कस्त्वम्............................
नरेश वेताळेचे नाव विचीत्र असले तरी तो एकदम चांगला डाॕक्टर होता. आईवडील दोघे शिक्षक त्यामुळे व्यवसायातुन पैसे मिळवणे हे त्याचे ध्येय कधीच नव्हते.
एन्ट्रन्सशीप संपल्यानंतरही बरेच दिवस सरकारी नोकरीच बरी असे त्याचे मत होते. अचानक एका ट्रस्टच्या हाॕस्पीटलमधुन त्याला बोलावणे आले. आदिवासांसाठी ट्रस्ट हाॕस्पीटल चालवत असे. ही संधी आणखी चांगली म्हणून नरेशने जायचे ठरवले. आईबाबांनी "काय ते नीट पाहून कर" येव्हढेच सांगितले .
रेल्वे , बसचा कंटाळवाणा प्रवास संपवून नरेश संध्याकाळी गावी पोचला. हणमा शिपाई हजरच होता. तो लगेच नरेशची बॕग घेऊन गाडीत बसला. ट्रस्टने डाॕक्टरांसाठी खास बंगल्यात रहायची सोय केली होती.
येव्हढा मोठा बंगला एकट्यासाठी कशाला असे नरेशला वाटून गेले. पाहू हळूहळू म्हणून नरेशने बंगल्यात प्रवेश केला. हणमाने सगळी सोय तोच बघणार असल्याचे सांगितले .
प्रवासाचा शीण आल्यामुळे जेवल्यानंतर नरेशला लगेच झोप लागली. दुसरे दिवशी सगळ्यांच्या ओळखी व कामास सुरुवात झाली. डाॕक्टरीचे ऊत्तम ज्ञान , अनुभव यामुळे त्याचे काम छान सुरु झाले. रुग्णांच्या, नातेवाईंकाच्या तक्रारी संपून रुग्ण लवकर बरे होऊन जाऊ लागले. ट्रस्टलासुद्धा चांगला डाॕक्टर मिळाल्याचे समाधान झाले.
आता गावातच राहण्याचे ठरल्यानंतर नरेशच्या आईने त्याला लग्नाचा विचार करण्यास सांगितले . आता इकडे राहण्यास तयार असणारी मुलगी पाहणे ही आणखी एक अडचण उभी राहिली.
हाॕस्पीटलचाच अकौंट विभाग सांभाळणारी निता राणे डाॕक्टरला पहिल्या दिवसापासुन पहात होती. तीला त्याचे वागणे, स्वभाव खूपच आवडून गेले होते. पण आपणाच कसे काय विचारायचे हा प्रश्न होता. हणमाने ते ओळखले आणि निताचे वडिल राणे काका जे त्या भागातील समाजसेवक होते त्यांनी सांगितले.
काकांनी ख-याखोट्याचा अंदाज घेतला. निताचे मत विचारले आणि एके दिवशी सरळ नरेशलाच गाठले. त्यानेही सगळ्यांच्या तोंडून काकांचे नाव ऐकलेच होते. त्यांचा प्रस्ताव ऐकला व आईवडीलांना विचारुन सांगतो असे ऊत्तर दिले.
यथावकाश नरेशचे आईवडील आले. त्यांनी निताला पाहिले. तीचे घर पाहिले व चौकशी करुन तीला पसंतही केले. महिनाभराने फारशी धामधुम न करता लग्नही पार पडले.
गावातील घरातून निता मोठ्या बंगल्यात रहायला आली. नरेशला बरेच वाटले. तसा तो घरी फारच कमी वेळ असे. परंतु घरी असताना बोलायला, काळजी करायला , हवे नको पहायला हक्काचे माणूस आले.
ट्रस्टच्या नियमानुसार नवराबायको एकाच ठिकाणी काम करु शकत नव्हते. त्यामुळे निताने नोकरी सोडून दिली. आता ती दिवसभर एकटी काय करेल हा नरेशला मोठा प्रश्न पडला.
एकदा निता तीच्या खोलीत लोळत होती. वरच्या खोलीत काहीतरी खूसपूस आवाज येतोय असे वाटले. ती चटकन वर गेली. वरच्या ब-याच खोल्या बंदच होत्या. एक मोठा हाॕल तेव्हढा ऊघडा असे.
हाॕलचे दार निताने ऊघडले. आत तसा अंधारच होती. मागच्या कोप-यातील पडद्यामागून कोणीतरी हळूच डोकावत आहे असे तीला वाटले. ती प्रचंड घाबरली. "ऐ. कोण आहे तिकडे?" येव्हढे ती कसेबसे म्हणाली आणि बाहेर जायला वळणार येव्हढ्यात पडद्यामागुन एक वर्षाचे वय असणारे मुल "आई . मी आलो." म्हणत तिच्याकडे येऊ लागले. दार बंद करुन ती पळतच खाली गेली.
खाली जाऊन ती फ्रीजमधील पाणी गटागटा प्याली, लगेच तीने नरेशला फोन केला. नरेश आला. तीने त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याने हणमाला बोलावले. त्याला बंगल्याबद्दल सर्व विचारले. त्याने तो दोन वर्षांपूर्वी आल्याचे व बंगल्यातच फार कमी वेळा आल्याचे सांगितले .
