पिंकी...............................

 मुंबईत माणसांची गर्दी आहे. त्याचबरोबर मांजरे ,ऊंदीर आणी कुत्रे यांचीही. ऊंदीर तर येव्हढे मोठे की मांजरेही त्यांना घाबरत असावीत. बाजार वगैरे ठिकाणी हे गलेलठ्ठ ऊंदीर मजेत फिरत असतात.

गव्हर्मेंट काॕलनीतही बरीच मांजरे फिरत असतात. बाहेर फिरणारे कुत्रे मला फार आवडतात. हळूहळू ओळख झाल्यावर ते घरातही शिरतात.
एकदा एक लहान मांजराचे पिल्लू दिसले. त्याला कोणीच नसावे. छान छोटे पिवळ्या रंगाचे इकडेतिकडे फिरत होते. प्राणी घरात आणण्यास मला व मुलांना फार आवडायचे तर मेघनाचा अर्थातच ठाम विरोध असे.
परंतु अगदीच बिच्चारे दिसल्यामुळे एकदा थोडे दूध देण्याच्या बोलीवर त्याचा घरात प्रवेश झाला. नंतर ते , ती आहे याचा शोध लागला. दूध मिळाल्यावर ती घरातच राहिली. आम्हा सगळ्यांनाच ती आवडायला लागली.
मांजरांचे एक बरे असते. आपण त्यांना पाळले, ते आपल्या घरातले असे आपण समजतो. पण ती तशी स्वतंत्र असतात. शिवाय त्यांना पाळण्यासाठी अधूनमधून दूध देण्यापलीकडे काहीच करावे लागत नाही. ती त्यांच्या मर्जीने कोठेही जात येत असतात.
मांजर घराला धार्जीण व कुत्रे मालकांना असे म्हणतात ते खोटे नाही. घरात संरक्षण व लागेल तेंव्हा अन्न मिळाले की मांजरांचे भागते. मालक बदलले तरी त्यास फरक वाटत नाही.
जसा तुमचा कुत्रा घराबाहेर तुम्हाला ओळखतो तसे मांजर तुम्हाला घराबाहेर ओळखेल असे नाही. फिसफिस करुन त्याला घराबाहेर असता बोलावले तरी ते येईलच असे नाही.
पिंकी असे तीचे नामकरण मुलांनी दोन दिवसातच केले. तीला खेळवताना छान मजेत वेळ जात असे. ती सगळ्यांच्या अंगाखांद्यावर मजेत खेळत असे.
मानेजवळ कुरवाळलेले सर्वच प्राण्यांना आवडते. मांजरांच्या मऊ केसाळ अंगावर हळूहळू डोक्यापासुन शेपटीकडे हात फिरवलेले त्यांना आवडते. उलटे हात फिरवणे त्यांना आवडत नाही. चिडल्यानंतर एक, दोन तीन ,चार पंजांनी बोचकारणे , तोंडांने चावणे व सर्वात शेवटी पळून जाणे असा त्यांचा प्रतीक्रियाक्रम असतो.
हळूहळू पिंकी मोठी होऊ लागली. बराच वेळ घरातच फिरत खेळत असे. मेघनालासुद्धा ती आवडू लागली. वेळेला खायला मिळाल्यामुळे चोरुन दूध पिणे नसे. अर्थात सध्या तसे दूध उघड्यावर नसतेच. फ्रीज काही त्यांना उघडता येत नाही.
बाहेरच्या बोके मंडळींनासुद्धा चांगल्या मांज-यांचा शोध लागत असावा. आता अधूनमधून बाई घराबाहेर पडू लागली. कधीतरी पिंकीसुद्धा जरा जास्तच जाड वाटू लागली. तीची चाल थोडी मंदावली.
आता हीने काही पराक्रम केला असेल. तीला पिल्ले होतील याची कुणकुण मेघनाला लागली. आता तो त्रास होणार असे वाटत होते. पण आता ती घरात इतकी रुळली होती की तीला घराबाहेर काढणे कोणालाच बरे वाटेना.
ती आता मेघनाच्या मागेपुढे फारच घुटमळू लागली. एका दुपारी ती मेघनासमोरच झोपून राहिली. तीच्याकडे फारच आर्जवाने मदतीच्या अपेक्षेने पहात राहिली. तीच्यासाठी काही जाड कापड वगैरे घातले गेले.
शेवटी तीने चार छोट्या छोट्या पील्लांना जन्म दिला. मग ते सोपस्कार झाले. एरव्ही मांजरी छोट्या पिल्लांजवळ कोणालाही जाऊ देत नाही. येथे मामला वेगळाच.
पिल्लांना बिनधास्त सोडून पिंकी सर्वत्र फिरत असे. पिल्लांचे डोळे उघडले. आता पिल्लेसुद्धा हळूहळू फिरायला लागली. त्यांनाही हवेतसे खेळवले तरी पिंकी काही करत नसे. त्यांना डोक्यावर घेतले की पिल्ले त्यांच्या छोट्या छोट्या नखांनी टोचत रहात.
ती घरभर घाण करत.त्यांना महत्प्रयासाने घराबाहेर बाहेर न्यावे लागे. या चार पिल्लांचे काय करायचे हा प्रश्नसुद्धा पिंकीनेच सोडवला. एकएक करत थोडी मोठ्ठी झाल्यावर ती कोठे गेली समजलेसुद्धा नाही.
पिंकीचे पिल्ले देण्याचे कार्यक्रम आणखी दोनवेळा झाले. सव्वीस जुलैच्या महापुरात घरभर पाच फुट भरले. आम्ही सगळेच वरच्या मजल्यावरच्या मित्रांकडे रहायला गेलो.
पाणी भरताभरता आठवण झाली. पिंकी कुठे असेल. अमेय तेव्हढ्या पाण्यात घरात गेला. एका उंच कपाटावर पिंकी बसली होती. भितीने पहात होती.
अमेयने तीला बोलावले. तीला आणखी भिती वाटली आणी त्यालाच बोचकारु लागली. शेवटी तशीच धरुन तो तीला घेऊन आला. पूर ओसरेपर्येंत मग ती एकदम शांत होऊन गेली.
कालांतराने मुंबई सोडायची वेळ आली. सामान ट्रकमध्ये चढवले. पिंकी आपली गॕलरीत बसली होती. नव्या मालकांची वाट बघत.

Comments