुशिला चौकीत जाताच तीला "दिवाणी बाब आहे ,हवे तर न्यायालयात जाण्याची " समज दिली.
आता सुशिलाला रस्ताच सापडला. ती तडक जवळच्या काटे वकिलांकडे गेली. त्यांनी सगळे ऐकून घेतले . नंतर दिवाणी दावा करण्यापेक्षा फणस चोरीची फौजदारीच लावू म्हटले.
"तुमची फी कीति?" येव्हढ्याश्या केसची कसली फी?" तुम्ही असे करा. एकदम फी नकोच. तारखेला वीस रुपये द्या. इतर खर्च टायपिंग वगैरे तुमचा तुम्ही बघा."
काटे साहेबांनी फिर्याद तयार केली. झाडाचे फोटो लावले. जवळच्या एक दोन जणांची नावे साक्षीदार म्हणून घातली. घराचे वाटप, फणसाचे एकच झाड, फणस एकेका कुटुंबाने घेण्याचा ठराव, जुनच्या वीस तारखेला फणस घेतला असता पुन्हा चोवीस तारखेला प्रियाने फणस घेणे सगळे लिहीले.
फिर्याद वाचुन देशमुख साहेब हसायला लागले. " काटे वकिल साहेब काय हे? इतकी महत्वाची कामे असता एक फणस चोरीची जावेवर फिर्याद. ? आणि पुरावा काय? झाडाचा फोटो.? "
" नाही साहेब , साक्षीदार आहेत. तुम्ही नुसते समन्स काढा. दोन तारखात संपवतो केस. "
हो ना करता साहेबांनी फिर्याद दाखल करुन घेतली. प्रियाला समन्स निघाले. सुशिलाचा जिव भांड्यात पडला.
मग चालू झाला केसचा प्रवास. सुशिलाच्या सांगण्यावरुन तारीख बाजारच्या दिवशी बुधवारी ठेवली जायची. दोन चार तारखा अशाच गेल्या. काटे साहेब ठरल्याप्रमाणे वीस रुपये न चुकता घेत होते.
समन्स घेऊन पोलिस आल्यावर प्रिया आणि राणी जाम भडकल्या. दुबईला फोन झाले. दोन्ही भावांनी सुशिलेला समजावण्याचे खूप प्रयत्न केले. पण उपयोग शून्य . यातून काय साध्य होणार आहे तेच कळत नव्हते.
प्रिया तारखेला हजर झाली. वैयक्तिक जामीनावरच तीची सुटका झाली. इतर कामे पाहता दोन महिन्याची तारीख पडली.
दर तारखेला दोघी वेगळेवेगळ्या रस्त्याने कोर्टात जायच्या . या ना त्या कारणाने तारीखच पडायची.
प्रियाला आता त्याची भितीच वाटेनाशी झाली. तीने वकिलही दिले नव्हते. सुशिला मात्र केस पुढे कशी सरकत नाही? प्रियाला अद्दल कशी घडत नाही ? असे विचारुन विचारुन काटे साहेबांना वैताग आणत होती.
हळूहळू तारखा, पडत पडत, फणसाचा दुसरा हंगाम आला तरी केस आहे तिथेच होती. काही दिवस तीने मधूला तारीख पाहून येण्यास सांगितले . तो अजिबात तयार नसे. संध्याकाळी जाऊन तारीख घेऊन येई.
साहेबांच्या बदलीचे दिवस आले. नेमक्या एका दिवशी सुशिलाही हजर नव्हती . काटे वकिलसाहेबही नव्हते.
देशमुख साहेबांनी हजर असलेल्या वकिलांना विचारले. "कुठे आहेत काटे साहेब आणि फिर्यादी सुशिलाबाई. ?" इतरांना सगळेच माहिती होते. " साहेब तारखा किती झाल्या बघा?" साहेबांनी पाहिले. पस्तीस तारखा झाल्या.
"साहेब झाले. एका फणसाची सातशे रुपये किंमत वसूल केली, काटे साहेबांनी. काढून टाका केस. " फिर्यादी येत नाही म्हणून साहेबांनी केसच काढून टाकली.
सुशिलाला ते समजताच ती तणतणत काटे वकिलांकडे गेली. "का हो. कशी काय काढली केस साहेबाने ? आता काय करायचे.? " बाई. अशा संतापू नका. मी आॕर्डरची नक्कल घेतो . पुढे पाहू काय करायचे ते. पन्नास रुपये नक्कल काढायला देऊन ठेवा. " सुशिलाने शेवटचे म्हणून पैसे दिले. आणि घराकडे यायला निघाली.
कोप-यापाशी येऊन पाहते तो काय? मधू झाड तोडणा-या हरबाला " लौकर फांद्या घेऊन जा सांगत होता. " " मधू मधू. काय केलेस हे. " काय केले? तुझ्या भांडणाचे मुळच काढून टाकले. आता वाटले तर आपल्या हद्दीत चार झाडे लाव. आणि खा फणस पोटभर. "
केसही गेली , झाडही गेले म्हणत सुशिला चार दिवस रडली . तेंव्हापासुन तीने फणस खाणे सोडले ते कायमचेच.

Comments