निताने काकांना फोन लाऊन सर्व प्रकार सांगितला. त्यांचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसे. तरीही गावातील जुन्या लोकांना विचारेन, सोबतीला येऊन थांबेन असे त्यांनी आश्वासन दिले.नरेश गेला. निता हळूहळू सावरली व कामाला लागली. दोन चार दिवस असेच गेला. निताला वाटले आपल्यालाच काही भास झाला की काय.
एका संध्याकाळी निता हाॕलमध्ये टी.व्ही. बघत होती. घरात दुसरे कोणीच नव्हते. काहीतरी खावे म्हणून फळे आणण्यासाठी किचनकडे जाणार येव्हढ्यात परत बारिक आवाजात अगदी जवळून आल्यासारखी हाक." आई मी आलो. " निताने ईकडे तिकडे पाहिले तर जिन्याच्या पहिल्याच पायरीवर तो मुलगा बसला होता. दिसायला सुंदर, पांढरी पँट, निळा टी.शर्ट. हाताने हनुवटी धरलेली. मुद्रा हसरी. निता घाबरुन पडायच्या बेतात होती. तेव्हढ्यात तोच पळत आला. तीला धरुन खुर्चीवर बसवले आणि म्हणाला,"अग, घाबरु नको. कोणाला सांगू नको. मी तुला काही नाही करणार. " आणि आला तसा दिसेनासा झाला.
आता मात्र एक क्षण इथे थांबण्यात अर्थ नाही असे निताने ठरवले. गेट लावून स्कूटी घेऊन हाॕस्पीटलकडे गेली. सुदैवाने महिन्यातला पहिला गुरुवार असल्याने ट्रस्टची मिटींग होती. ट्रस्टी जमणार होते. आजपर्येंत मिटींगबद्दल तीने आॕफीसमधुनच ऐकले होते.
एक जुने ट्रस्टी जामदार वकिल तीच्या काकांच्या ओळखीचे होते. त्यांच्याकडून काही समजेल आसे तीला वाटले. मिटींग संपल्यावर तीने त्यांना थांबवून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांचाही त्यावर विश्वास बसला नाही. नंतर त्यांना ब-याच वर्षांपूर्वी बंगल्यात राहणाऱ्या डाॕक्टर गो-यांच्याबद्दल तसेच अपघाताने त्यांची पत्नी व दोन मुले गेल्याचे आठवले. डाॕक्टर गोरे त्यानंतर हाॕस्पीटल सोडून शहरात गेले.निताने डाॕक्टर गोरेंच्या पत्नी व मुलांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाही ते माहिती नव्हते. संध्याकाळी ऊशीरा नरेशने खूप समजुत घातल्यावर ती घरी यायला तयार झाली.
नरेशचा व काकांचा विश्वास नसताही बंगल्यात शांतीपुजा घातली. निताच्या सोबतीला हणमाने त्याची बहिण शेवंताची नेमणूक केली. आता संकट टळले भिती पळाली असे निताला वाटून गेले. पण.
चार दिवसांनी शेवंता दुपारी गावात भाजी आणायला गेली. निता चांगलीच जागरुक झाली होती. खिडकीतून बाहेर पहात असता अचानक तिची साडी मागून ओढली गेली. "आई , मी आलो. ती ताईपण तुला पहायचे म्हणते.आणू तीला?" निताची घाबरुन बोबडीच वळाली. ती काही बोलणार येव्हढ्यात तो मुलगा तीन चार वर्षांच्या, फ्राॕक घातलेल्या सुंदर मुलीला हाताला धरुन येऊ लागला. " नको,नको. " म्हणत निता बेशुद्ध पडली.
शेवंताने तीच्या तोंडावर पाणी मारुन तीला ऊठवले. निताने ताबडतोब बंगला सोडण्याचे ठरवले. ती सरळ शेवंता बरोबर माहेरी गेली. आईबाबांना पहिल्या पासुन काय काय झाले ते सगळे सांगितले . ती ऊगाच काहीतरी सांगणार नाही याची खात्रीच होती . परंतु तीच्याशिवाय कोणालाच हा प्रकार दिसला नव्हता.
शेवटी तीच्या आग्रहासाठी नरेशने तीच्या घराजवळच छोटे घर पाहिले. थोडे सामान तेथे आणून ठेवले.
काही दिवसांनी निताने सर्वांना गोड बातमी दिली. काही महिन्यांनी तीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाचे तोंड पाहिल्यापासुन निताला शंका येत होती. ती नेहमी नरेशला ती बोलून दाखवे आणि तो थट्टेने उडवून लावे.
बाळ वर्षाचा झाला. सगळीकडे त्याचे कौतुक चालले होते. एके दिवशी निता बाळाला घेऊन झोपाळ्यावर बसली होती. बाळाने पहिला शब्द ऊच्चारला" आई. मी आलो." आणि निता पुन्हा बेशुद्ध पडली..
Comments
Post a Comment